Pages

Showing posts with label अवैध दारू. Show all posts
Showing posts with label अवैध दारू. Show all posts

Wednesday, 27 March 2013

घाटंजीत ‘ड्राय डे’ ला वाहतो दारूचा महापुर

छुप्या मार्गाने होते दारू विक्री
पोलीसांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
धुलिवंदन व तत्सम दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतात. मात्र असे असले तरी घाटंजी शहर व तालुक्यात ‘ड्राय डे’ ला सुद्धा मागेल त्याला देशी विदेशी दारू उपलब्ध होते. अवैध व्यवसायाला पोषक ठरत असलेल्या घाटंजी तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे हा प्रकार आजतागायत सुरू आहे. ‘ड्राय डे’ ला अवैध दारू सोबतच परवाना प्राप्त देशी व विदेशी दारूची दुकाने बाहेरून बंद तर आतून सुरू असतात. बार मध्ये काम करणारे ‘बंद’ दुकानाबाहेर उभे असतात. मद्यशौकीन हळुच त्यांचेजवळ जाऊन हातात पैसे ठेवतात. मागील दारातून जाऊन त्यांना अवघ्या दोन मिनिटात मागणीनुसार दारू पुरविण्यात येते. सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. मात्र या दारू विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे कोणीही या प्रकाराची तक्रार करण्यास धजावत नाही. तर पोलीस मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. घाटंजी शहरातील आठवडी बाजार, यवतमाळ रोड, खापरी नाका या भागातील काही बारमधुन ‘ड्राय डे’ ला छुप्या मार्गाने दारूविक्री होते हे सर्वश्रुत आहे.
धुलिवंदनाच्या सणाला दारू पिण्याचा विचित्र पायंडा गेल्या काही वर्षात पडल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्याचा हा उत्सव आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासुन याला विकृत स्वरूप येऊ लागले आहे. मद्यधुंद अवस्थेत अश्लिल हातवारे करीत धिंगाणा घालणे म्हणजेच रंगपंचमी असाच समज काही तळीरामांनी करून घेतला आहे. रंगपंचमी दारू पिऊन व मांसाहार करून एन्जॉय करण्याची एक फॅशन पडत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने युवावर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. दारूची दुकाने, बार बंद ठेवण्याचा आदेश असतानाही अनेक जण पिऊन झिंगताना दरवर्षी दिसतात.  होळी हा एकच सण नव्हे, तर प्रत्येक सणाला पिऊन धिंगाणा घातल्याशिवाय तो सण साजरा करायचाच नाही, असा निश्चय केलेले तळीराम दिवसेंदिवस वाढत आहेत. दारूच्या धुंदीत जिवघेण्या वेगात दुचाकी चालविणे, सायलेंसर काढुन ध्वनी प्रदुषण करणे, रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत नाचणे, मारामारी व भांडणाने रंगोत्सवाचा बेरंग होत असताना पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे. एखादा गंभिर प्रकार घडल्यावरच त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंध घालणे सोयीस्कर ठरणार नाही का याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. 
साभार :- देशोन्नती 

Tuesday, 3 July 2012

पारवा पोलीसांना अवैध दारू विक्रेत्यांचा पुळका

दारू विक्रीची तक्रार करणा-यांना ठाण्यात दमदाटी

तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला अवैध दारू विक्रेत्यांशी एवढी सहानुभूती निर्माण झाली आहे की, गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीची तक्रार करणा-यांना चक्क पोलीस ठाण्यात बोलावुन दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या प्रकाराने चिडलेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिलांसह सावळी सदोबा पोलीस चौकीवर धडक दिली. याबाबत विस्तृत वृत्त असे की, पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरी कापेश्वर येथिल ग्रामस्थांनी गावातील दोन अवैध दारू विक्रेत्यांविषयी ग्रामसभेत तक्रार केली. पोलीसांनाही याबाबत कळविण्यात आले. मात्र अवैध व्यावसायीकांना पाठिशी घालणा-या पारवा पोलीसांनी तक्रारकर्त्यांनाच गोत्यात आणण्याची खेळी केली. ज्या अवैध दारू विक्रेत्यांची ग्रामस्थांनी तक्रार केली होती त्यांच्याकडून पोलीसांनी त्या ग्रामस्थांविरोधात खोटी तक्रार घेतली. तसेच चार ते पाच ग्रामस्थांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावुन, ‘तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, तुम्ही दारू विक्रेत्यांना विरोध केल्यास ते सुद्धा तुमच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे यापुढे तक्रार करू नका’ असा धमकीवजा सल्ला पारवा पोलीसांनी दिल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. योग्य बाबीची तक्रार केल्यावर पोलीस दारू विक्रेत्यांची बाजु घेऊन ग्रामस्थांना धमकावत असल्याचे लक्षात येताच उमरी कापेश्वर येथिल शेकडो गावक-यांनी थेट सावळी सदोबा पोलीस चौकी गाठुन या प्रकाराचा निषेध नोंदविला. यावेळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते अशी माहिती आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिल्याने अवैध व्यावसायीकांचे धारिष्ट्य वाढले आहे. उल्लेखनिय म्हणजे काही दिवसांपुर्वीच विशेष शाखेने पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. परंतु ग्रामिण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वाहतुक व  तत्सम व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत बिनदिक्कतपणे सुरू आहे. वरिष्ठांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 4 January 2012

घाटंजीतील मटका अड्ड्यांवर एस.पीं.च्या विशेष पथकाचा छापा

संग्रहीत छायाचित्र
शहरातील विवीध भागात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गठित केलेल्या विशेष पथकाने आज दुपारी एक वाजताच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत तब्बल ९ आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.  एस.पीं.चे विशेष पथक आज शहरात येणार याची ‘खबर’ घाटंजी पोलीसांना मिळाली होती अशी माहिती आहे. त्यामुळे घाटंजी पोलीसांनी एका मटका अड्ड्यावर सुरूवातीस छापा मारला. अवघ्या अर्ध्या तासातच विशेष पथकाने येऊन तब्बल तिन मटका अड्ड्यांवर छापे मारले. या संपुर्ण कार्यवाहीत रोख, मोबाईल असा सुमारे २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे कळु शकली नाही. या कारवाईमुळे घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या निलंबीत असलेल्या ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्या काळात तर अवैध व्यावयायीकांची चांगलीच चांदी सुरू होती. त्यांच्या निलंबनानंतर सुमारे महिनाभर सुधाकर अंभोरे यांच्याकडे ठाणेदार पदाचा प्रभार होता. अवघ्या एका महिन्याच्या कार्यकाळातच त्यांनी अवैध वाहतुकीसह मटका व अवैध दारू चा व्यवसाय करणा-यांना वठणीवर आणले होते.
अवैध वाहतुक करणा-या सुमारे ३० वाहनानांवर त्यांनी कारवाई केली होती. तसेच चोरांबा येथे खुलेआमपणे चालणा-या कोंबडबाजारावरही त्यांनी छापा मारून ठोस कारवाई केली होती. त्यांच्या या धडक मोहिमेचा धसका अवैध व्यावसायीकांनी घेतला होता. मात्र लवकरच त्यांची येथुन बदली करून ठाणेदारपदाचा प्रभार सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांचेकडे देण्यात आला आहे. तेव्हापासुन अवैध व्यवसायीकांसाठी मोकळे रान झाले आहे. शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या कन्या शाळांच्या परिसराला लागुनच मटका व अवैध दारू चा व्यवसाय खुलेआम केल्या जातो. सर्वसामान्य नागरीक तसेच विद्यार्थ्यांनाही सहज नजरेस पडणारी ही गोष्ट पोलीसांना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे अवैध व्यावसायीकांना संरक्षण देणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार:- देशोन्नती