पोलीस तपासाचे गौडबंगाल काय?
जनतेचा सवाल
मुरली येथिल गुप्तधन प्रकरणातील आरोपींची जामिनावर मुक्तता झाली. पोलीसांनी ९० दिवसांच्या कालावधीत आरोपपत्रच दाखल न केल्याने त्याचा फायदा आरोपींना झाला. प्रसारमाध्यमे, सामाजीक संघटना व ठराविक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखुन त्या विरोधात आवाज उठवला. मात्र का कोण जाणे घाटंजी पोलीसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेने सुद्धा या प्रकरणात अपेक्षीत अशी कर्तव्यतत्परता न दाखविल्याने कोणताही निष्कर्ष न निघता हे प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. तालुक्यातील चोरांबा गावची सात वर्षीय चिमुकली सपना गोपाल पळसकर दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता आहे. ती या गुप्तधन शोधणा-या टोळीच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पोलीसांनी सुरूवातीपासुनच या दृष्टीने तपास केला नाही. आरोपी सांगतील तेच बयाण प्रमाण समजुन केवळ कागदी सोपस्कार पार पाडल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार, लक्ष्मण एंबडवार, अरूण ताकसांडे, राजु ताकसांडे यांनी सुरूवातीच्या चौकशीत एकहात्या मारोती मंदिरात हनुमान चालिसा वाचायला गेल्याचे सांगितले होते. त्या नंतर परिस्थिती पाहुन गुप्तधन शोधण्यासाठीच गेल्याची कबुली दिली. मात्र मुलगी सोबत नसल्याचे सांगितले. गुप्तधन शोधणारी टोळी केवळ चार जणांची नसते हे पोलीसांना सांगण्याची गरज नाही. मात्र या प्रकरणात गावक-यांनी पकडून दिलेल्या आरोपी व्यतिरिक्त एकही आरोपी पोलीसांना गवसला नाही. या टोळीने यापुर्वी कुठे गुप्तधन शोधले का? या टोळीत आणखी किती सदस्य आहेत? धन सापडल्यावर त्याची विल्हेवाट ते कशी लावणार होते? यासह कोणत्याच बाबतीत पोलीस तपास पुढे गेला नाही. केवळ दबाव आहे म्हणुनच तपासाचा ‘उहापोह’ करायचा एवढाच एक उद्देश पोलीस तपासात दिसला.
घटनेच्या दिवसापासुनच पोलीसांची सहानुभूती आरोपींच्या बाजुने असल्याचे दिसुन आले. प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सोडून देणे, गंभिर कलम असतांना केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी, आरोपींना आलिशान गाडीतून नेण्याची मुभा व आता आरोपपत्र दाखल न केल्याने मिळालेला जामिन यावरून पोलीसांच्या एकुणच कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे. त्या टोळीसोबत मुलगी नव्हतीच हे पोलीस आरोपींपेक्षाही ठासुन सांगतांना दिसले. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत. फिर्यादीने मुलीचा आवाज ऐकलाच नसेल. तो त्याचा भ्रम आहे. अशा काथ्याकुटा व्यतिरिक्त पोलीसांनी काही केले नाही. कदाचित ही दोन्ही प्रकरणे वेगळी असुही शकतात. पण बेपत्ता सपनाचा शोध घेऊन पोलीसांनी ते देखिल सिद्ध केले नाही. दोन्ही प्रकरणे ‘वेगळी’ आहेत केवळ हिच बाब सिद्ध करण्याचे आव्हान पोलीसांनी स्विकारले की काय असे पोलीसांच्या भुमिकेवरून निदर्शनास आले. प्रकरण ‘थंड’ होऊ द्या, सपना नक्कीच सापडेल. असा सुर देखिल ऐकु येत होता. त्यामुळे या प्रकरणा भोवती असलेले संशयाचे मळभ अधिकच गडद झाले. सामाजीक संघटना व तालुक्याबाहेरील नेत्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सि आय डी तपास करण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा प्रशासनानेही तसा अहवाल पाठविला होता. मात्र चौकशीचा आदेश पुढे सरकलाच नाही. त्यामुळे पाणी नेमके कुठे मुरले? हा प्रश्न उपस्थित झालाय. पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य अनास्थेमुळे सपना ही आदिवासी मुलगी अजुनही बेपत्ता आहे. तिचा शोध लागून या प्रकरणातील नेमके वास्तव बाहेर येईल याची आशा आता जणु मावळलीच आहे. याला जबाबदार कोण हे आता जनताच ठरविणार आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment