Pages

Showing posts with label गुन्हा. Show all posts
Showing posts with label गुन्हा. Show all posts

Friday, 1 February 2013

घाटंजी सेना तालुका प्रमुखासह सात जणांविरूद्ध वाटमारीचा गुन्हा

ग्रामसेवक व पं.स. लेखापालाचा समावेश
राजकीय दबावातून कार्यवाही झाल्याचा आरोप

रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याच्या कारणावरून टिटवी येथिल ईसमास शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल यांचेसह सात व्यक्तींनी  मारहाण करून त्यांच्या जवळील मुद्देमाल लुटल्याची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनला करण्यात आली. यावरून शिवसेना तालुका प्रमुख भरत माणिक दलाल, महेंद्र माणिक दलाल, ग्रामसेवक बापु खंडूजी पाटील, घाटंजी पं.स.मध्ये कार्यरत लेखापाल जगदिश अंबादास गंधरवार, किसन संभाजी भोजेवार, अशोक संभाजी भोजेवार, अर्जुन शंकर धोत्रे यांचे विरूद्ध अप.क्र.१९/०१३ कलम ३४१, १४७, १४८, १४९, ३२६, ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार या सात ईसमांनी फिर्यादी गजानन कर्णुजी शेंडे व गोपाल उमरे यांची दुचाकी अडवुन त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात हे दोघे जखमी झाले. त्यापैकी गोपाल उमरे यांचेवर यवतमाळ येथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात आरोपींनी कथितपणे फिर्यादी जवळील त्यांच्या जवळील १२ ग्रम वजनाची सोन्याची साखळी, दोन मोबाईल व १० हजार रूपये रोख हिसकावून घेतले. ही घटना येथिल पंजाबी लॉनजवळ दि.२८ जानेवारीला रात्री ८.३० वाजता घडली. यातील जखमी व्यक्तींनी रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाने या सातही आरोपींना २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवसेना पदाधिका-यांसह दोन शासकीय कर्मचा-यांवर थेट वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मारहाण व भांडणाचा मुद्दा समजण्यासारखा आहे. मात्र वाटमारी बाबत शंकेला वाव आहे. एरवी गुन्हा दाखल करतांना सरकारी वकीलांशी ‘सल्लामसलत’ करणा-या घाटंजी पोलीसांनी या प्रकरणी तडकाफडकी गुन्हा दाखल केला. टिटवी येथिल रोहयोच्या भ्रष्टाचार प्रकरणात ग्रामसेवक पाटील यांचेसह एका अभियंत्याचे निलंबन झाले आहे. तर आता या प्रकरणामध्ये दोन कर्मचारी अडकले आहेत. त्यामुळे राजकीय ओढाताणीमध्ये आणखी किती कर्मचा-यांचा बळी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस बनले राजकीय हस्तक - शिवसेना
शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल यांचेसह सात जणांविरूद्ध हेतुपूरस्सरपणे कलम ३९५ अन्वये जी कार्यवाही करण्यात आली ती अन्यायकारक आहे. कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल केले. पोलीस एका राजकीय पुढा-याच्या ईशा-यावर काम करीत आहे. पोलीस राजकीय हस्तक झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी संतप्त प्रतिक्रीया शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर यांनी व्यक्त केली. या अन्यायाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात येईल तसेच न्यायालयातही दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 29 January 2013

घाटंजीत चार मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न

पालकांमध्ये दहशतीचे वातावरण

येथिल इंदिरा आवास परिसरातून १० ते १२ वर्ष वयोगटातील चार मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न त्या मुलींच्या प्रसंगावधानामुळे फसला. आरोपी संदिप रमेश चौधरी (२४) व रवि अंगद मोरे (२३) या दोघांनी वैष्णवी मेघराज रंदई (१२) हिच्यासह तिन मुलींना मारूती ओमनी व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसविले. मुलींनी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जिवाने मारण्याची धमकी दिली. चोरांब्याजवळ आरोपींनी गाडी थांबविली. त्यावेळी या मुलींनी प्रसंगावधान ठेवून गाडीचा दरवाजा उघडला व बाहेर निघाल्या. तेवढ्यात रस्त्याने येत असलेल्या दुचाकीस्वाराला पाहुन त्या आरोपींनी पळ काढला. दुचाकीस्वारासोबत त्या मुलींनी घाटंजी गाठले व हा सर्व प्रकार आपल्या पालकांपुढे कथन केला. वैष्णवी हिचे वडील मेघराज सखाराम रंदई (४१) यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपींविरूद्ध कलम ३६३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा तपास पी.एस.आय.राऊत करीत आहेत.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 22 November 2012

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी



मुरली तांड्यावरील गुप्तधनासाठी नरबळी प्रकरणातील ३ आरोपींना आज ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी राजु ताकसांडे याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तिसNया दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांना आरोपींची केवळ एक दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाली. ‘देशोन्नती’ च्या बातमीमध्ये वर्तविलेल्या शक्यतेप्रमाणे ही पोलीस कोठडी केवळ औपचारीकताच ठरली. या एका दिवसात पोलीसांनी आरोपींकडून कोणतीही माहिती काढल्याचे वृत्त नाही. या घटनेतील सुमारे आठ ते दहा आरोपी कोण आहेत? ती मुलगी कोण होती? चोरंबा येथिल बेपत्ता असलेली मुलगी तिच तर नाही ना? हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. घटनेच्या रात्रीपासुनच आरोपी विषयी सहानुभूती असलेल्या प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले यांच्याकडेच या घटनेचा तपास राहिल्याने कोणत्याही माहितीविना सर्व आरोपी अखेर न्यायालयीन कोठडीत सुरक्षीत झाले. आता यापुढे पोलीस सदर घटनेचा नेमका काय तपास करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घटनास्थळावर सर्व संशयास्पद पुरावे आढळूनही पोलीस या घटनेला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची वास्तविकता मान्य करायलाच तयार असल्याचे दिसत नाही. विस ते पंचेविस दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही सुगावा लागलेला नाही. दिड हजार लोकसंख्येच्या गावातून एक सात वर्षीय चिमुकली बेपत्ता होते. मात्र त्या प्रकरणातही पोलीस तपास शुन्यच आहे. घाटंजी पोलीसांचा हा ‘कारभार’ पाहता पोलीस नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यांचेवर वरिष्ठांचा वचक नाही का? प्रभारी ठाणेदार गुरनूले यांची कार्यपद्धती यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. आरोपींविषयी त्यांना नेहमीच असलेली ‘सहानुभूती’ संशयास्पद असते. मात्र वरिष्ठांकडून आजवर याबाबत त्यांचेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. यावेळी तर चक्क गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न व बेपत्ता असलेली सात वर्षीय मुलगी असा धडधडीत गंभीर प्रकार स्पष्ट असतांना पोलीसांचा तपासच संशयाच्या भोवNयात सापडला आहे. पोलीस दलातील वरिष्ठही या प्रकरणी गंभिर असल्याचे दिसत नाही याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा या प्रकरणी लक्ष घालतील अशी अनेकांना अपेक्षा होती. एवंâदरीतच या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्पâत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


Wednesday, 21 November 2012

अखेर गुप्तधन प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल

श्वानपथकही घुटमळले
तपास अद्याप जैसे थे
मुख्य सुत्रधार मोकळेच  





गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या गंभिर प्रकरणात अखेर काल (दि.२०) ला रात्री घाटंजी पोलीसांनी चार आरोपींविरूद गुन्हा दाखल करून अटक केली. 
अशोक गंगाराम दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा, राजेश उर्फ  राजु पांडूरंग ताकसांडे, अरूण हरिभाऊ ताकसांडे दोघेही रा.मुरली यांचेविरूद्ध अप.क्र.९५/१२ कलम ३६३, ३६४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज दुपारी यवतमाळ येथुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पोलीसांना या प्रकरणात तपासाची दिशा गवसली नाही की, त्यांना तपासच करायचा नाही याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे. चार आरोपी अटकेत आहेत. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे घटनेत दहा ते बारा आरोपी होते. मात्र ते कोण होते याची अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती घेतल्याचे दिसत नाही. त्यातही पोलीसांना आरोपीची केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक मुलगी बेपत्ता असल्याचा संशय असतांना चार दिवसात पोलीसांनी ज्या आरोपींकडून एक शब्दही वदवून घेतला नाही ते एका दिवसात काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पोलीस या तपासात कोणता ‘उजेड’ पाडणार हे स्पष्ट आहे. घटनेपासुन काही लोक पोलीस स्टेशनच्या आवारात घाबरलेल्या अवस्थेत घुटमळताना दिसत आहेत. जमानत घेण्याची हमी देऊन आरोपींना घरून आणताहेत. ते नेमके कशासाठी? या प्रकरणात त्यांना एवढा जिव्हाळा का निर्माण झाला याबाबत चर्चेला ऊत आले आहे.  या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या ‘नॉर्मल’ भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.  या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 


Friday, 13 July 2012

आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीला पारवा पोलीसांचे संरक्षण

तक्रार होऊनही गुन्हा दाखल नाही

कौटुंबिक वादातून सोळा वर्षीय युवतीस शिविगाळ व मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपीविरूद्ध पारवा पोलीसांनी अद्याप कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
पारवा पोलीसांच्या या मनमानी कारभाराबाबत फिर्यादींनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. गुन्ह्याची तिव्रता दडपण्यात हातखंडा असलेल्या ठाणेदार पंजाब वंजारे यांनी या प्रकरणात आरोपीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करता ‘मर्ग’ नोंद करण्याची किमया केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छाया संजय राठोड (१६) रा.भंडारी ता.घाटंजी ही युवती दि.८ जुलै रोजी विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता आरोपी विनोद मोहन जाधव याने कौटुंबिक वादातून सदर युवतीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तिने विष प्राशन केले. प्रकृती गंभिर झाल्याने तिला आर्णी ग्रामिण रूग्णालय व त्यानंतर यवतमाळ येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभिर असुन तिचेवर उपचार केल्या जात आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही पारवा पोलीसांनी घटनेची चौकशी न करता मर्ग दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या युवतीचे अद्याप बयाण देखिल नोंदविण्यात आले नाही असे तिचा पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. 
घटनेतील आरोपीची पत्नी मिरा विनोद जाधव ही आत्महत्येचा प्रयत्न करणा-या युवतीची आत्या आहे. विनोद जाधव हा त्याच्या पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करीत असल्याने ती माहेरी राहात आहे. पतीकडून होत असलेल्या छळाबाबत तिने याआधी पारवा पोलीस स्टेशनमध्ये दि. १७ ऑक्टोबर २०१० व १७ नोव्हेंबर २०१० रोजी लेखी फिर्याद दाखल केली आहे. मात्र पारवा पोलीसांनी सदर आरोपीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही हे विशेष. 
सावळी येथे कार्यरत ‘गणेश’ नामक पोलीस शिपाई या आरोपीला पाठीशी घालीत असल्याचा आरोप होत आहे. पारवा ठाणेदाराचा ‘वसुली अधिकारी’ म्हणुन परिचीत असलेल्या या गणेशने आजवर या आरोपीवर गुन्हा दाखल होऊ दिल्या नसल्याचेही बोलल्या जात आहे. 
महिन्याभरापुर्वीच सव्वा लाखांची चोरी ७० हजारात दडपण्याचा प्रकार ठाणेदार पंजाब वंजारेनी केला होता. तर आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल न करता चक्क ‘मर्ग’ नोंद करण्याचे ‘धाडस’ त्यांनी दाखविले आहे. आता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक नेमकी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
साभार :- देशोन्नती