पारव्यात आठवणींचा महापुर
हजारोंची गर्दी...माणसे तितक्या आठवणी...! त्यातच भर पडली ती जुन्या छायाचित्रांच्या फलकांची. येणारा प्रत्येकजण ही छायाचित्रे न्याहाळत स्व.निलेश पारवेकरांची छबी आपल्या डोळ्यात साठवुन पुढे जात होता. हे चित्र होते स्व.आ. निलेश पारवेकरांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे. अनेकांचा तर या वास्तविकतेवर विश्वासच बसत नव्हता की नेहमी हसतमुखाने सर्वांना सामोरे जाणारे एक निखळ व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही. एरवी पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे देशभर फिरणा-या निलेश पारवेकरांना समाधीत विसावलेले पाहुन अनेकांच्या डोळ्यातून नकळतच अश्रु तराळले. घाटंजी तालुक्यातील त्यांच्या ओळखीचा कोणी व्यक्ती त्यांना कुठेही आढळला तर ते आवर्जुन गाडी रस्त्यात थांबवुन त्यांची आस्थेने चौकशी करीत होते. पारव्यात येतांनाही ते अनेकांशी बोलत येत असत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांच्या विषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता. ‘‘मालकानं आमच्यासाठी लय केलं, कितीतरी लोकायचे आशिर्वाद त्यायनं घेतले. अशा सोन्यासारख्या मानसाले देवानं नेलं. लय वाईट केलं. मालक होते म्हनुन मोठमोठे लोक आमच्या गावात येत होते. आता कोन येईल?’’ असे संवाद पारव्याच्या रस्त्यारस्त्यावर ऐकु येत होते.
आमदार निलेश पारवेकर यांच्या कर्तृत्वाच्या भव्यतेबद्दल सर्वसामान्य पारवावासियांना तेवढी माहिती नव्हती. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी आलेल्या मोठ्या हस्तींमुळे आपण समजत होतो त्यापेक्षा ते खुपच मोठे होते. एक मोठं नेतृत्व आपण गमावलं याची जाणिव झाल्याने दु:खावेग अधिकच वाढला. सकाळपासुनच पारव्याकडे जाणा-या रस्त्यावर वर्दळ सुरू होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास तर येणा-यांचा लोंढा अधिकच वाढला. येणा-या प्रत्येकाच्या मनात होती हळहळ एक उदयोन्मुख नेतृत्व अन जिवाभावाचा माणुस गमावल्याची.
सगळीकडे फक्त निलेशच निलेश !
पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी येणा-या प्रत्येकाला पारव्यात सगळीकडे निलेश पारवेकरच दिसत होते. त्यांच्या चाहत्यांनी आपल्या भावना फलकांच्या माध्यमातुन व्यक्त केल्या होत्या. तर वाड्यापासुन कार्यक्रम स्थळापर्यंत जाणा-या मार्गावर तसेच कार्यक्रम स्थळी निलेश पारवेकरांच्या आठवणींना उजाळा देणा-या छायाचित्रांचे फलक लावण्यात आले होते. या आठवणी येणा-या प्रत्येकाने आपल्या मनपटलावर कायमच्या साठवुन घेतल्या.
No comments:
Post a Comment