Pages

Friday 2 August 2013

घाटंजी पालिकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे अनुकंपा उमेदवाराची फरफट

जिल्हाधिका-यांचा आदेशही मुख्याधिका-यांसाठी ‘कवडीमोल’
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी शासन निर्णयानुसार पात्र असतांनाही केवळ घाटंजी पालिका मुख्याधिका-यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे विक्की माधव शेंद्रे हा उमेदवार नोकरीपासुन वंचित आहे.
सदर उमेदवाराने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार दि.१४ जुन २०१३ ला जिल्हाधिकारी कार्यालयाने घाटंजी नगर परिषदेला पत्र पाठवुन शासकीय निकषानुसार अनुकंपा तत्वावरील पद भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी असे सुचित केले होते. तसेच या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात यावा असेही या पत्रात नमुद करण्यात आले होते. मात्र जिल्ह्याधिका-यांनी आदेश देऊनही घाटंजी नगर परिषद प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.
त्यामुळे घाटंजी पालिका आता जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही महत्व देत नसल्याचेच सिद्ध झाले आहे. सुधारीत आकृतीबंधानुसार नगर परिषदेने पदभरती करतांना प्रथम पदोन्नतीची पदे, त्यानंतर अनुकंपा त्वावरील पदे, लाडकमिटीची पदे व शेवटी जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली सरळ सेवा भरती द्वारे पदे भरण्याचे निकष ठरवुन देण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदांनी आपल्या आस्थापनेवर कोणतेही पद कंत्राटी, हंगामी, मानधन तत्वावर अथवा प्रतिनियुक्ती द्वारे भरण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवुन नगर परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याच्या प्रयत्नात होते. 
नगर परिषदेच्या ग्रंथालयातील पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यास पात्र असलेला उमेदवार विक्की माधव शेंद्रे याने ग्रंथालय शास्त्रातही पदवी संपादन केली आहे. तसेच तो कला शाखेत पदव्युत्तर पदवीधारक आहे. सदर उमेदवाराचे वडील माधव शेंद्रे यांचा २५ जुन २००६ मध्ये कार्यालयीन कामकाजा दरम्यान मृत्यू झाला. ते लिपिक पदावर कार्यरत होते. त्यामुळे समकक्ष पदावर कार्य करण्यास सदर उमेदवार पात्र आहे. शिवाय अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये तो एकमेव उमेदवार आहे. तरी देखिल न.प.प्रशासनाकडून त्याला नियुक्ती देण्यास जाणिवपुर्वक दिरंगाई केल्या जात असल्याची तक्रार त्याने जिल्हाधिका-यांकडे केली होती. मात्र मुख्याधिकारी विपीन बन्नोरे हे जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही जुमानत नसल्याने कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडीलांच्या निधनामुळे कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी सदर उमेदवारावर आहे. अर्धांगवायुने ग्रस्त आई व तिन बहिणींसह कुटूंबाची उपजिवीका तो कशीबशी सांभाळत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नगर परिषदेला नाही. जिल्हाधिका-यांचा आदेश झुगारणा-या मुख्याधिका-यांवर वरिष्ठांचा अंकुश नाही हे यातुन सिद्ध होत आहे. या प्रकरणी योग्य न्याय न मिळाल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सदर उमेदवाराने ‘सकाळ’ शी बोलतांना सांगितले.
साभार : दै.सकाळ

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:

Post a Comment