Pages

Tuesday 20 November 2012

पोलीसांचा तपास फिर्यादीच्या चौकशीवरच खोळंबला

घाटंजी तालुक्यातील गुप्तधन प्रकरण
मुख्य सुत्रधार अद्याप मोकळेच
फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
पोलीसांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप





गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस तपासात वृत्त लिहिस्तोवर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. घाटंजी पोलीसांनी दडपलेले हे गंभिर प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी पुढे आणल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी याची दखल घेत घटनेचा तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे सोपवला. मात्र तरी देखिल घटनेच्या रात्री जामिनावर सोडण्यात आलेल्या आरोपींचे बयाण घेण्यापलीकडे पोलीसांचा तपास पुढे गेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा केवळ फिर्यादीचीच खडसावून चौकशी करीत असल्याचे दिसुन येत आहे. घटनास्थळी आरोपींना नेऊन त्यांची चौकशी करण्या ऐवजी तपास अधिका-यांनी आज फिर्यादीचीच ‘परेड’ घेतली. एस.डी.पी.ओ.महाजन यांनी आज फिर्यादी विजय चव्हाण याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी त्याची पुन्हा विचारपुस करण्यात आली. आरोपींना कसे पकडले? घटना नेमकी कशी घडली? हा सर्व घटनाक्रम त्याच्या कडून जाणुन घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सदर फिर्यादीला आज सकाळपासुनच पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते. या उलट आरोपी पोलीस स्टेशनच्या मैदानात मोकळ्या हवेत बसलेले होते. पोलीसांच्या या उलट वागणुकीमुळे आरोपी कोण व फिर्यादी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्वत:ची पर्वा न करता चिमुकला जीव वाचविण्यासाठी गुप्तधन शोधणा-या टोळीशी दोन हात करणा-यांवरच पोलीस तपासाच्या नावाखाली दबाव निर्माण करीत असतील तर अशा प्रकरणात कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. या संपुर्ण प्रकरणात घाटंजीचे प्रभारी ठाणेदार अरूण गुरनुले यांची भुमिका सुरूवाती पासुनच आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचीच राहिली आहे. एवढा गंभिर आरोप असलेल्या आरोपींना घटनेच्या रात्रीच जामिनावर सोडणे, तांत्रिक अडचणी दाखवुन तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कार्यवाही करणे, अप्रत्यक्षपणे फिर्यादीवर दबाव टाकणे, घटनास्थळी ग्रामस्थांना दिसलेला सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात न आढळणे व घटनास्थळावरील परिस्थितीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले हे घटनेचा तपास करताहेत की आरोपी कसे निसटतील यासाठी प्रयत्न करीत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी व संबंधीतांसह गुरनुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासुन त्यांचीही कसुन चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांचेशी संपर्वâ केला असता ‘अजुन चौकशी सुरू आहे’ अशी थंड प्रतिक्रीया त्यांनी दिली. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या नॉर्मल भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.

चोरांब्याच्या ‘त्या’ बेपत्ता मुलीचे गुढ कायम

दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता असलेल्या घाटंजी तालुक्यातील चोरांब्याच्या सपना गोपाल पळसकर (वय ७ वर्ष) हिच्या बाबतीतही पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. तिच्या आईने काल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन गुप्तधन प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा व राजु ताकसांडे रा.मुरली यांचेसह ईतर अज्ञात आरोपींनीच मुलीला पळवुन नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा सदर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 

1 comment: