Pages

Friday 2 August 2013

हि शाळा आहे की मुत्रीघर ?

न.प.च्या दुर्लक्षाने उर्दू शाळेची दुरावस्था

जीर्ण ईमारतीमुळे २१२ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात














शाळा म्हणजे विद्येचे भांडार...तिथे ज्ञानाचा दरवळ यावा, विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण असावे हि सर्वांचीच माफक अपेक्षा असते. मात्र घाटंजीतील नगर परिषद प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळेचे चित्र जरा वेगळे आहे. येथिल विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी प्रसन्न वातावरण तर सोडाच पण गटार व मुत्रीघराच्या घाणेरड्या वासाने शाळेमध्ये बसणे दुरापास्त झाले आहे. 
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या शाळेमध्ये वर्ग १ ते ७ मध्ये ४९ मुले व ९३ मुली  तर वर्ग ८ ते १० मध्ये ३२ मुले व ३८ मुली असे एकुण २१२ विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शाळेची ईमारत अत्यंत जीर्ण झाली असुन भिंतीना भेगा पडल्या आहेत त्यातून पाणी झिरपते. विंचु, साप असे धोकादायक जीव जंतू सुद्धा वर्गात येत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. छतावरील कवेलु फ़ुटल्याने
 वर्गात पाणी गळते. एका वर्गखोलीचा स्लॅब खाली झुकला आहे. तो कधीही कोसळु शकतो. परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर टिनाचे शेड टाकुन त्याला स्वयंपाकगृह केले आहे. ६ बाय ८ च्या या जागेतच पोषण आहार शिजवुन विद्यार्थ्यांना उघड्यावरच जेवायला दिले जाते. प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह असावे असा नियम आहे. मात्र उर्दू शाळेमध्ये स्वच्छतागृहच नाही. शाळेलगत असलेल्या न.प.कन्या शाळेचे दोन मुत्रीघर आहे. त्यापैकी वापर करण्या योग्य नसल्याने एक कुलूपबंद तर दुस-या मुत्रीघराचा वापर परिसरातील व्यापारी व नागरिक करतात. न.प.उर्दू शाळा, कन्या शाळा व अंगणवाडी एकाच परिसरात आहेत. मात्र संरक्षक भिंत नसल्याने मुत्रीघर व परिसरामध्ये नागरिक नेहमीच घाण करून ठेवतात. वर्गखोल्यांच्या भिंती, स्वयंपाकगृहाचाही वापर मुत्रीघरासारखाच केल्या जातो. त्यामुळे या परिसरात अत्यंत उग्र दर्प दरवळत राहतो. शिवाय शिक्षीका, विद्यार्थीनींची यामुळे प्रचंड कुचंबना होते. विद्यार्थींनीना तर अत्यंत संकोचलेल्या अवस्थेत परिसरात वावरावे लागते. त्यामुळे अनेक विद्यार्थीनी वर्गाबाहेरच पडत नाहीत.
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची खोलीही जीर्ण झाली आहे. पाणी झिरपत असल्याने भिंती काळवंडल्या आहे. शाळेचे दस्तावेज सुरक्षीत राहतील का याचीही हमी नाही. एकदा तर चोरट्यांनी जीर्ण झालेली खिडकी तोडून कार्यालयातील कपाटे फोडून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली होती. अशा धोकादायक परिस्थितीमध्ये १३१ अल्पसंख्यांक विद्यार्थींनी व ८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी आज दुपारी शाळा व्यवस्थापन समितीसह न.प.कार्यालय गाठले. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयात तक्रार देऊन त्यांना परतावे लागले. नविन जागेवर उर्दू शाळेची ईमारत बांधण्यासाठी न.प.ने २०१२ मध्ये ठराव घेतला आहे. जागा उपलब्ध आहे. नविन ईमारतीसाठी निधीही आला आहे. मात्र तरी देखिल नगर परिषद नविन ईमारत बांधण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शे.सलिम कुरेशी यांनी केला. प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:

Post a Comment