Pages

Showing posts with label जिल्हाधिकारी. Show all posts
Showing posts with label जिल्हाधिकारी. Show all posts

Saturday, 17 March 2012

विधानमंडळ सदस्यांच्या निधनाची माहिती तात्काळ कळवा

हयगय झाल्यास जिल्हाधिका-यांवर कार्यवाही
मुख्य सचिवांचे सक्त निर्देश

महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजी-माजी सदस्यांचे निधन झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने विधानमंडळ सचिवालयास कळवावी असे सक्त आदेश राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबत हयगय झाल्यास थेट मुख्य सचिवांच्या स्तरावर जिल्हाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कार्यवाही केली जाणार आहे. विधीमंडळाच्या आजी-माजी सदस्याचे निधन झाल्यास शोक प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येतो. मात्र अनेकदा माहीती वेळेवर पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सदस्यांच्या निधनाची माहीती अधिवेशन चालु असतांना २४ तासांच्या आत व ईतर वेळी १५ दिवसांच्या आत विधीमंडळ सचिवालयाला कळवावी लागणार आहे. यापुर्वीही अनेकदा याबाबत आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांकडून त्याचे पालन होत नसल्याने २४ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासनाने याबाबत कठोर धोरण अवलंबून निधनाची माहिती वेळेवर न पोहचल्यास संबंधीत जिल्हाधिका-यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येणार आहे.  निधन झालेल्या आजी-माजी सदस्याची संपुर्ण माहिती, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे नाव व पत्ता असा तपशील कळविण्यात यावा असे सक्त निर्देश मुख्य सचिवांनी निर्गमीत केले आहेत.


बियर बारमध्ये २० हजारांची चोरी

येथिल तहसिल समोर असलेल्या समाधान बियर बार मध्ये काल रात्री अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप फोडून २० हजार रूपये रोख लंपास केले. फिर्यादी विक्रम घनश्याम जयस्वाल यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असुन तपास सुरू आहे.
साभार :- देशोन्नती 



Thursday, 26 January 2012

राज्यात उघडणार नवीन पर्यटनस्थळांचे दालन

पर्यटनस्थळांची निवड करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना 
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयात ‘क’ आणी ‘ब’ दर्जाच्या पर्यटनस्थळांची निवड करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार असुन आजवर डावलल्या गेलेल्या पर्यटनस्थळांना शासकीय ‘दर्जा’ मिळणार आहे
नवीन पर्यटनस्थळांची निवड करतांना अडथळा ठरत असलेल्या जुन्या निकषांना लवचिक करीत सरकारने आता ‘क’ आणि ‘ब’ दर्जाचे स्थळे निवडण्याचे अधिकारी जिल्हाधिका-यांच्या  अध्यक्षतेखालील समितीला प्रदान केले आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला होणार असून, जिल्ह्याच्या भौगोलिक विविधतेला पर्यटनस्थळा चा ‘मुकुट’ चढणार आहे. पारंपारीक वारसा लाभलेली पुरातन मंदिरे, निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या विलोभनिय पर्यटनस्थळांची दखल घेणे या निर्णयाने सोपे जाणार आहे. या नवीन निर्णयानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात एक समिती कार्यरत राहणार असुन जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळे जाहीर करण्याचे तर ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळे घोषित करण्याबाबतचे प्रस्ताव सरकारला सादर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापुर्वी पर्यटनस्थळ निवडायचे असेल तर त्यासाठी अनेक जाचक निकष व अटी पुर्ण कराव्या लागत असत. 
सरकारने याबाबतच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्य हे निसर्गसंपन्न आणि वैविध्यपूर्ण आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनस्थळांचे निकष लागू होऊ शकतील. पण पर्यटनस्थळे म्हणून विकसित होणा-या ठिकाणी तीर्थक्षेत्रांप्रमाणे भाविकांची संख्या, विशिष्ट कालावधीत होणार यात्रा आदी परिस्थिती दिसून येणार नाही. राज्यातील समुद्रकिनारे, विविध किल्ले, विदर्भातील अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे अशी प्रादेशिक विविधता व निरनिराळी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटनस्थळ घोषित करतांना जलक्रीडा, किल्ले पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन अशा पर्यटनक्षम विविध प्रकारांतील स्थळांना एकाच प्रकारचे निवडीचे निकष लागू करणे योग्य होणार नाही. त्यामुळे निवडीच्या निकषांत लवचिकता ठेवणे आवश्यक आहे. नवनवीन स्वरूपांची पर्यटनस्थळे निवडतांना प्रत्येक वेळी निकष बदलण्याची देखील आवश्यकता भासेल, असे स्पष्ट दिसून येईल. 
त्यामुळेच या बाबी विचारात घेऊन सरकारने जिल्हास्तरीय समितीला ‘ब’ आणि ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या निवडीबाबत  अधिकार दिले आहेत. पर्यटनस्थळे विकासाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील पर्यटन क्षमतेचे निकष ठरवून ‘क’ वर्ग स्थळांची निश्चिती करून विकासाचा आराखडा व अंदाजपत्रक बनविण्यास मान्यता देणे अंतिम निवडीसाठी जिल्हा नियोजन समितीला शिफारस करणे हा महत्त्वपूर्ण अधिकार या समितीला मिळाला आहे. ‘ब’ वर्ग स्थळांची सरकारला शिफारस करण्याचे काम सुद्धा ही समिती करू शकणार आहे. 
साभार :- देशोन्नती

Sunday, 25 September 2011

खडतर रस्त्यावरून जिल्हाधिकारी दुचाकी चालवितात तेव्हा..!



खाच खळग्यांनी व्यापलेल्या रस्त्यावरून वाटचाल करणे हा सर्वसामान्यांच्या राहणीमानाचाच एक भाग झाला आहे. ग्रामिण भागातील काही रस्त्यांनी तर वाहने चालविणे सुद्धा शक्य होत नाही. मात्र अशाच एका खडतर रस्त्यावरून खुद्द यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चक्क दुचाकी चालविण्याचा अनुभव घेतला. एका उच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्ती मधील ‘साधा माणुस' या निमित्ताने अनेकांना अनुभवास आला.
रोजगार हमी योजनेच्या कार्यशाळेसाठी ते घाटंजी येथे आले होते. या कार्यशाळेला तालुक्यातील ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केळापुर तांड्यावरील ग्रा.पं.उपसरपंचाच्या पतीने जिल्हाधिका-यांना तांड्यावर येऊन तेथिल भिषण परिस्थिती पाहण्याचे भावनिक आवाहन केले. जिल्हाधिका-यांनीही कार्यक्रम आटोपता घेत रात्री ७.३० वाजता  सर्व ताफ्यासह केळापुर तांड्याकडे प्रयाण केले. मात्र मुख्य रस्त्यापासुन २ किलोमिटर आत मध्ये असलेल्या तांड्यावर जाण्यासाठी असलेला रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे वाहने तिथेच ठेऊन जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर, इतर सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी २ कि.मी.चालत जाऊनच तांडा गाठला. या भागात असलेल्या भिषण असुविधांबद्दल जिल्हाधिका-यांनी चिंता व्यक्त करून त्या सोडविण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे ग्रामिण भागातील समस्यांवर काटेकोरपणे लक्ष पुरविण्याचे स्थानिक यंत्रणेला आदेश दिले.
साहेब गावात पोहचले त्यावेळी तांड्यावरील संत सेवालाल मंदिरात आरती सुरू होती. येथिल आध्यात्मिक वातावरणाने ते भारावले. जिल्हाधिकारी प्रथमच तांड्यावर आल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना चहापान करण्याचा आग्रह केला. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी त्यास नम्र नकार दिला व गावक-यांचा मान राखत साखर खाऊन त्यांनी तोंड गोड केले. त्यानंतर परत येतांना अचानक जिल्हाधिका-यांच्या समोरूनच एक साप गेला. त्यामुळे यंत्रणेची भंबेरी उडाली. मात्र साप मुकाटपणे निघुन गेल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तांड्यावरून दुचाकी बोलविण्यात आली. दुचाकी मागे बसण्या ऐवजी जिल्हाधिका-यानी गाडी चालविण्याची ईच्छा बोलुन दाखविली. आणी या खडतर रस्त्याने ते एका सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे दुचाकी सांभाळत मुख्य रस्त्यापर्यंत गेले. एका सनदी अधिका-याच्या व्यक्तीमत्वातील कमालीचा साधेपणा घाटंजी तालुक्याने अनुभवला.