वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय घाटंजी अंतर्गत वनपाल बी.आर.पवार यांच्या कार्यकाळात विदर्भ पाणलोट विकास मिशन अंतर्गत झालेल्या कामाची माहिती उशिरा दिल्याबद्दल वनपालावर कार्यवाही तर अपीलीय अधिका-याला अर्जदारास ३ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले. येथिल दिनकर मानकर यांनी सहाय्यक वनसंरक्षक पी.एस.वगारे तथा जनमाहिती अधिकारी, यवतमाळ यांचेकडे दि.१८ जानेवारी २०१० रोजी माहितीसाठी अर्ज केला होता. विहित मुदतीत माहिती देणे बंधनकारक असतांनाही संबंधीतांनी ११ महिन्यानंतर माहिती दिली. त्यामुळे अर्जदाराने राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार तत्कालीन सहाय्यक माहिती अधिकारी तथा वनपाल बी.झेड.पवार यांना कलम २०(२) नुसार दोषी ठरवून त्यांचे विरोधात ३ महिन्यांचे आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करणा-या प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपवनसंरक्षक यवतमाळ यानाही या प्रकरणात दोषी ठरवुन अर्जदाराला झालेल्या त्रासाबद्दल ३ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य माहीती आयुक्त भास्कर पाटील यांनी दिले आहेत.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment