Pages

Showing posts with label नगराध्यक्ष. Show all posts
Showing posts with label नगराध्यक्ष. Show all posts

Friday, 2 August 2013

घाटंजीत नगराध्यक्षपदाची ‘संगितखुर्ची’

दिड वर्षात तिन नगराध्यक्ष : पदाच्या आघाडीत ‘कर्तव्य’ माघारले
अवघ्या दिड वर्षाच्या कालावधीत तब्बल तिन नगराध्यक्ष पाहण्याचा दुर्मिळ पण तितकाच दुर्दैवी योग घाटंजीवासीयांच्या नशिबी आला आहे. येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर तिस-यांदा ‘नवा गडी’ विराजमान होणार आहे. कोणतीही तांत्रिक अडचण नसतांना दिड वर्षात तिन वेळा सर्वसहमतीने नगराध्यक्ष बदलाची बहुदा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे की ‘संगितखुर्ची’च्या खेळातली? असा प्रश्न घाटंजीवासियांना पडला आहे.
उल्लेखनिय म्हणजे हे बदल प्रासंगिक नव्हे तर पुर्वनियोजीत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करतेवेळीच ही ‘वाटणी’ ठरविली होती. ज्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने नगर पालिकेत सर्वाधीक जागा मिळविल्या ते जगदिश पंजाबी हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. एका वर्षात त्यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसचेच परंतु ना.मोघे यांचे खंदे समर्थक किशोर दावडा यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली. मात्र सहाच महिन्यामध्ये त्यांना ‘खो’ मिळाल्याने खुर्चीवरून उठावे लागले. आता एका वर्षासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे हे खुर्चीचा ताबा घेतील. त्यानंतरचे अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांकरीता राखीव आल्याने व त्या प्रवर्गातील एकमेव उमेदवार रा.कॉं.कडे असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. अन्यथा घाटंजी नगर परिषदेने यावेळी पाच वर्षांच्या काळात सर्वाधीक नगराध्यक्ष बदलाचा नवा विक्रम प्रस्थापीत केला असता. पदाच्या या ओढाताणीत विकास तर सोडाच परंतु मुलभूत समस्यांकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही. पावसात शहराच्या विवीध भागामध्ये साचणारे तलाव व त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणारे घाटंजीकर, अवघ्या दोन तिन वर्षांपुर्वी बांधलेल्या रस्त्यांवर पावलोपावली पडलेले खड्डे, नाल्या नसल्याने पॉश वस्त्यांमध्येही वाहणारी गटारे यासह विवीध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. न.प.च्या सर्वच शाळांची दुरावस्था झाली आहे. न.प.कार्यालयातही ठिकठिकाणी पाणी गळते. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये यावर्षी मुरूम देखिल टाकण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांवर मुख्याधिका-यांची स्वाक्षरी मिळवणे हे मोठे दिव्य असल्याचा अनुभव घाटंजीकरांना येत आहे. अशातच नगराध्यक्षपदाची ही संगितखुर्ची मात्र शहरवासियांचे मनोरंजन करीत आहे.

युवा नगराध्यक्षाकडून ‘रामराज्या’ची अपेक्षा !
 येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदी आरूढ होणार असलेले राम खांडरे हे पालिकेच्या विस्कळीत कारभाराला रूळावर आणतील अशी अपेक्षा घाटंजीकर बाळगून आहेत. एक प्रगतीशील व्यावसायीक, उमदा कार्यकर्ता व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणुस अशी ओळख असलेले हे व्यक्तीमत्व अन नावामध्ये असलेला ‘राम’ यामुळे त्यांच्याकडून सुराज्याची अपेक्षा केली जात आहे.
अमोल राऊत
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

Tuesday, 8 January 2013

घाटंजी नगराध्यक्षपदी किशोर दावडा



नगर परिषद अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे किशोर दावडा यांची बिनविरोध निवड झाली. एक वर्ष नगराध्यक्षपद सांभाळुन जगदिश पंजाबी यानी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. घाटंजी नगर परिषदेमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये आघाडी आहे. सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या करारानुसार जगदिश  पंजाबी एक वर्ष, किशोर दावडा सहा महिने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे एक वर्ष व त्यानंतरच्या अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. घाटंजी नगरपरिषदेमध्ये कॉंग्रेस ८, राष्ट्रवादी ४ तर शिवसेना ५ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. सुरूवातीचे अडीच वर्ष नगराध्यक्षपद खुले आहे. तर त्यानंतर अनुसूचित जाती (महिला) करीता आरक्षण निघाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस रा.कॉं.आघाडीमध्ये एकमेव असलेल्या चंद्ररेखा रामटेके यांचेकडेच नगराध्यक्षपद येणार आहे.
आज झालेल्या निवडणुक प्रक्रीयेत सेनेचे संतोष शेंद्रे यानीही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र किशोर दावडा यानी केलेल्या विनंतीनुसार अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड करण्यात आली असे शेंद्रे यानी सांगितले.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यानी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 

Friday, 28 December 2012

घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांचा राजीनामा



नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांनी आज सायंकाळी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सत्तास्थापनेच्या वेळी ठरल्याप्रमाणे जवळपास एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. आज सायंकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला राजीनामा सादर केला. यापुढे नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचेच किशोर दावडा यांची वर्णी लागणार आहे. सहा महिन्यानंतर एका वर्षासाठी राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद देण्यात येईल. तर पुढील अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला साठी राखीव असल्याने ते राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. सध्या घाटंजी नगर परिषदेत कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीची सत्ता आहे.

साभार :- देशोन्नती 

Wednesday, 28 December 2011

घाटंजीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे जगदीश पंजाबी

उपाध्यक्षपदी रा.कॉ.चे अकबर तंव्वर
नगराध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी यांचा एकतर्फी विजय झाला. तर न.प.उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर विजयी झाले. नामनिर्देशीत सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे तसेच संजय राऊत यांची वर्णी लागली. नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे जगदिश पंजाबी व सेनेच्या शर्मिला उदार यांनी नामांकन दाखल केले होते. यामध्ये १३ नगरसेवकांनी पंजाबी यांच्या बाजुने तर केवळ ४ नगरसेवकांनी शर्मिला उदार यांच्या बाजुने मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकबर तंव्वर व सेनेच्या सरोज पडलवार यांनी नामांकन दाखल केले होते. तंव्वर यांना १३ व पडलवार यांना ४ मते पडली. गटनेत्यांच्या निवडीवर शिवसेनेने मोठ्या दिमाखाने आक्षेप घेतला होता. मात्र पीठासीन अधिका-यांनी तो फेटाळला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाल्याने नगराध्यक्षपदी पंजाबी यांची निवड जवळजवळ निश्चित झाली होती. सकाळी १० वाजता निवडणुक प्रक्रीयेला सुरूवात झाली. दुपारी २ वाजताच्या सुमारास निकाल घोषीत झाला. यावेळी नगर परिषदेच्या परिसरात नागरीकांची प्रचंड गर्दी जमली होती. निकालानंतर शहरातुन विजयी मिरवणुक काढण्यात आली.  पीठासीन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी एस.पी.झंझाड होते. मुख्याधिकारी गिरिश बन्नोरे तसेच नगर परिषद कर्मचा-यांनी निवडणुक प्रक्रीया पार पाडली. पोलीस उपनिरिक्षक अरूण कोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Sunday, 20 November 2011

काय करावे कळेना, कुणाचेच कुणाशी जुळेना


सेनेच्या कुटीलतेमुळे भाजप अडचणीत
राष्ट्रवादीला पोखरतोय ‘उंदीर’
कॉंग्रेसमध्ये एकछत्री कारभार
केवळ व्यक्तीगत स्वार्थावर केंद्रित झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुनही राजकीय पक्षांची रणनिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस  या पक्षांमध्ये होणार असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरणार अशी चर्चा असली तरी त्या दृष्टीने तयारी दिसत नाही. शिवसेनेचा स्थानिक नेता कुटील नितीचा अवलंब करून आपले लयास जात गेलेले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये असलेला एक मोठा गट नुकताच राष्ट्रवादी मध्ये आल्याने पक्ष सशक्त झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट करण्याचा पक्षाचा मानस असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीला होऊ शकतो. मात्र बेलोरकरांच्या वर्चस्वाला तिरप्या नजरेने पाहणारा एक गट राष्ट्रवादीत आहे. या गटाला नगराध्यक्षपद आपल्याच खिशात असावे अशी तिव्र ईच्छा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नियोजनाची सुत्रे याच गटाकडे आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जाणा-या श्याम बेलोरकरांना निर्णय प्रक्रीयेमध्ये फारसे महत्व दिल्या जात नसल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गटात कुरबुर सुरू आहे. केवळ जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन ईकडे तिकडे उड्या मारणारा एक ‘उंदीर’ राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पोकळी निर्माण करीत आहे. यापुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविकेला नगराध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हेतुने हे सगळे कारस्थान सुरू आहे. याच उठाठेवीचा एक भाग म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवाराला प्रभाग एक मधुन हटवुन शिवसेनेच्या उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्याचाही घाट रचला जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सकारात्मकतेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये अगदी याऊलट चित्र आहे. नगर परिषदेसाठी निर्णय घेण्याचे सर्वाधीकार माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना आहेत. अन्य कोणाचीही लुडबूड ऐकल्या जाणार नाही असा अलिखित करारच झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकछत्री असला तरी त्याचा फायदाच कॉंग्रेसला होणार आहे.
भाजप व शिवसेनेची युती व्हावी असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी शिवसेनेने कुटील डाव खेळुन सर्व महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवुन घेतल्या. दबावात येऊन सेनेशी सलगी करणारा भाजप मधला एक गट सोडला तर उर्वरीत भाजप कार्यकत्र्यांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे झुकण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुक लढविणे श्रेयस्कर असल्याची अनेक कार्यकत्र्यांची भावना आहे. एकंदरीतच युती झाली तरी मनोमिलन मात्र होणार नाही हेच वर्तमान परिस्थितीवरून दिसते.
गेली पाच वर्षे एकमेकांचे पाय ओढुन घाटंजी शहराला एखाद्या खेड्यापेक्षाही दयनिय केलेल्या नगर परिषदेच्या महाभागांमध्ये निवडणुक काळातही समन्वय असल्याचे दिसत नाही. मतदार राजा मात्र या सर्व घडामोडींवर मोठ्या हुशारीने लक्ष ठेऊन ८ डिसेंबरची वाट पहात आहे.
साभार:- देशोन्नती 

Monday, 7 November 2011

घाटंजीतील पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीने निवडणुकीची उत्सुकता शिगेला

नगरपरिषद निवडणुकीची चाहुल लागताच शहरात पक्षांतराच्या फैरी सुरू झाल्या. ही पार्श्‍वभूमी निवडणुकीपूर्वी तयार झाल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशा स्थितीत उमेदवार शोधताना नेत्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येते.
नगरपरिषदेत १७ सदस्यांसाठी निवडणूक होत असून अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने अध्यक्षपदावर दावेदारी करणार्‍यांमध्ये घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सध्या पालिकेत काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादी सहा, भाजप सहा व शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती होऊन अडीच वर्ष भाजपने वर्चस्व गाजविले. नंतरचे अडीच वर्ष राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असेल असे युतीत ठरले होते. परंतु अध्यक्षपदाचे आरक्षण बदलले आणि शिवसेनेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील वच्छलाबाई धुर्वे यांना संधी मिळाली. भाजपा व राकाँ युती केवळ आकड्यांपुरतीच र्मयादित राहिली. सदस्यांचे मनोमिलन न झाल्यामुळे या काळात विकासाला प्रचंड खिळ बसला. यापूर्वी घाटंजी पालिका ही काँग्रेस आणि उदयास आलेल्या विविध आघाड्यांच्या ताब्यात होती. परंतु मागच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली. तसेच राष्ट्रवादीनेही संख्याबळ वाढवून दिले. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. ना. शिवाजीराव मोघे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश लोणकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्यामुळे वेळेवर तयार होणार्‍या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेत काँग्रेसच्या गटनेत्या संगीता भुरे व भाजपच्या माजी नगराध्यक्ष शांताबाई खांडरे यांचाही राष्ट्रवादी प्रवेश होणार अशी चिन्हे दिसू लागली आहे. नव्या समीकरणात तालुक्यातील दोन दिग्गज नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर व सुरेश लोणकर एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसची कमान जगदीश पंजाबी व सुभाष गोडे तर राष्ट्रवादीमधून जितेंद्र ठाकरे, अरविंद भुरे यांच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्य शैलेश ठाकूर यांनी उचलला आहे. तसेच भाजपची धुरा राजू सुचक, मधुसुदन चोपडे सांभाळीत आहेत. काही दिवसांपूर्वी घाटंजी येथे भाजपा खासदार हंसराज अहीर यांनी पालिका निवडणूक भाजप-सेना युती लढवेल असे सांगितले. त्यासंदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर व आमदार दिवाकर रावते यांच्या बैठकी झाल्या. सध्या राष्ट्रवादीतून श्याम बेलोरकर, शांताबाई खांडरे, भाजपमधून दुर्गा साखरकर, काँग्रेसमधून माया मंगाम, सुभाष गोडे व जगदीश पंजाबी, अर्चना गोडे, मधुकर पेटेवार, दादा चिव्हाणे, चंदू तुराळे, शिवसेनेतून वच्छलाबाई धुर्वे आदी माजी नगराध्यक्ष उतरणार असल्याचे दिसून येते. तसेच काँग्रेसतर्फे किशोर दावडा, परेश कारिया, संदीप बिबेकार, शोभा ठाकरे, मो. मोफीन, नंदू धनरे, राष्ट्रवादीकडून संगीता भुरे, प्रकाश भोरे, महेश गुप्ता, बेबी तलमले, चंद्रकांत ढवळे, अजय पालतेवार, राम खांडरे, ओम बाजपेयी, विठ्ठल बिजेवार, ताई भोंग, ताई धांदे, अकबर तंवर, ताई खोब्रागडे, ताई परतेकी, शर्मीला उदार, सिंधु सिरपुरे, ताई ठाकरे, आनंद मडावी, संतोष गेडाम, सेनेकडून शैलेश ठाकूर, सरोज पडलवार, संदीप बुल्ले, स्वरूप नव्हाते, ताई रामटेके, ताई कोडापे, सैयद फिरोज, ताई गिनगोले, संतोष शेंदरे, दिनेश उईके यांची नावे चर्चेत आहेत. असे असले तरी अनेक प्रभागांमध्ये राजकीय नेत्यांना अपेक्षित उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे शोध मोहीम जोमाने सुरू असल्याचे पहावयास मिळते.
विठ्ठल कांबळे 
साभार:- दै.लोकमत