‘शिवणी’चा तिढा सुटता सुटेना
उमेदवार लागले प्रचाराला
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला आता रंग चढण्यास सुरूवात झाली असुन बहुतांश उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. घाटंजी तालुक्यात जिल्हा परिषदेचे तिन गट व पंचायत समितीचे ६ गण अशा एकुण ९ जागांकरीता निवडणुक होणार आहे.
पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित झाले असले तरी कोणत्याही पक्षाने अद्याप आपले अधिकृत उमेदवार जाहिर केले नाहीत. शिवणी गटात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजुनही काथ्याकुट चालु आहे. सुरेश लोणकर, सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी ओढाताण सुरू आहे. लोणकरांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून नामांकन दाखल केले. तर सतिश भोयर व जितेंद्र ठाकरे हे सुद्धा उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. या विचित्र परिस्थितीमुळे पक्षश्रेष्ठी हतबल, कार्यकर्ते संभ्रमात व मतदार कोड्यात पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधुम जिल्हाभरात सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूकांना जि.प. व पं.स.च्या सत्तेचे डोहाळे लागले आहेत. अस्ताव्यस्त पसरलेला मतदारसंघ, प्रचंड मतदार संख्या या पार्श्वभूमीवर निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अनेकांनी विविध राजकिय पक्षांची तिकीटे मिळवण्याची खटपट सुरु केली आहे. विविध पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊगर्दी झाली असून अनेकांनी तिकीटे मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. परंतू ऐनवेळी तिकीट कोणाला मिळणार? तिकीटाच्या शर्यतीतून पत्ता कोणाचा कापला जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याने ३० तारखेपर्यंत ईच्छुक उमेदवारांच्या डोक्यावर टांगती तलवारच राहणार आहे.
गट व गणात एकाच पक्षातील तुल्यबळ उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. यातून बंडखोरीची समस्या निर्माण झाली. या बंडखोरीला लगाम लावण्यासाठी नेतेमंडळींनी व्युहरचना आखली आहे. परंतू यास जुमानता काही बंडखोर निवडणुक लढून जिंकता नाही आले तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याची भूमिका वठविण्याची शक्यता आहे. उमेदवारीचा घोळ तात्काळ मिटत नसल्याने विरोधी पक्षाआधी पक्षांतंर्गत स्पर्धकाबरोबर शह- कटशहाचे राजकारण करत स्पर्धा करीत तिकीट मिळवण्याची लढाई खेळण्याची वेळ आली आहे. या पक्षांअंतर्गत लढाईतही धनशक्तींचीच सरशी होत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते संतप्त होत आहेत. बहूतेक ठिकाणी उमेदवाराचे निष्कलंक चारित्र्य, राजकीय कौशल्य, या गुणाऐवजी निवडणुकीत धनशक्तीचा जोर दाखवू शकणा-या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून प्राधान्य दिले जात असल्याची खंत सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सगळीकडे सध्या राजकारण्यांची धामधुम सुरू आहे. खेड्यातील रस्त्यांवर धुळ उडवित बेफामपणे जाणा-या वाहनांचा ताफा, मागील निवडणुकीनंतर गावात अवतरलेले नेते, स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारी भाषणे यामुळे ग्रामिण भागातील वातावरण निवडणुकमय झाले आहे. तर दुसरीकडे मतदार संघातील जनता नागरी समस्यांच्या विळख्याने होरपळून निघत आहे. अनेक ठिकाणी मुलभूत सुविधांचीही वाणवा आहे. रस्ते, पाणीपुरवठा,वीजसेवा, शिक्षण, आरोग्य, आदीसह विविध नागरी समस्यामुळे मतदार त्रस्त आहेत. निवडणुका आल्या की गावपुढा-यांकडून विकासाच्या गप्पा मारल्या जातात. नंतर मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते अशी संतप्त प्रतिक्रीयाही मतदारातून व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment