Pages

Showing posts with label आरोपी. Show all posts
Showing posts with label आरोपी. Show all posts

Wednesday, 12 December 2012

........यापुढे सपनाच्या शोधासाठी एस.पी. व जिल्हाधिका-यांना घेराव

न्याय द्या मोर्चामध्ये निरंजन मसराम यांचा ईशारा


गेल्या दोन महिन्यांपासुन रहस्यमयरित्या बेपत्ता असलेल्या सपनाचा शोध पोलीसांना घेता आला नाही. तर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न करणा-या व पळुन गेलेल्या आरोपीनाही पोलीस शोधु शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा धुसर झाल्याने पुढची दिशा म्हणुन आठवडाभरानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना आदिवासी बांधवांना नाईलाजास्तव घेराव घालावा लागणार असा ईशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष निरंजन मसराम यांनी आज घाटंजी येथे दिला.
ते गों.ग.पा.तर्फे घाटंजी तहसिलवर काढण्यात आलेल्या न्याय द्या धडक मोर्चाला संबोधीत करत होते. त्यांनी पुढे सांगितले की, सपनाचे आईवडील मजुरी करतात. ते परिस्थितीने गरिब आहेत. सपना ही चिमुकली बालिका आहे. त्यामुळे तिचे अपहरण खंडणी अथवा अनैतिक कारणासाठी झाले असे म्हणता येणार नाही. ती गावातून साणासुदीच्या दिवशी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. त्यावेळी संशयास्पदपणे गावातील विज गेली होती. तसेच तिला पळवुन नेत असतांना कदाचीत ती ओरडू नये म्हणुन तिला खाण्यातून अथवा प्रसादातून गुंगीचे औषध दिले असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या दरम्यान दि.१७ ऑक्टोबर रोजी मुरली येथे रात्रीच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या एकहात्या मारोती मंदिराजवळ एका बालिकेचा किंकाळीचा आवाज विजय चव्हाण या नागरिकाने ऐकल्यावर गावकरी तेथे धावुन गेले. त्यामुळे गुप्तधन शोधणा-या टोळीतील दोन आरोपी सापडले. आता चार आरोपी अटकेत आहेत. पोलीसांनी सपना पळसकर हिच्या अपहरणाचा व गुप्तधनाच्या प्रकरणाचा परस्पर संबंधाची शक्यताही तपासली नाही. या घटनेतील अनेक अज्ञात आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचाही शोध घेण्याची मानसिकता पोलीसांमध्ये दिसत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. आदिवासी बांधवांवर कितीही अन्याय झाला विंâवा त्याला कापुन टाकण्याचाही प्रयत्न झाला तरी तो पेटून ऊठणार नाही ही भावना तुमच्याप्रती एकप्रकारची रूढ झालेली आहे. म्हणुन आदिवासींवरील अन्यायाला शासनही गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारात क्रांतीची ठिणगी टाकुन न्यायासाठी पेटून ऊठले पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. मतदार संघातील आपलेच आदिवासी नेते व सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे दोन महिन्यात एकदाही सपनाच्या आईवडीलांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. यावरून त्यांना आदिवासी बांधवांविषयी किती कळवळा आहे हे दिसुन येते. एवढ्या गंभिर घटनेबद्दल त्याना गांभिर्य नसल्याबद्दल मसराम यांनी आश्चर्य व्यक्त केले. सपनाचा त्वरीत शोध न घेतल्यास विधानसभेवर मशाल मोर्चा काढण्याचा ईशाराही त्यानी यावेळी दिला. या मोर्चाला गों.ग.पा.चे जिल्हाध्यक्ष श्रिराम तलांडे, माजी तहसिलदार रामचंद्र मडावी, विठ्ठल धानोरकर, नाना टेकाम, जितेंद्र धुर्वे, सुदर्शन टेकाम, निमपाल राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निरंजन मसराम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसिलदार प्रकाश राऊत यांना निवेदन दिले.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 20 November 2012

पोलीसांचा तपास फिर्यादीच्या चौकशीवरच खोळंबला

घाटंजी तालुक्यातील गुप्तधन प्रकरण
मुख्य सुत्रधार अद्याप मोकळेच
फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
पोलीसांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड संताप





गुप्तधनासाठी ‘नरबळी’ देण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी पोलीस तपासात वृत्त लिहिस्तोवर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. घाटंजी पोलीसांनी दडपलेले हे गंभिर प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी पुढे आणल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. वरिष्ठांनी याची दखल घेत घटनेचा तपास पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्याकडे सोपवला. मात्र तरी देखिल घटनेच्या रात्री जामिनावर सोडण्यात आलेल्या आरोपींचे बयाण घेण्यापलीकडे पोलीसांचा तपास पुढे गेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी सुद्धा केवळ फिर्यादीचीच खडसावून चौकशी करीत असल्याचे दिसुन येत आहे. घटनास्थळी आरोपींना नेऊन त्यांची चौकशी करण्या ऐवजी तपास अधिका-यांनी आज फिर्यादीचीच ‘परेड’ घेतली. एस.डी.पी.ओ.महाजन यांनी आज फिर्यादी विजय चव्हाण याला घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी त्याची पुन्हा विचारपुस करण्यात आली. आरोपींना कसे पकडले? घटना नेमकी कशी घडली? हा सर्व घटनाक्रम त्याच्या कडून जाणुन घेण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे सदर फिर्यादीला आज सकाळपासुनच पोलीस स्टेशनला बसवुन ठेवण्यात आले होते. या उलट आरोपी पोलीस स्टेशनच्या मैदानात मोकळ्या हवेत बसलेले होते. पोलीसांच्या या उलट वागणुकीमुळे आरोपी कोण व फिर्यादी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. स्वत:ची पर्वा न करता चिमुकला जीव वाचविण्यासाठी गुप्तधन शोधणा-या टोळीशी दोन हात करणा-यांवरच पोलीस तपासाच्या नावाखाली दबाव निर्माण करीत असतील तर अशा प्रकरणात कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे येईल का याचाही विचार करणे गरजेचे आहे. या संपुर्ण प्रकरणात घाटंजीचे प्रभारी ठाणेदार अरूण गुरनुले यांची भुमिका सुरूवाती पासुनच आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचीच राहिली आहे. एवढा गंभिर आरोप असलेल्या आरोपींना घटनेच्या रात्रीच जामिनावर सोडणे, तांत्रिक अडचणी दाखवुन तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल न करता केवळ प्रतिबंधक कार्यवाही करणे, अप्रत्यक्षपणे फिर्यादीवर दबाव टाकणे, घटनास्थळी ग्रामस्थांना दिसलेला सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात न आढळणे व घटनास्थळावरील परिस्थितीकडे पुर्णपणे दुर्लक्ष करणे यामुळे सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले हे घटनेचा तपास करताहेत की आरोपी कसे निसटतील यासाठी प्रयत्न करीत आहेत असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपी व संबंधीतांसह गुरनुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासुन त्यांचीही कसुन चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांचेशी संपर्वâ केला असता ‘अजुन चौकशी सुरू आहे’ अशी थंड प्रतिक्रीया त्यांनी दिली. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या नॉर्मल भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे.

चोरांब्याच्या ‘त्या’ बेपत्ता मुलीचे गुढ कायम

दस-याच्या दिवसापासुन बेपत्ता असलेल्या घाटंजी तालुक्यातील चोरांब्याच्या सपना गोपाल पळसकर (वय ७ वर्ष) हिच्या बाबतीतही पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. तिच्या आईने काल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन गुप्तधन प्रकरणातील आरोपी अशोक दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा व राजु ताकसांडे रा.मुरली यांचेसह ईतर अज्ञात आरोपींनीच मुलीला पळवुन नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा सदर आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला नाही. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 18 September 2012

वाहतुक पोलीसाच्या सतर्कतेने सापडला वॉन्टेड आरोपी



खुनाच्या गुन्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासुन घाटंजी पोलीसांना वॉन्टेड असलेला आरोपी श्रावण रामाजी आत्राम हा वणी येथे वाहतुक पोलीसांच्या तावडीत सापडला. २०१० मध्ये इंझाळा मार्गावर कैलास अवथळे रा.माथनी हे त्यांच्या पत्नीसह रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जात असतांना अन्य आरोपींसह त्यांना लुटण्याच्या हेतुने अडवुन खुन केला होता. त्यातील दुसरा आरोपी अटकेत आहे. मात्र श्रावण आत्राम हा तेव्हापासुन फरारी आहे.
याबाबत विस्तृत माहिती अशी की, आरोपी श्रावण आत्राम ईतर दोन मित्रांसह एकाच दुचाकीवर वणी नांदेपेरा रस्त्याने जात असतांना वाहतुक नियमाचे उल्लंघन केले म्हणुन वाहतुक पोलीस उमेश चंदन यांनी त्यांना अडविले. यावेळी अब्दुल कलीम व नितिन खांदवे हे वाहतुक पोलीस कर्मचारीही तिथे होते. या पोलीसांनी त्यांना ६०० रूपये दंड लागेल असे सांगितले. त्यावरून त्यांनी पोलीसांशी वाद घातला. त्यापैकी एकाने मी सैन्यदलात असल्याचे सांगितले. पोलीसांनी गाडी पोलीस स्टेशनला लावा असे सांगितल्यावर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. त्यापैकी एकजण पोलीसांशी येऊन बोलु लागताच ईतर दोघांनी त्याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. तु दंड का भरला असे विचारून त्या तिघांमध्ये मारामारी सुरू झाली. त्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेले. चौकशीत दोघांनी मारेगाव (ता.घाटंजी) येथे राहात असल्याचे सांगितले. तर श्रावण आत्राम याने वांजरी (ता.वणी) येथिल पत्ता सांगितला. तसेच आपले नाव श्रावण बापुराव आत्राम असल्याची माहिती त्याने दिली. वाहतुक पोलीस कर्मचारी उमेश चंदन हे यापुर्वी घाटंजी पोलीस स्टेशनला कार्यरत असल्याने त्यांना श्रावण आत्राम नामक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती होती. त्यांनी ही माहिती संबंधीतांना देऊन वांजरी येथे श्रावण आत्रामची चौकशी करण्याबाबत सुचविले. या चौकशीत सदर आरोपीचे नातेवाईक तेथे राहत असल्याची बाब पुढे आली. त्यांना श्रावणचे पुर्ण नाव विचारले असता श्रावण रामाजी आत्राम हे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलीसांचा संशय बळावला. उमेश चंदन यांनी घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये विचारणा करून माहितीची खात्री करून घेतली. घाटंजी पोलीसांसह अदिलाबाद, पुलगाव, वर्धा पोलीसांना हवा असलेला श्रावण आत्राम हाच असल्याची खात्री पटल्यावर घाटंजी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये त्याचेवर कलम ३९७, ३०२, २१६, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल आहे. वाहतुक पोलीस कर्मचारी उमेश चंदन, अब्दुल कलीम, नितीन खांदवे यांच्या सतर्कतेमुळे हा वॉन्टेड आरोपी पोलीसांच्या कचाट्यात सापडला.यानेही मनसेच्या या आरोपाला दुजोरा दिला.
साभार :- देशोन्नती