तक्रार होऊनही गुन्हा दाखल नाही
कौटुंबिक वादातून सोळा वर्षीय युवतीस शिविगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीविरूद्ध पारवा पोलीसांनी अद्याप कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पारवा पोलीसांच्या या मनमानी कारभाराबाबत फिर्यादींनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. गुन्ह्याची तिव्रता दडपण्यात हातखंडा असलेल्या ठाणेदार पंजाब वंजारे यांनी या प्रकरणात आरोपीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करता ‘मर्ग’ नोंद करण्याची किमया केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छाया संजय राठोड (१६) रा.भंडारी ता.घाटंजी ही युवती दि.८ जुलै रोजी विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता आरोपी विनोद मोहन जाधव याने कौटुंबिक वादातून सदर युवतीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तिने विष प्राशन केले. प्रकृती गंभिर झाल्याने तिला आर्णी ग्रामिण रूग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभिर असुन तिचेवर उपचार केल्या जात आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही पारवा पोलीसांनी घटनेची चौकशी न करता मर्ग दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या युवतीचे अद्याप बयाण देखिल नोंदविण्यात आले नाही असे तिचा पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.
घटनेतील आरोपीची पत्नी मिरा विनोद जाधव ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या युवतीची आत्या आहे. विनोद जाधव हा त्याच्या पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याने ती माहेरी राहात आहे. पतीकडून होत असलेल्या छळाबाबत तिने याआधी पारवा पोलीस स्टेशनमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०१० व १७ नोव्हेंबर २०१० रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. मात्र पारवा पोलीसांनी सदर आरोपीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही हे विशेष.
सावळी येथे कार्यरत ‘गणेश’ नामक पोलीस शिपाई या आरोपीला पाठीशी घालीत असल्याचा आरोप होत आहे. पारवा ठाणेदाराचा ‘वसुली अधिकारी’ म्हणुन परिचीत असलेल्या या गणेशने आजवर या आरोपीवर गुन्हा दाखल होऊ दिल्या नसल्याचेही बोलल्या जात आहे.
महिन्याभरापुर्वीच सव्वा लाखांची चोरी ७० हजारात दडपण्याचा प्रकार ठाणेदार पंजाब वंजारेनी केला होता. तर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल न करता चक्क ‘मर्ग’ नोंद करण्याचे ‘धाडस’ त्यांनी दाखविले आहे. आता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नेमकी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment