ग्रामसेवक व पं.स. लेखापालाचा समावेश
राजकीय दबावातून कार्यवाही झाल्याचा आरोप
रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याच्या कारणावरून टिटवी येथिल ईसमास शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल यांचेसह सात व्यक्तींनी मारहाण करून त्यांच्या जवळील मुद्देमाल लुटल्याची तक्रार घाटंजी पोलीस स्टेशनला करण्यात आली. यावरून शिवसेना तालुका प्रमुख भरत माणिक दलाल, महेंद्र माणिक दलाल, ग्रामसेवक बापु खंडूजी पाटील, घाटंजी पं.स.मध्ये कार्यरत लेखापाल जगदिश अंबादास गंधरवार, किसन संभाजी भोजेवार, अशोक संभाजी भोजेवार, अर्जुन शंकर धोत्रे यांचे विरूद्ध अप.क्र.१९/०१३ कलम ३४१, १४७, १४८, १४९, ३२६, ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार या सात ईसमांनी फिर्यादी गजानन कर्णुजी शेंडे व गोपाल उमरे यांची दुचाकी अडवुन त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात हे दोघे जखमी झाले. त्यापैकी गोपाल उमरे यांचेवर यवतमाळ येथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात आरोपींनी कथितपणे फिर्यादी जवळील त्यांच्या जवळील १२ ग्रम वजनाची सोन्याची साखळी, दोन मोबाईल व १० हजार रूपये रोख हिसकावून घेतले. ही घटना येथिल पंजाबी लॉनजवळ दि.२८ जानेवारीला रात्री ८.३० वाजता घडली. यातील जखमी व्यक्तींनी रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने आरोपींनी हे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाने या सातही आरोपींना २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिवसेना पदाधिका-यांसह दोन शासकीय कर्मचा-यांवर थेट वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मारहाण व भांडणाचा मुद्दा समजण्यासारखा आहे. मात्र वाटमारी बाबत शंकेला वाव आहे. एरवी गुन्हा दाखल करतांना सरकारी वकीलांशी ‘सल्लामसलत’ करणा-या घाटंजी पोलीसांनी या प्रकरणी तडकाफडकी गुन्हा दाखल केला. टिटवी येथिल रोहयोच्या भ्रष्टाचार प्रकरणात ग्रामसेवक पाटील यांचेसह एका अभियंत्याचे निलंबन झाले आहे. तर आता या प्रकरणामध्ये दोन कर्मचारी अडकले आहेत. त्यामुळे राजकीय ओढाताणीमध्ये आणखी किती कर्मचा-यांचा बळी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस बनले राजकीय हस्तक - शिवसेना
शिवसेना तालुका प्रमुख भरत दलाल यांचेसह सात जणांविरूद्ध हेतुपूरस्सरपणे कलम ३९५ अन्वये जी कार्यवाही करण्यात आली ती अन्यायकारक आहे. कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल केले. पोलीस एका राजकीय पुढा-याच्या ईशा-यावर काम करीत आहे. पोलीस राजकीय हस्तक झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी संतप्त प्रतिक्रीया शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकुर यांनी व्यक्त केली. या अन्यायाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात येईल तसेच न्यायालयातही दाद मागणार असल्याचे ते म्हणाले.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment