Pages

Monday 18 February 2013

न्यायदानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणा-या ‘भुमिपूत्राचा’ आज सन्मान

माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांना ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व घाटंजी तालुक्याचे भुमिपूत्र न्या.एम.एन.गिलानी यांना उद्या दि.१९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवात शिवतिर्थ, जेसिस कॉलनी येथे शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल राहतील. मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, नगराध्यक्ष किशोर दावडा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
राजे छत्रपती सामाजिक संस्था, घाटंजीच्या वतीने दरवर्षी शिक्षण, साहित्य, कला तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या विभुतीला वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येते. यापुर्वी उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, व-हाडी कवी शंकर बडे, मुंबई येथिल शिवस्मारकाचे निर्माते भरत यमसनवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वीर शहिद संजय शिंदे, एच.एम.टी.तांदूळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
माजी न्यायमुर्ती एम.एन.गिलानी हे घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा गावचे मुळ रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही घाटंजी तालुक्यातच झाले आहे. नागपुर येथिल विधी महाविद्यालयातून त्यांनी विधी स्नातक ही पदवी प्राप्त केली. सन १९८० साली प्रथम न्याय जिल्हाधिकारी व त्यानंतर जिल्हा न्यायाधिश म्हणुन त्यांनी नागपुर, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी कार्य केले. टाडा या महत्वाच्या कायद्याचे विशेष न्यायाधिश म्हणुन त्यांची नियुक्ती झाली होती हे विशेष. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव य महत्वाच्या पदावर त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. दि.१७ मार्च १९११ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात नियुक्ती झाली. दोन वर्ष त्यांनी या पदावर कार्य केले. नुकतेच ते या पदावरून निवृत्त झाले आहेत. न्यायदानाच्या क्षेत्रात तब्बल ३३ वर्षे निर्भीड, नि:स्पृह व निस्वार्थपणे केलेल्या सेवेचा सन्मान म्हणुन त्यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. तत्पुर्वी शिवजयंती महोत्सवात सायंकाळी ५ वाजता शिवपुजन होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ता तथा विचारवंत राजर्षी पाटील (नांदेड) यांचे ‘जिजाऊ शिवबांच्या विचारातूनच महिला अत्याचाराला प्रतिबंध शक्य’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होईल. या सर्व कार्यक्रमांना घाटंजीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजे छत्रपती सामाजिक संस्था तथा संभाजी ब्रिगेड, तालुका घाटंजीचे राजेश उदार, दिपक महाकुलकर, प्रफुल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, श्रीकांत पायताडे, राजु गिरी, अनिल मस्के यांनी केले आहे. 

गुलाबी थंडीत हास्याची मेजवानी

अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा पसरलाय. या गोड गुलाबी थंडीत यंदा घाटंजीकरांना मेजवानी मिळणार आहे ती खदखदून हसण्याची. शिवजयंती उत्सवात सायंकाळी ७ वाजता हिंदी हास्य कवी संमेलनाचे आयोजन शिवतिर्थावर करण्यात आले आहे. आपल्या विनोदी व बहारदार संचालनाने देशभरात नावाजलेले हास्य कवी किरण जोशी (अमरावती), मनोज मद्रासी (निजामाबाद), हिंदी वाहिन्यांवरील हास्य कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटविणारे यवतमाळचे कपील जैन (बोरूंदीया) व हास्यकवी राजा धर्माधीकारी (परतवाडा) हे या कवी संमेलनात श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत. अनेकांच्या खास आग्रहास्तव घाटंजीकरांसाठी या नि:शुल्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment