घाटंजी शहराच्या एकंदरीत अवस्थेकडे नजर टाकली तर येथे नगर परिषद खरंच कार्यरत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. गेल्या महिन्यात न.प.च्या विषय समित्यांचे नव्याने गठण झाले. न.प.निवडणुकीनंतरच्या एका वर्षात अपेक्षे प्रमाणे काहीच घडले नाही. बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या चारही विषय समित्यांचा कारभार सुमारच राहिला आहे. घाटंजी नगर परिषदेंतर्गत आरोग्य सभापती आहे मात्र कर्मचा-या अभावी आरोग्य यंत्रणाच अस्तित्वात आहे की नाही असे चित्र आहे. शहराच्या अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ पॉश वस्त्यांमध्येच न.प.च्या कचरा उचलणा-या गाड्या जातात. सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने अनेकांनी पाणी रस्त्यावरच सोडले आहे. त्यामुळे शहराला डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यासाठी नगर परिषदेकडून कोणत्याही उपाययोजना होतांना दिसत नाही.
पाणी पुरवठ्याचीही तशीच परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणी पुरवठ्याचे नियोजन आजवरच्या पदाधिका-यांनी केले नाही. केवळ वाघाडी नदीच्या पाण्यावरच घाटंजीकरांची तहान भागते. मध्यंतरी नगर परिषदेने नविन नळ कनेक्शन देणेच बंद केले होते. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक वस्त्यांमध्ये पाणी पोहचत नाही. सार्वजनिक पाणवठ्यावर नागरिकांना रात्र जागुन काढावी लागते. शहरासाठी महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना प्रस्तावीत आहे. मात्र ती कधी कार्यान्वयीत होणार याची वाट घाटंजीकर पाहात आहेत.
नगर परिषदेच्या शाळांची अवस्थाही काही वेगळी नाही. अनुभवी आणी दर्जेदार शिक्षक असताना शाळेतील विद्यार्थी संख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. एकीकडे गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक मेहनत घेतात. मात्र अनेक बाबतीत नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या प्रयत्नातून अपेक्षीत अशा गोष्टी साध्य झाल्या नाही.
बांधकामाबाबत तर काही बोलण्याचीही सोय नाही. रस्ते, नाल्या, रपटे बांधकाम तर एवढ्या सुमार दर्जाचे आहे की, अवघ्या काही महिन्यातच त्याचे खरे स्वरूप निदर्शनास येते. बाबासाहेब देशमुख कॉलनीतून बसस्थानकाकडे जाणारा रस्ता, शिवाजी चौक ते पंचायत समिती यासह काही सिमेंट रस्ते बांधकाम होताच अवघ्या चार ते पाच महिन्याच्या काळात उखडले. आता त्यावर केवळ डागडूजी करून मोठा घोळ लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगर परिषदेच्या नविन विषय समित्यांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. बहुतांश पदाधिकारी जुनेच आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे अनेक आव्हाने असली तरी त्यांच्या कडून खुप अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही यांची घाटंजीकरांना खात्री पटली आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment