Pages

Wednesday 22 February 2012

घाटंजीचे ग्रामदैवत संत मारोती महाराजांच्या यात्रेला सुरुवात




विदर्भात सर्वदुर प्रसिद्ध असलेल्या घाटंजीतील संत मारोती महाराज व तुकाराम महाराज यांच्या भव्य यात्रेला सुरुवात झाली आहे. दि.५ मार्च पर्यंत विवीध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. महाशिवरात्रीपासुन यात्रेला सुरूवात होते. 
ब्रम्हलीन परमहंस श्री. मारोती महाराज व श्री. तुकाराम महाराज हे घाटंजी शहराचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी त्यांच्या नावाने घाटंजीत माघ वद्य प्रतिपदा ते वद्य अमावस्या पर्यंत भव्य यात्रा भरते. मारोती महाराजांच्या घाटंजीतील अवतरणाचा इतिहास फार जुना आहे. दि. २५ फेब्रुवारी १९४९ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी मारोती महाराज घाटंजीत प्रकट झाले. महाराजांचा जन्म तामसा नदिच्या तिरावर असलेल्या पिंपळगावात सन १८९२ साली सप्टेंबर महिन्यात झाला. पिता बळीरामजी चिवरकर व आई रेणुकाबाई यांचे ते खुप लाडके होते. महाराजांना शाळेत जाणे मुळीच आवडत नसे. ते शाळेला दांडी मारून नदिच्या वाळूत बसुन रहात असत. 
शाळेची घंटी होताच ते घरी जात. मात्र तरी देखील दरवर्षी ते परिक्षेत पास व्हायचे. त्यांचे वडील कोंडवाड्यात कारकुन होते. महाराजांचे ७ व्या वर्गापर्यंत शिक्षण झाल्यावर ते दापोरी खुर्द येथे शिक्षक पदी रूजू झाले. त्यानंतर त्यांच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. मात्र त्यांनी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. या काळातच त्यांनी सिद्धांत बोध ग्रंथ वाचला. त्यानंतर त्यांचे मन:परिवर्तन झाले. आईवडीलांचा मृत्यु झाल्यानंतर १९२७ मध्ये सावत्र आई यमुनाबाई यांच्याजवळ मंगरूळपीर तालुक्यातील इंझोरी येथे राहण्यास गेले. तेथे असलेल्या शिंपीनाथ बाबांच्या समोर असलेल्या निंबाच्या झाडावरच ते रात्रंदिवस राहु लागले. या काळात त्यांनी अन्नग्रहण केले नाही. कधी कधी ते धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराजांच्या भेटीसाठी जात असत. एकदा मुंगसाजी महाराजांनी त्यांना भिंतीच्या खांडावर बसण्यास सांगीतले. सुमारे १३ दिवसपर्यंत बाबा तेथेच बसुन होते. या काळात मुंगसाजी महाराज त्यांना चटणीचे गोळे खायला देत असत. या परिक्षेत मारोती महाराज खरे उतरल्याने मुंगसाजी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले. या दरम्यान दारव्हा पुसद भागात भ्रमण करतांना अनेकांना बाबांच्या दैवी शक्तींचा साक्षात्कार झाल्याने त्यांच्या शिष्यांमध्ये वाढ होऊ लागली. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लोक बाबांना शरण येत असत. एकदा मरणासन्न अवस्थेत असलेल्या बालकाला त्यांचेकडे आणले असता त्यांनी त्याचे तोंडात एक गोटा कोंबला. त्यामुळे ते बालक मरण पावले. त्या बालकाचे आई वडील संतप्त झाले. त्यांनी पोलीसात तक्रार दिली. पोलीस आल्यावर बाबांनी पोलीसांना शिव्या दिल्या व म्हणाले कोण म्हणतो ते बालक मृत आहे? असे बोलुन त्यांनी तोंडातील गोटा काढला. अन चमत्कार असा की ते मुल रडायला लागले. विषेश म्हणजे ते मुल सर्व व्याधींपासुन मुक्त झाले होते. तेव्हापासुन त्या मुलाचे आईवडील व इतर अनेक लोक बाबांचे निस्सिम भक्त झाले. १९४६ मध्ये मुंगसाजी महाराज मुंबईला गेल्यावर मारोती महाराज घाटंजी नगरीत आले. यवतमाळ जिल्ह्यात फिरत असतांना अनेक लोक त्यांची सेवा करू लागले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव डी.पी. पेटकर व गणपतराव भोसले यांची बाबांवर श्रद्धा होती. माघ वद्य १३ रोजी २५ फेब्रुवारी १९४९ रोज शुक्रवार ला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रवण नक्षत्रावर दुपारी बाराच्या सुमारास बाबा घाटंजीत आले. बाबांचे भक्त पेटकर व भोसले यांनी बाबांना रामचंद्र भोंग यांच्या घरी थांबवीले. आजही भोंग यांच्या निवासस्थानी बाबांचे ठाणे असुन बाबा बसायचे त्या बंगळीवर पादुका ठेऊन आहेत.
घाटंजीत घालविलेल्या काळात बाबांच्या शक्तीमुळे अनेक लोक त्यांचे भक्त होऊ लागले. घरोघरी त्यांची पुजा होत होती. बाबा घाटंजीत आले तेव्हा त्यांचेकडे पाहुन हा कुणी संत आहे का यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र लोकांना आलेल्या अनुभूतीवरून त्यांच्या दैवी शक्तीची प्रचीती आल्याने ते घाटंजीकरांचे दैवत बनले. बाबांच्या चमत्कारांची किर्ती सर्वदुर पसरायला लागली. मसुद संस्थानचे राजेसाहेब बाबांच्या दर्शनाकरीता आले. शिवाय बडोदा संस्थानच्या राणी सुद्धा घाटंजीत आल्या. त्यावेळी त्यांनी पायदळ संपुर्ण गावातुन पेâरफटका मारला. त्यानंतर बाबांचे दर्शन घ्यायला दुरदुरचे लोक यायला लागले. दि, ११ ऑक्टोबर १९५३ रोजी कामठवाडा येथे चंपत पाटील यांच्या घरी बाबांच्या परमभक्त लोढीनबाई यांच्या मांडीवर डोके ठेऊन मारोती महाराजांचे निर्वाण झाले. त्यावेळी घाटंजी येथुन पेटकर, भोसले, पुरणसिंग बैस, रामचंद्र भोंग यांच्यासह शेकडो लोक दिंड्या घेऊन कामठवाडा येथे गेले. तिथुन बाबांचे पार्थिव घाटंजी येथे आणण्यात आले. येथे समाधी देऊन त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. तेव्हापासुन दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवसापासुन घाटंजीत संत श्री मारोती महाराजांची भव्य यात्रा भरविण्यात येते. लाखो भाविक या दरम्यान महाराजांच्या दर्शनासाठी येतात. घाटंजीचे ग्रामदैवत म्हणुन संत श्री मारोती महाराजांचा लौकीक आहे. तसेच संत तुकाराम महाराजांचेही याच ठिकाणी मंदिर आहे.
यावर्षी यात्रेनिमित्य आयोजीत सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन न.प.अध्यक्ष जगदिश पंजाबी, न.प.उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, शिक्षण सभापती राम खांडरे, आरोग्य सभापती शोभा ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती संगिता भुरे, नगरसेवक संदिप बिबेकार, मुख्याधिकारी गिरिष बन्नोरे यांचेसह सर्व नगरसेवक व कर्मचा-यांनी केले आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment