Pages

Monday, 18 June 2012

अवैध वाहतुकीने घेतला नवयुवकाचा बळी

पारवा पोलीसांच्या नाकर्तेपणाचा परिणाम

पारवा पोलीस स्टेशन हद्दीसह संपुर्ण घाटंजी तालुक्यात बिनबोभाटपणे सुरू असलेल्या अवैध वाहतुकीमुळे 
१५ वर्षीय नवयुवकाचा बळी घेतला. आयता येथुन घाटंजीकडे येताना अज्ञात काळी पिवळीने दुचाकीला धडक दिल्याने अभिजीत अशोक खडसे (१५) याचा उपचाराकरीता यवतमाळला नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला. सदर युवक आपल्या मित्राच्या दुचाकीवर दुपारी १२ वाजताच्या सुमारास घाटंजीकडे येत होता. यादरम्यान पाटापांगरा गावाजवळ काळी पिवळीने दुचाकीला धडक दिली. या भिषण धडकेत जखमी झालेल्या दोन्ही युवकांना उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आले. मात्र अभिजीत याचा रूग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. उल्लेखनिय म्हणजे अपघाताला ६ तास लोटुनही पारवा पोलीसांकडे घटनेची नोंद झाली नव्हती. यावरूनच पोलीस याबाबत किती गंभिर आहेत याची प्रचिती येते. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी अवैध वाहतुकीला खुली सुट दिल्याने प्रवाशी वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी नेण्यात येतात. गाडीच्या टपावर व अवतीभवती बिलगुन असलेले प्रवाशी वाहने घाटंजी तालुक्याच्या प्रत्येक रस्त्यावर आढळतात. पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक त्यांचेवर असल्याचे दिसत नाही. घाटंजी व पारव्याच्या बसस्थानकासमोर नेहमीच अवैध वाहतुकदारांचा गराडा असतो. अनेकदा वाहतुक पोलीसांच्या नजरेसमोर बसस्थानक परिसरातून प्रवाशी घेतल्या जातात. मात्र त्याकडे पोलीसांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची माहीती आहे. ठाणेदारांकडून जसा आदेश मिळतो त्याचेच पालन करावे लागत असल्याचे एका वाहतुक पोलीसाने खासगीत सांगीतले. अवैध वाहतुकदारांकडून पोलीसांना महिन्याकाठी मिळणा-या मलिद्यामुळेच बेशिस्त वाहतुकीला मोकळीक दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. 
मात्र त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला असुन यावर वेळीच नियंत्रण न आणल्या गेल्यास यापेक्षाही गंभिर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अवैध वाहतुकीला चालना देणा-या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment