Pages

Showing posts with label घाटंजी पोलीस स्टेशन. Show all posts
Showing posts with label घाटंजी पोलीस स्टेशन. Show all posts

Saturday, 18 August 2012

घाटंजीत मटका अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा



पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक एस.पी.पवार यांच्या पथकाने काल (दि.१६) ला  दुपारी ३.२० वाजता छापा मारला. महाराष्ट्र बँकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत खुले आमपणे हा मटका अड्डा सुरू होता. या धाडीत राजेंद्र रामदयाळ अग्रहरी, सुरेश रामभाऊ हटवार, मोहन बापुराव शिवणकर, प्रशांत लक्ष्मण धोटे रा.घाटंजी या आरोपींना पोलीसांनी अटक केली. त्यांचे जवळून वरळी मटक्याचे साहित्य व ७ हजार ७५० रू.रोख जप्त करण्यात आली. 
हा छापा दुपाराच्या सुमारास टाकण्यात आला. यावेळी अशा अड्ड्यावर हजारो रूपये जमा असतात. मात्र पोलीसांच्या या छाप्यात केवळ साडेसात हजारच रूपये कसे जप्त झाले याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
घाटंजी येथे वर्दळीच्या परिसरात व पोलीस स्टेशनच्या आजुबाजूला खुले आमपणे मटका अड्डे सुरू असतात. घाटंजी पोलीस मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतात. या धाडीमुळे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार :- देशोन्नती  


Thursday, 5 January 2012

लखमाई गॅस एजन्सीत शिवसेना पदाधिका-याची तोडफोड


येथिल ईण्डेन गॅसचे वितरक असलेल्या लखमाई गॅस एजन्सीमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत दलाल यांनी आपल्या तिन साथिदारासमवेत तोडफोड केली. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गॅस एजन्सीच्या कार्यालयात येऊन त्यांनी चारचाकी वाहनासाठी सिलेंडरची मागणी केली. मात्र नियमबाह्यपणे सिलेंडर देता येत नसल्याचे येथिल कर्मचा-याने सांगताच त्यांनी शिविगाळ करून येथिल सामानाची तोडफोड केली. संगणकाला विटा मारून फोडले. सदर घटनेची तक्रार देण्यास एजन्सीचे संचालक सचिन माहुरे हे पोलीस स्टेशनला आले असता सुरूवातीला त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. साहेब आल्याशिवाय तुमची तक्रार घेता येणार नाही असे सांगण्यात आल्याने तक्रारकर्त्यास बराच वेळ ताटकळत बसावे लागले. आरोपी भरत दलाल यांचेसह तिन जणांविरोधात कलम ४५२, ४२७, २९४, ५०६, ३८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
शिवसेनेचे काही पदाधिकारी नेहमीच धाकदपट करून नियमबाह्यरित्या सिलींडरची मागणी करतात असे येथिल कर्मचा-यांनी सांगीतले.

कोंबडबाजारावर विशेष पथकाची धाड
तालुक्यातील दडपापुर परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कोंबडबाजावर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने धाड मारली. यामध्ये सुमारे १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपी देवसिंग बाबाराव राठोड, शब्बीर पठाण, संतोष हरी चव्हाण, रंगराव हरी राठोड या आरोपांrना अटक करण्यात आली. विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक नवलकर, जमादार प्रभाकर शिंगणजुटे, विजय डबले, राजेंद्र नागभिडकर, रावसाहेब शेंडे, निलेश वारेकर, सचिन आडे यांनी ही कारवाई केली. यामुळे पुन्हा एकदा घाटंजीच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साभार:- देशोन्नती

Wednesday, 4 January 2012

घाटंजीतील मटका अड्ड्यांवर एस.पीं.च्या विशेष पथकाचा छापा

संग्रहीत छायाचित्र
शहरातील विवीध भागात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गठित केलेल्या विशेष पथकाने आज दुपारी एक वाजताच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत तब्बल ९ आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.  एस.पीं.चे विशेष पथक आज शहरात येणार याची ‘खबर’ घाटंजी पोलीसांना मिळाली होती अशी माहिती आहे. त्यामुळे घाटंजी पोलीसांनी एका मटका अड्ड्यावर सुरूवातीस छापा मारला. अवघ्या अर्ध्या तासातच विशेष पथकाने येऊन तब्बल तिन मटका अड्ड्यांवर छापे मारले. या संपुर्ण कार्यवाहीत रोख, मोबाईल असा सुमारे २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे कळु शकली नाही. या कारवाईमुळे घाटंजी पोलीस स्टेशनच्या प्रभारी ठाणेदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या निलंबीत असलेल्या ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्या काळात तर अवैध व्यावयायीकांची चांगलीच चांदी सुरू होती. त्यांच्या निलंबनानंतर सुमारे महिनाभर सुधाकर अंभोरे यांच्याकडे ठाणेदार पदाचा प्रभार होता. अवघ्या एका महिन्याच्या कार्यकाळातच त्यांनी अवैध वाहतुकीसह मटका व अवैध दारू चा व्यवसाय करणा-यांना वठणीवर आणले होते.
अवैध वाहतुक करणा-या सुमारे ३० वाहनानांवर त्यांनी कारवाई केली होती. तसेच चोरांबा येथे खुलेआमपणे चालणा-या कोंबडबाजारावरही त्यांनी छापा मारून ठोस कारवाई केली होती. त्यांच्या या धडक मोहिमेचा धसका अवैध व्यावसायीकांनी घेतला होता. मात्र लवकरच त्यांची येथुन बदली करून ठाणेदारपदाचा प्रभार सध्या सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांचेकडे देण्यात आला आहे. तेव्हापासुन अवैध व्यवसायीकांसाठी मोकळे रान झाले आहे. शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या कन्या शाळांच्या परिसराला लागुनच मटका व अवैध दारू चा व्यवसाय खुलेआम केल्या जातो. सर्वसामान्य नागरीक तसेच विद्यार्थ्यांनाही सहज नजरेस पडणारी ही गोष्ट पोलीसांना का दिसत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे अवैध व्यावसायीकांना संरक्षण देणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
साभार:- देशोन्नती

Sunday, 4 December 2011

चोरांब्याच्या कोंबडबाजारावर पुन्हा पोलीसांचा छापा

तालुक्यातील चोरांबा येथे बेधडकपणे चालणा-या कुप्रसिद्ध कोंबडबाजारावर घाटंजी पोलीसांनी आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकुन तब्बल ६ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छाप्यात ३० कोंबडे, १६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मंगेश अशोक लोखंडे (१८) रा.सायखेडा, कैलास लालसिंग राठोड (१९) रा.म्हसोला (कान्होबा) ता.आर्णी, अशोक दत्तुजी गिरी (४२) रा.वडगाव,यवतमाळ, विलास जनार्दन मेश्राम (२०)रा.घाटी, पुरूषोत्तम खंडाळकर रा.मुरझडी, विठ्ठल नागोराव भोंग रा.घाटी यांचा समावेश आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपींवर कार्यवाहीची प्रक्रीया सुरू होती.
जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कितीही आदेश असले तरी तालुक्यातील चोरांबा येथे खुलेआम चालणा-या कोंबडबाजाराला पोलीस यंत्रणेचे अभय होते. यापुर्वीचे ठाणेदार बाबुराव खंदारे तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरूनुले यांनी यापुर्वी कोंबडबाजार भरविणा-या मुख्य आरोपीला पोलीस कर्मचा-यास मारहाण करण्याच्या प्रकरणात झुकते माप दिल्याची बाब चांगलीच चर्चेत आली होती. तसेच काही दिवसांपुर्वी या दोन अधिका-यांच्या नेतृत्वात याच कोंबडबाजारावर औपचारीक छापा टाकला होता. त्यावेळी ही कार्यवाही संशयाच्या भोव-यात सापडली होती.
आज टाकण्यात आलेल्या छाप्यात काही आरोपी अटक झाले असले तरी मुख्य सुत्रधार मात्र अजुनही फरारच आहे. ही कारवाई ठाणेदार सुधाकर अंभोरे, पोलीस उपनिरिक्षक ए.बी.कोंडे, एम.एम.राऊत, पोलीस कर्मचारी विजय ढाके, सुभाष डोंगरे, उमेश चंदन, संजय कोहाड, अशोक भेंडाळे, गजानन अडपवार, युवराज जाधव यांनी केली.

Friday, 11 November 2011

‘मुन्नी’च्या तालावर नाचणारा ठाणेदार बाबुराव खंदारे निलंबीत

अश्लिल गाण्यांच्या तालावर दुर्गोत्सव मिरवणुकीत धांगडधिंगा घालुन पोलीसांची प्रतिमा धुळीस मिळविणारा ठाणेदार बाबुराव खंदारे याला अखेर निंलबीत करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त देशोन्नतीनेच प्रसिद्ध केले होते. वादग्रस्त कारकिर्द असल्याने अनेक प्रकरणात त्यांचेवर कार्यवाही प्रलंबीत होती. त्यातच घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये नेमणुक झाल्यापासुन त्यांनी अवैध यावसायीकांना संरक्षण व प्रत्येकच प्रकरणात सेटींगचे धोरण अवलंबुन पदाचा दुरूपयोग करणे सुरू केले होते. राजकारण्यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल करायचे व आर्थिक पिळवणुक करायची असे अनेक प्रकरणात पुढे आले होते. अवैध व्यावसायीकांना पाठीशी घालुन पोलीस कर्मचा-यांवर अन्याय केल्याचेही ताजे उदाहरण आहे. या सर्व प्रकरणांबाबत देशोन्नतीने वेळोवेळी परखडपणे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर बाबुराव खंदारेंच्या मनमानी प्रकरणांचा घडा आज भरला व त्यांना तडकाफडकी निंलबित करण्यात आले अशी माहिती आहे. पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यात सर्वत्र अवैध व्यवसायांना लगाम घालण्याचे आदेश दिले असतानांही घाटंजी तालुक्यात मात्र धडाक्यात हे व्यवसाय सुरू होते. त्यामुळे नागरिकांमध्येही पोलीस विभागाबद्दल संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. खंदारेच्या निलंबनामुळे पोलीस दलाची चुकीची प्रतिमा जनतेसमोर आणणारा ‘बाबुराव पॅटर्न’ आता थांबणार असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
साभार:- देशोन्नती