Pages

Friday 27 July 2012

शिवणी प्रा.आ.केंद्रात गावगुंडाचा धुमाकूळ

महिला कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ला
कार्यालयातील सामानाची प्रचंड तोडफोड

तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातीलच एका गुंड प्रवुत्तीच्या युवकाने प्रचंड धुमाकुळ घातल्याने आरोग्य कर्मचा-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वुत्त असे की, काल ( दि.२४) ला रात्री ९ च्या सुमारास संदिप श्रावण जाधव हा युवक जखमेवर पट्टी बांधण्याचे कारण सांगून आरोग्य केंद्रात आला. संबंधीत विभागाचे कर्मचारी वाघाडे त्याला पट्टी करण्यासाठी गेले असता त्याने अश्लिल शिवीगाळ केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने कार्यालयात तोडफोड करण्यास सुरूवात केली. 
टेबल, खुर्च्या, खिडक्यांची तावदाने फोडली. औषधांची फेकाफेक करण्यास सुरूवात केली. ही आरडाओरड ऐकुन परिचारीका कुसूम मानकर व कुसूम वेट्टी बाहेर आल्या. सदर युवकाने त्यांनाही अश्लिल शिवीगाळ करण्यास केली. कुसूम मानकर या अपंग परिचारीकेला मारहाण केली. वायरच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना थापडा मारून ढकलुन दिले. वेट्टी यांनाही त्याने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा कर्मचा-यांच्या निवासस्थानाकडे वळविला. निवासस्थानाच्या दरवाज्यावर लाथाबुक्क्या मारून आतील सामानाची  फेकाफेक  केली. वैद्यकीय अधिका-याच्या निवासस्थानाबाहेरही त्याने असाच धुमाकूळ घातला. या संपुर्ण प्रकाराने धास्तावलेल्या कर्मचा-यांनी घाटंजी पोलीस स्टेशन व वरिष्ठांना याबबत कळविले. शिवणी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन गेडाम हे त्यावेळी बाजुच्या गावात साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. 
त्यांनी लगेच आरोग्य केंद्र गाठले. तसेच घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर हे सुद्धा घटनास्थळी पोहचले. मात्र तोवर सदर आरोपी तेथुन पसार झाला होता. घाटंजी पोलीसांनी त्याचेविरूद्ध अप.क्र.५५/०१२ कलम ३३२, ३५३, २९४, ५०६, ४२७ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र लगेच त्याची जामिनावर मुक्तताही करण्यात आल्याची माहिती आहे. या गावगुंडाविरोधात पंधरा दिवसांपुर्वी ग्रामपंचायतीच्या बांधकामाची तोडफोड करून सरपंच व ग्रामसेवकाला धमकी दिल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याचेविरूद्ध पोलीसांनी मवाळ भुमिका घेतली होती. हा युवक गावात नेहमीच अशा प्रकारचा धिंगाणा घालीत असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस विभाग त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या संपुर्ण प्रकारामुळे कर्मचारी भयभीत झाले असुन अशा हिंसक प्रवुत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment