Pages

Friday 13 July 2012

घाटंजी न.प.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा ‘तो’ ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविला अवैध

सार्वजनिक उपक्रमाची जागा प्रार्थनास्थळाला दिल्याचे प्रकरण
मुख्याधिका-यांच्या भुमिकेवरही ताशेरे

नगर परिषद निवडणुक डोळ्यापुढे ठेवुन ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाची जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला देण्याबाबतचा घाटंजी न.प.चा वादग्रस्त ठराव जिल्हाधिका-यांनी अवैध ठरवुन तहकुब केला.
येथिल दत्ता बापुराव दातारकर व ईतर तिघांनी नगर परिषदेच्या या निर्णयाविरूद्ध जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली होती. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी जलाराम प्रभाग क्रं.१ मधील बापुराव खांडरे यांच्या ले आऊट मधील सार्वजनिक उपक्रमाकरीता असलेली खुली जागा प्रार्थनास्थळाकरीता दिली होती. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अंतर्गत ८ डिसेंबर २०११ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये विषय पटलावर नसतांना अध्यक्षांच्या परवानगीने हा ठराव मांडून पारित करण्यात आला. यानुसार वात्सल्य बहुउद्देशीय विकास संस्थेला प्रार्थनास्थळासाठी ही जागा मंजुर करण्यात आली होती. मात्र परिसरातील मुलांना खेळण्यासाठी अथवा ईतर सार्वजनिक उपक्रमासाठी असलेली जागा विशिष्ट समाजाच्या प्रार्थनास्थळाला दिल्यामुळे या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणुक आयोगाकडे तक्रारी केल्या.
तसेच जिल्हाधिका-यांकडे याप्रकरणी दाद मागण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड कोडापे यांनी सर्वसाधारण सभेतील ठराव क्रं.२ व न.प.मुख्याधिका-यांच्या आदेशाची अंमलबजावणी व कार्यवाही स्थगीत ठेवण्याबाबत युक्तीवाद केला. न.प.ने ही जागा देतांना त्या परिसरातील भुखंडधारकांची संमती घेतली नव्हती. तसेच खुली जागा ज्या कारणासाठी दिली जावी त्यासाठी न देता विशिष्ट समाजाच्या धार्मिक कारणास्तव देण्यात आल्याने बांधकाम उपविधी व महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिका-यांनी या आदेशास स्थगिती दिली. उल्लेखनिय म्हणजे नगर परिषदेने जिल्हाधिका-यांकडे सादर केलेल्या लेखी उत्तरात ले आऊटमधील जागेच्या १० टक्के जागा सार्वजनिक उपक्रमासाठी अनुज्ञेय असुन प्रार्थना स्थळाला देणे अपेक्षीत नाही असे स्पष्ट नमुद केले आहे. तसेच हा ठराव पारित करतांना नियमांचे पालन झाले नसल्याचे कबुल केले आहे.
मुख्याधिका-यांनी सदर आदेश पारित करतांना ठरावातील सर्व बाजु नियमातील तरतुदीस धरून पडताळून पाहिल्या नसल्याने हा आदेश अवैध ठरत असल्याचे जिल्हाधिका-यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे. शिवाय विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळाकरीता सार्वजनिक उपक्रमाची जागा दिल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असेही आदेशात म्हटले आहे. 
घाटंजी नगर परिषदेच्या तत्कालीन पदाधिका-यांनी केवळ न.प.निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने हा ठराव घेतला होता. त्यावेळी देशोन्नतीने हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते. अशा प्रकारचे अनेक बेकायदेशीर ठराव त्या काळात नगर परिषदेने घेतले असुन त्याची सविस्तर चौकशी झाल्यास अनेक गैरप्रकार पुढे येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment