Pages

Friday, 13 January 2012

आता घाटंजी तालुक्यातील नेत्यांच्या अस्तित्वाची परिक्षा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष, नेते व कार्यकर्त्यांची लगबग वाढ़ली आहे. काही नेत्यांना तर निवडणुक पुढे दिसताच ग्रामिण भागातील जनतेचा पुळका येतो. मात्र निवडणुकीच्या अगोदर विकासकामांचा देखावा उभा केला तर काय होते हे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येईल. मात्र नेते परिणामांची चिंता न करता पाऊले उचलत आहेत ही त्यांच्यासाठीच धोक्याची घंटा आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील आमदार खासदारांच्या अस्तित्वाचीच परिक्षा या निवडणुकीतुन होणार आहे. तिन जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणुक होणार आहे. नगर परिषद निवडणुकीपुर्वी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते सुरेश लोणकर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीमध्ये आल्याने कॉंग्रेसची ताकत अर्ध्यावर आली असे मानल्या जात आहे. मात्र असे असले तरी नगर परिषद निवडणुकीमध्ये या अपेक्षीत असा पक्षांतराचा काहीच प्रभाव दिसला नाही. उलट राष्ट्रवादीला एका जागेचे नुकसान झाले. लोणकरांची शहरात फारसी पकड नसली तरी ग्रामिण भागात त्यांना मानणारा एक वर्ग आहे. सध्या तालुक्यातील सहकारी संस्थांवर त्यांचेच वर्चस्व आहे. लोणकरांना शिवणी सर्कलमधुन राष्ट्रवादीची उमेदवारी जवळजवळ निश्चित समजल्या जात आहे. मात्र त्यामुळे या जागेसाठी ईच्छुक असणारे राष्ट्रवादीतील मुळचे दावेदार दुखावल्या जाणार हे निश्चित. ते खुल्या दिलाने सहकार्य करणार का यावरही बरेच काही अवलंबुन राहणार आहे. मागील निवडणुकीत  पारवा सर्कलमधुन कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभुत करून निवडुन आलेले अपक्ष जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार सध्या कॉंग्रेसच्याच गोतावळ्यात मिरवतांना दिसतात. कॉंग्रेस पक्षात प्रवेश झालेला नसला तरी कॉंग्रेसच्या प्रत्येकच कार्यक्रमात त्यांची आवर्जुन हजेरी असते. यावेळी पारवा सर्कलमधुन आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे काटपेल्लीवार यावेळीही अपक्ष उमेदवारी दाखल करणार की त्यांच्या ‘पुनर्वसनाची’ व्यवस्था करण्यात आली आहे हे लवकरच स्पष्ट होईल. सध्याच्या परिस्थितीवरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांचेसह जि.प. व पंचायत समिती मध्ये मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे.
या भागाचे लोकप्रतिनिधी व सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, लोकनेते असे बिरूद लावणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर व अण्णासाहेब पारवेकर, तसेच तालुक्यातील एक वजनदार व्यक्तीमत्व तथा यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागणार आहे.

No comments:

Post a Comment