Pages

Sunday, 16 December 2012

दोन भावंडांसह तिन बालकांचा विहिरीत पडून करूण अंत

मानोली येथिल हुदयद्रावक घटना  
घाटंजी तालुक्यात शोककळा


शेतात खेळायला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांपैकी तिघांचा विहिरीत पडून करूण अंत झाला. घाटंजी पासुन सुमारे ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या मानोली येथे सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.
तुषार रामदास मोहुर्ले (६) वर्ग १ ला, समय रामदास मोहुर्ले (९), शुभम ज्ञानेश्वर निकोडे (९) वर्ग ३ रा.यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेल्या तुषार लक्ष्मण पेटकुले (९) याने गावात येऊन घटनेची माहिती सांगितली. यामधील तुषार व समय मोहुर्ले हे दोघे सख्खे भाऊ होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुपारच्या सुमारास हे चार सवंगडी जंगलात फिरायला गेले होते. बोरे तोडून आणल्यावर गावापासुन १ किलोमिटर अंतरावर असलेल्या कुंडलिक पेटकुले यांच्या शेतातील विहिरीजवळ ते खेळायला लागले. पक्के बांधकाम करून नसल्याने विहिरीच्या एका बाजुने आतमध्ये उतरण्यासाठी असलेल्या जागेतून ते विहिरीमध्ये उतरले. विहिरीमध्ये विसर्जीत करण्यात आलेल्या दुर्गा देविचा पाट वर तरंगत होता. गंमत म्हणुन ते एक एक करून त्यावर बसले. जास्त भार झाल्याने लाकडी पाट उलटला. बाहेर निघता न आल्याने विहिरीमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या तुषार पेटकुले याने गावात येऊन सर्वाना याबाबत माहिती दिली. लगेच गावक-यांनी शेताकडे धाव घेतली. मात्र तोवर खुप उशिर झाला होता. घटनास्थळावर ग्रामस्थांची प्रचंड गर्दी झाली होती. गावातील तिन बालकांवर काळाने क्रूर झडप घातल्याने मुरली गावासह संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, सदस्य रूपेश कल्यमवार यांनी तातडीने गावात येऊन कुटूंबीयांची विचारपुस केली. तिनही बालकांना घाटंजी ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

निस्तब्ध गाव अन पाणावलेले डोळे...
गावात खेळणारी बागडणारी तिन बालके दगावल्याची बातमी गावात कळताच सर्वत्र भयाण शांतता पसरली. चेहरे अबोल झाले अन अनेकांचे डोळे पाणावले. गावात कुणीही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. अनेकांनी शेताकडे धाव घेतली तर आबालवृद्ध रस्त्याकडे डोळे लावुन बसले होते. बालकांचे मृतदेह असलेले वाहन गावात येताच सर्वांच्याच भावनांचा बांध पुâटला अन अनेकांचे डोळे आपसुकच पाणावले. या बालकांच्या मातापित्यांच्या आक्रोशाने तर सर्व वातावरणच गहिवरून गेले. काय करावे व काय बोलावे हे कुणालाच कळत नव्हते. मोहुर्ले कुटूंबावर तर आभाळच कोसळले. तुषार व समय या दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने त्यांचे सर्वस्वच गेले. तिन वर्षांपुर्वी घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथेही अशीच हुदयद्रावक घटना घडली होती. विहिरीत पडून तिन शालेय विद्यार्थ्यांचा करूण अंत झाला होता.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment