Pages

Sunday 29 July 2012

अन ते मुख्यमंत्र्यांची वाट बघतच राहीले.......!





गेल्या दोन तिन दिवसात ज्यांच्या येण्याच्या अपेक्षेने पुरग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या ते मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण येणार नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. सारेच येऊन गेले, सांत्वना केली, पोटाची आग तात्पुरती शमविली पण भविष्याचे काय? असा प्रश्न पडलेल्या पुरग्रस्तांना मुख्यमंत्री घाटंजी तालुक्यात येतिल अन मोडून पडलेल्या संसाराला मदतीचा हात देतील अशी वेडी अपेक्षा पुरात सर्वस्व गमावलेले ग्रामस्थ बाळगून होते. लोकांनी दिलेल्या मदतीवर कुठवर जगायचे? दानशुर लोक काही दिवस पोटाची सोय करतील. 
मात्र जगण्याच्या आधाराचे काय? डोक्यावर हक्काचे छप्पर कधी येणार? अशा एक ना अनेक समस्यांनी वेढलेल्या पुरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या दौ-याकडून खुप आशा होती. आज सकाळी १० वाजेदरम्यान मुख्यमंत्री अकोलाबाजार व त्यानंतर मांजर्डा, बोरगाव (पुंजी), कोळी, पारवा या गावांना भेटी देऊन पुरग्रस्तांशी संवाद करणार होते. या दौ-यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. ज्या गावापर्यंत अद्याप पाणीही पोहचले नव्हते तेथे सकाळपासुनच पाण्याचे टँकर पोहचले. जेवण्याचीही सोय झाली. मुख्यमंत्री ज्या रस्त्यांनी जाणार ते रस्तेही निट करण्यात आले होते. मुख्यमंत्री येण्याची वार्ता येताच एवढा बदल होऊ शकतो तर ते आल्यावर आपल्या सर्व समस्याच निकाली निघतील अशी आशा अनेकांना होती. मात्र सारेच काही फसवे निघाले. कारण कोणतेही असो पण त्यांनी काही मिनिटांसाठी तरी यायला पाहीजे होते असे सर्वांनाच वाटले. त्यांच्या ऐवजी ना.राजेंद्र मुळक, प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे, ना.शिवाजीराव मोघे, अ निलेश पारवेकर यांनी काही भागाचा आज दौरा केला मात्र मदत घेतांना फोटो काढुन काढुन थकलेल्या पुरग्रस्तांसाठी ते पुरेसे नव्हते. 
गाडी आली की नागरीक त्यातून कोण येतंय हे मोठ्या उत्सुकतेने पाहात होते. एवढा ऊहापोह झाल्यावर मुख्यमंत्री येणार नाहीत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या गावाला मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजीत नव्हता तेथिल नागरिकही आपल्या खचलेल्या घराबाहेर त्यांच्या येण्याची वाट पाहात होते. 
आपले पांढरेशुभ्र कपडे वाचवित गावातील चिखल तुडवित आलेले ईतर काही नेते आपल्याला सल्ले देण्यापलीकडे काही करणार नाहीत याची तालुक्यातील पुरग्रस्तांना  खात्री होती. 
एवढ्या बिकट परिस्थितीत ते भेट देऊन गेले हीच एक समाधानाची बाब. मात्र त्यांच्या भेटीने साध्य काय केले हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. केवळ शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा करू असे नेहमीचे आश्वासन पुरग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकणार नाही. यामध्ये ना.मनोहर नाईकांनी तालुक्यातील सर्व पुरग्रस्तांच्या विस दिवसांच्या जेवणाची घेतलेली ‘व्यक्तीगत’ जबाबदारी नक्कीच कौतुकास पात्र आहे. गृह तालुक्यातील नेत्यांना मात्र हे सुचले नाही. पुरग्रस्तांसाठी होणारी प्रत्येक मदत स्वागतार्ह आहे. मात्र ती देतांना होणा-या फोटोसेशनला थोडा आवर घातला तर मदत घेणा-यांचा स्वाभिमान दुखावणार नाही. आज मदत घेण्यासाठी पुढे येणा-या याच आपत्तीग्रस्तांकडे आपल्याला भविष्यात मतांची भिक मागायला जावे लागेल व तेव्हा ते फोटो काढण्याचा आग्रह करणार नाहीत. मग आता त्यांना मदतीचा हात देतांना प्रसिद्धीचा अट्टाहास का ? यावर सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment