शहरातील घाणीकडे न.प.चे दुर्लक्ष
आरोग्य विभाग कागदोपत्री ‘ओके’
बदलत्या वातावरणामुळे रोगट परिस्थिती निर्माण झाल्याने गोरगरीब जनता आजारांच्या विळख्यात सापडली आहे. साथीच्या आजारांवर वेळीच उपचारही मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे. आधीच बदलते वातावरण, बोचरी थंडी, त्यात घाण, दुर्गंधी आणि डासांच्या उच्छादामुळे आजारांचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. साथींच्या आजारांनी गोरगरीब जनता बेजार झाली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश भागांत सध्या मलेरिया, टायफॉईड, कावीळ, सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डासांच्या उच्छादामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळेच मलेरियाने थैमान घातले आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंडी, मलनिस्सारण योग्य पध्दतीने होत नसल्याने आजाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील विविध वार्डांमध्ये घरातून निघणारे सांडपाणीr जाण्यासाठी नाल्या नसल्याने ते तेथेच राहाते आणि यातून मच्छरांची उत्पत्ती होते. याचा परिणाम मलेरिया आणि तत्सम आजारांच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे.त्यामुळे लहान मुले, वृध्द याबरोबरच सर्वसामान्य नागरिकही आजाराने पछाडले आहेत. शासकीय रूग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयांत सर्दी, खोकला, पडसे यांसह ताप, थंडी, मलेरिया अशा साथीच्या आजाराने ग्रासलेले शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहेत. शहरात अस्वच्छता, कच-याचे ढिग, दुर्गंधी, डासांचे थैमान आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याकडे घाटंजी नगर परिषदेने पाठ फिरवली आहे. साथीच्या आजारावर उपाययोजनेसाठी नगर परिषदेकडुन स्वच्छता, कच-याचे ढिग उचलणे, जंतुनाशकाची फवारणी करणे ही कामे होत नसल्याने या आजाराचे प्रमाण वाढतच आहे. ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक कुटुंबातील एक-दोन रुग्ण साथीच्या आजाराने त्रस्त असून सर्दी, खोकला, ताप आदी कारणांसाठी दवाखान्यात येणा-या रुग्णांची संख्या मोठी आहे. तथापि, हे सर्व रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने आरोग्यखात्याला या साथरोगांची कल्पना येत नाही. घाटंजी नगर परिषद क्षेत्रात तर साथरोगांसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. रहदारीच्या मुख्य रस्त्यांसह शहरातील विवीध भागांमध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे साथिच्या रोगांमध्ये वाढच होत आहे. नगर परिषद प्रशासन मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे ग्रामिण भागातही आरोग्याची समस्या अत्यंत भिषण आहे. आरोग्य यंत्रणा केवळ कुटूंब कल्याणाचे लक्ष्य गाठण्यात व लेखी कामकाजातच व्यस्त असल्याने त्यांचे नागरीकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरीष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचा-यांवर जबाबदारी सोडुन मोकळे होत असल्याने साथ रोग नियंत्रणाचे योग्य नियोजन करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे.
manapa kahi kaam karte ki nahi
ReplyDelete