Pages

Friday 22 February 2013

३३ वर्षांच्या न्यायदानाचा घाटंजीकरांच्या साक्षीने सन्मान

माजी न्यायमुर्ती गिलानी यांना ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’


 मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती तथा घाटंजी तालुक्याचे भुमीपूत्र एम.एन.गिलानी यांना शिवजयंती उत्सवात यंदाच्या वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली ३३ वर्ष न्यायदानाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घाटंजीचे नगराध्यक्ष किशोर दावडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरवचिन्ह, मानपत्र व शाल श्रिफळ देऊन माजी न्यायमुर्ती गिलानी यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी हजारो घाटंजीकरांनी उभे राहुन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
सत्काराला उत्तर देताना माजी न्यायमुर्ती गिलानी म्हणाले की, ज्या मातीत राहुन मी लहानाचा मोठा झालो त्या मातीत होत असलेल्या सत्काराने मन उचंबळून येत आहे. अशा पुरस्काराने कधी गौरव होईल असे कधीच वाटले नव्हते. यावेळी गिलानी यांनी आपल्या लहाणपणाच्या आठवणींना उजाळा दिला. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त करून समाजाची संवेदनशीलता कमी होत असल्याबाबत खेद व्यक्त केला. दिल्लीच्या घटनेवर अवघा देश पेटून उठतो. मग त्यापेक्षाही भयंकर असलेल्या कृत्याचा अपेक्षीत त्या प्रमाणात निषेध होत नाही. समाजाचे मन बोथट झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रसार माध्यमे सुद्धा अशा घटनांना पाहिजे त्या प्रमाणात गांभिर्याने घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर किती राजकारण्यांनी त्या ठिकाणी भेट देण्याचे सौजन्य दाखविले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. स्वत:वर होत असलेला अन्याय सहन करण्याची समाजाची मानसिकता होत आहे. अन्याय सहन करू नका, त्याचा प्रतिकार करा. महिलांनी देखिल अन्यायाविरोधात पुढे यावे. प्रसंगी शिवाजीराजांची तलवार उपसावी. मात्र मुकाटपणे राहु नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल व जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगुन या विचारांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक केले.
याप्रसंगी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या शिरोली येथिल धावपटू महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन राजेश उदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक महाकुलकर, प्रपुâल्ल अक्कलवार, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजु गिरी, प्रमोद टापरे, नाना राठोड यांनी परिश्रम घेतले. 

.....अन न्यायमुर्ती भावूक झाले !

वीर राजे संभाजी पुरस्कार स्विकारल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना माजी न्यायमुर्ती गिलानी यांना गहिवरून आले. बराच वेळ त्यांना बोलणेही सुचत नव्हते. बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले. त्यावेळी सर्वत्र शांतता पसरली होती. बालपणाच्या व शैक्षणीक जिवनातील आठवणी सांगतांना ते भावूक झाले होते. भावना बाजुला सारून आजवर नि:पक्षपणे न्यायदान करणा-या न्यायमुर्तींना भावनिक झालेले पाहुन वातावरण गहिवरून गेले होते.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment