Pages

Sunday 17 March 2013

मुलांमध्ये संस्कार रूजवा, गुन्हेगारी कमी होईल

पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मांचे महिलांना आवाहन




मुलांवर लहानपणापासुनच चांगले संस्कार केले तर एका सुदृढ समाज निर्माण होऊन गुन्हेगारी कमी होईल असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले. येथिल पोलीस स्टेशनमध्ये आयोजीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुर्वी मुलाने वाईट कृत्य केले तर आई वडील त्याला शिक्षा देत होते. मात्र सध्याच्या काळात परिवार अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीचा गुन्हा लक्षात न घेता त्याला पाठिशी घालतात. तो कायद्याच्या चौकटीत सापडू नये यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे गुन्हेगारांना मानसिक बळ मिळते व तो आणखी मोठा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. 
त्यामुळे महिलांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रूजवावे असे आवाहन त्यांनी केले. आईवडीलांनी वेळीच मुलांना शिक्षा केली तर मोठे गुन्हेगार निर्माणच होणार नाहीत असे ते म्हणाले. मुलींनी भारतिय सभ्यतेची जाणिव ठेवुन आपल्या आईवडीलांना दुखावेल असे कृत्य करू नये अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. कुणी छेड काढली व कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर थेट आत्महत्येची पळवाट न स्विकारता त्यांना अद्दल घडविण्यासाठी पोलीसांची मदत घ्यावी. ९० टक्के गुन्हे केवळ दारूमुळेच होतात. गावातील महिलांनी ठरविल्याशिवाय दारूबंदी होऊ शकणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, नगराध्यक्ष किशोर दावडा, डॉ.विणा खान, जि.प.सदस्य उषा राठोड, अनुपमा दाते यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शुभांगी तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अपुर्वा सोनार यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. समिक्षा भोयर या विद्यार्थीनीने बेटी बचाओ विषयावर एकपात्री प्रयोग सादर केला. यावेळी विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पायल जेंगठे या विद्यार्थींनीने आपल्या भाषणातून सद्यस्थितीत स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर महिला दिन साजरा करणे किती औचित्याचे आहे असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनाच कोड्यात टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी केले. संचालन मंजुषा तिरपुडे व आभार प्रदर्शन जमादार अशोक भेंडाळे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्वस्तरातील महिला, शालेय विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment