मनसेच्या धडकेत पितळ उघडे
शेतक-यांचे धान्य साठविण्यासाठी असलेल्या गोदामात फक्त व्यापा-यांचीच धान्य पोती ठेवून असल्याचे सत्य मनसेने धान्य यार्डावर दिलेल्या धडकेत समोर आले.
काही शेतक-यांच्या तक्रारीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी कार्यकत्र्यांसह धान्य यार्डावर जाऊन पाहणी केली असता शेतमाल तारण योजनेचे धान्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामात नामदेव आडे व अविनाश भुरे या व्यापा-यांच्या मालकीचे सुमारे ७५० धान्याची पोती या गोदामात असल्याचे आढळले. तसेच इतरही गोदामात फक्त व्यापा-यांचाच माल ठेवून असल्याचे निदर्शनास आले. उल्लेखनिय म्हणजे नामदेव आडे हे घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. ते स्वत:च बाजार समितीच्या गोदामावर कब्जा करीत असतील तर शेतक-यांनी आपले धान्य कुठे ठेवायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
जे गोदाम शेतक-यांनी आणलेले धान्य ठेवण्यासाठी वापरल्या जाणे अभिप्रेत आहे तिथे व्यापारीवर्ग जागा काबिज करून ठेवत असल्याने शेतक-यांची प्रचंड हेळसांड होते. बाजार समिती प्रशासनही व्यापारी व त्यांना संरक्षण देणारे राजकीय नेते यांच्या दबावाखाली राहुन व्यापा-यांना खुली सुट देत असल्याचे दिसुन येत आहे.
शेतक-यांच्या गोदामावर मालकी हक्क समजणारे बाजार समितीचे संचालक नामदेव आडे यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून कोणतेही भाडे न देता गोदाम वापरल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रशांत धांदे यांनी यावेळी केली.
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांना विचारणा केली असता शेतक-यांचा माल सध्या उपलब्ध नसल्याने काही व्यापा-यांना दोन महिन्यांसाठी या गोदामात धान्य ठेवण्याची मुभा देण्यात आल्याची बाब त्यांनी कबुल केली.
मात्र शेतक-यांची तक्रार असेल तर तिन चार दिवसात गोदाम रिकामे करून घेतल्या जाईल असे त्यांनी सांगितले. घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांची प्रतिक्रीया घेतली असता ते म्हणाले की, व्यापा-यांमध्ये स्पर्धा टिकवून ठेवण्याकरीता समितीला अनेकदा परिस्थितीनुरूप लवचिक धोरण अवलंबावे लागते. मात्र हे करतांना शेतकरी डावलल्या जातात हा आरोप साफ चुकीचा आहे. व्यापारी असतील तरच शेतक-यांचा माल योग्य दरात विकल्या जाईल. व्यापा-यांना झिडकारून चालणार नाही असे ते म्हणाले. शेतक-यांच्या मालाची आवक नसल्याने व व्यापा-यांनी विनंती केल्याने काही कालावधीसाठी गोदाम देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment