Pages

Monday 9 January 2012

नव्या नगरसेवकांपुढे अपेक्षा अन आव्हानांचा डोंगर


नगर परिषदेतील निवडीचे कार्यक्रम एकदाचे संपले. घाटंजीकरांनी निवडून दिलेले नवे नगरसेवक आता काहीसे स्थिरावले आहेत. यावेळी जनतेने नव्या चेह-यांना प्रामुख्याने संधी दिली आहे. १७ पैकी तब्बल १३ नगरसेवक नवखे आहे. त्यांना नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती होण्यास काही कालावधी नक्कीच लागेल. मात्र नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांची हे पद भुषविण्याची दुसरी वेळ आहे. त्यामुळे शहरातील समस्यांशी ते अवगत आहेत. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आल्याने संख्याबळाचीही चिंता नाही. एकंदरीतच या अगोदरच्या सत्ताधा-यांसारखा बहुमत नसल्याचा राग या आघाडीला आळवता येणार नाही.
घाटंजी शहर विकासाच्या बाबतीत कोसो दुर आहे. निवडणुक काळात सर्वांनीच मतदारांना विकासाची स्वप्ने दाखविली. मात्र विकास होईल अशी खोटी आशा देखिल मनात बाळगण्यास घाटंजीकर तयार नाहीत. खरं तर विकासाच्या वाटेवर चालण्यासही अजुन घाटंजी शहराला बराच काळ लागेल. विकास होणे हा लांबचा पल्ला आहे. नागरिकांना सध्या गरज आहे ती रस्ते, नाल्या, पाणी, स्वच्छता व लोकाभिमुख सेवेची. या प्राथमिक गरजा पुरविण्यास जरी सध्याचे नगरसेवक यशस्वी ठरले तरी जनतेच्या दृष्टीने तो विकासच ठरेल. गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सत्तेवर असलेल्या निगरगट्ट पदाधिका-यांमुळे घाटंजीकरांचा नगर परिषदेवरील विश्वासच उडाला आहे. निवडणुकीवर डोळा ठेवुन शहरात विवीध विकासकामांची वेगाने सुरूवात करण्यात आली होती. प्रमुख रस्त्यांचे बांधकाम निवडणुक होईस्तोवर झालेही. मात्र ईतर कामे निवडणुक आटोपताच थंड पडली आहेत. त्यामुळे ही कामे केवळ निवडणुक डोळ्यापुढे ठेवुनच एवढ्या तडकाफडकी सुरू करण्यात आली होती ही बाब सिद्ध झाली आहे. निवडणुक काळात प्रचारासाठी लावण्यात आलेल्या मोठमोठ्या होर्डींग्सवरील रोषणाईने शहर न्हाऊन निघाले होते. मात्र आता   रस्त्यांवर अंधार दाटला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील ८० टक्के पथदिवे रात्री बंद असतात. शिवाय या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.  याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या बगिच्यांमध्ये सध्या जनावरे चरायला जातात. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या शहरात केवळ एक नाममात्र सार्वजनिक मुत्रीघर आहे. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांनी सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याने अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.
अशा एकापेक्षा एक समस्यांचे आव्हान नव्या दमाच्या नगरसेवकांपुढे आहे. शिवाय निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांमुळे त्या अपेक्षांचेही ओझे आहे. या अपेक्षांच्या पुर्ततेकरीता नगरसेवक आपली शक्ती पणाला लावतात की, एकमेकांवर कुरघोडी करण्यात शक्ती वाया घालवतात याकडेच घाटंजीकर नजरा लावुन बसले आहेत.
अमोल राऊत

No comments:

Post a Comment