Pages

Friday 2 August 2013

घाटंजीत नगराध्यक्षपदाची ‘संगितखुर्ची’

दिड वर्षात तिन नगराध्यक्ष : पदाच्या आघाडीत ‘कर्तव्य’ माघारले
अवघ्या दिड वर्षाच्या कालावधीत तब्बल तिन नगराध्यक्ष पाहण्याचा दुर्मिळ पण तितकाच दुर्दैवी योग घाटंजीवासीयांच्या नशिबी आला आहे. येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर तिस-यांदा ‘नवा गडी’ विराजमान होणार आहे. कोणतीही तांत्रिक अडचण नसतांना दिड वर्षात तिन वेळा सर्वसहमतीने नगराध्यक्ष बदलाची बहुदा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे की ‘संगितखुर्ची’च्या खेळातली? असा प्रश्न घाटंजीवासियांना पडला आहे.
उल्लेखनिय म्हणजे हे बदल प्रासंगिक नव्हे तर पुर्वनियोजीत आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करतेवेळीच ही ‘वाटणी’ ठरविली होती. ज्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने नगर पालिकेत सर्वाधीक जागा मिळविल्या ते जगदिश पंजाबी हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. एका वर्षात त्यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला. त्यानंतर कॉंग्रेसचेच परंतु ना.मोघे यांचे खंदे समर्थक किशोर दावडा यांनी नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावली. मात्र सहाच महिन्यामध्ये त्यांना ‘खो’ मिळाल्याने खुर्चीवरून उठावे लागले. आता एका वर्षासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राम खांडरे हे खुर्चीचा ताबा घेतील. त्यानंतरचे अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलांकरीता राखीव आल्याने व त्या प्रवर्गातील एकमेव उमेदवार रा.कॉं.कडे असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. अन्यथा घाटंजी नगर परिषदेने यावेळी पाच वर्षांच्या काळात सर्वाधीक नगराध्यक्ष बदलाचा नवा विक्रम प्रस्थापीत केला असता. पदाच्या या ओढाताणीत विकास तर सोडाच परंतु मुलभूत समस्यांकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नाही. पावसात शहराच्या विवीध भागामध्ये साचणारे तलाव व त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणारे घाटंजीकर, अवघ्या दोन तिन वर्षांपुर्वी बांधलेल्या रस्त्यांवर पावलोपावली पडलेले खड्डे, नाल्या नसल्याने पॉश वस्त्यांमध्येही वाहणारी गटारे यासह विवीध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. न.प.च्या सर्वच शाळांची दुरावस्था झाली आहे. न.प.कार्यालयातही ठिकठिकाणी पाणी गळते. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये यावर्षी मुरूम देखिल टाकण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांवर मुख्याधिका-यांची स्वाक्षरी मिळवणे हे मोठे दिव्य असल्याचा अनुभव घाटंजीकरांना येत आहे. अशातच नगराध्यक्षपदाची ही संगितखुर्ची मात्र शहरवासियांचे मनोरंजन करीत आहे.

युवा नगराध्यक्षाकडून ‘रामराज्या’ची अपेक्षा !
 येत्या ५ ऑगस्टला नगराध्यक्षपदी आरूढ होणार असलेले राम खांडरे हे पालिकेच्या विस्कळीत कारभाराला रूळावर आणतील अशी अपेक्षा घाटंजीकर बाळगून आहेत. एक प्रगतीशील व्यावसायीक, उमदा कार्यकर्ता व सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणुस अशी ओळख असलेले हे व्यक्तीमत्व अन नावामध्ये असलेला ‘राम’ यामुळे त्यांच्याकडून सुराज्याची अपेक्षा केली जात आहे.
अमोल राऊत
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:

Post a Comment