Pages

Showing posts with label सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे. Show all posts
Showing posts with label सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे. Show all posts

Wednesday, 2 May 2012

पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाने सजग राहावे - ना.शिवाजीराव मोघे






पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेता जिल्हा, तालुका प्रशासन तसेच पाणी समस्येशी थेट संबंध येणारे ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी सजग राहुन काम करावे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावे असे आदेश राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी दिले. स्थानिक संत मारोती महाराज सांस्कृतीक भवनात आयोजीत पाणी टंचाई आढावा बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, जि.प.सदस्य योगेश देशमुख, देवानंद पवार, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, उपविभागीय अधिकारी एस.व्ही.खांदवे, तहसिलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या गैरप्रकारासंदर्भात यवतमाळ येथे विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन मोघे यांनी तक्रारकर्त्यांना दिले. पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर प्रामुख्याने लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील विवीध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिवांनी पाणी टंचाई संदर्भात आपल्या अडचणी मंत्री महोदयांसमोर व्यक्त केल्या. पाणी टंचाईच्या तिव्रतेनुसार त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना ना.मोघे यांनी प्रशासनाला दिल्या. अनेक ग्रामसेवक पाणी टंचाई संदर्भात प्रस्ताव सादर करीत नसल्याची समस्याही यावेळी मांडण्यात आली. प्रा.डॉ.प्रदिप राऊत यांनी आढावा बैठकीत पाणी टंचाई बरोबरच तालुक्यातील फ्लोराईडयुक्त पाणी व जलपुनर्भरणाचाही अग्रक्रमाने विचार व्हावा अशी मागणी केली. घाटंजी, आर्णी व पांढरकवडा तालुक्यातील अनुक्रमे २५, ४५, ३० अशी एकुण १०० गावे फ्लोराईडच्या विळख्यात असुन या परिसरातील हजारो नागरीक फ्लोरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रा.डॉ.राऊत यांनी ना.मोघेंना दिलेल्या निवेदनातून केली.
विरूळ, मांडवा, मारेगाव येथिल पाणी समस्या यावेळी मांडण्यात आली. रत्नापुर येथे पाईपलाईन, माणूसधरी येथे विहिर अधिग्रहण, कोपरी खुर्द, कुर्ली यासह काही गावातील भारत निर्माण योजनेच्या पाण्याच्या संदर्भात तक्रारी येथिल सरपंचांनी केल्या. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी भारत निर्माण योजनेतील गैरव्यवहाराचा प्रश्न उपस्थित केला. पाणी पुरवठा समितीच्या पदाधिका-यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कुर्ली येथिल नागरीक मुबलक पाण्यापासुन वंचित आहेत. प्रशासन मात्र या पदाधिका-यांना पाठीशी घालीत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दत्तापुर येथिल जुनी पाईपलाईन बदलविण्याची मागणी येथिल सरपंचांनी केली. मोवाडा येथे बोअरवेल, करमना येथे नळ योजना, लहान मोवाडा येथे हातपंप, पारवा येथे नळयोजनेची टाकी लिक असल्याची समस्या व विहीर अधिग्रहण, पांढुर्णा खुर्द येथे स्मशानभुमीमध्ये बोअरवेल व विहिर अधिग्रहण, सोनखास येथे टँकर द्वारे पाणी पुरवठा, २२ लाख रूपये खर्च होऊनही अपुर्ण असलेली पिंपरी येथिल भारत निर्माण योजना, यासह पंगडी, राजापेठ, पाटापांगरा, रामपुर, शिवणी, भुताई पोड, पोताई पोड, दडपापुर, साखरा खुद, सावंगी संगम, शरद, नागेझरी, भिमकुंड, सावरगाव (मंगी), तरोडा, वाढोणा (खु.) कोलाम पोड, वघारा येथिल सरपंच, उपसरपंच व सचिवांनी पाणी टंचाई संदर्भातील समस्या सांगीतल्या. कार्यक्रमाचे संचालन अरविंद झाडे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी योगेश उडाखे यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

Friday, 24 February 2012

शिवरायांच्या कर्तृत्वाला जगात तोड नाही - ना.मोघे

शिवजयंती उत्सवात नवनिर्वाचीतांचा सत्कार


















शिवरायांचे कार्य त्यांचे कर्तृत्व आणी त्यांनी दिलेली शिकवण याला जगात तोड नसुन त्यांच्या चारित्र्याचे अध्ययन करून ते आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केले. येथिल शिवतिर्थावर आयोजीत शिवजयंती उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याकाळी गुलामगीरीत जखडलेल्या समाजाला त्यातुन मुक्त केले. सर्व धर्मांचा सन्मान त्यांनी राखला. त्यांचे प्रत्येक कार्य अनुकरणीय असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, उपाध्यक्ष अकबर तंव्वर, बांधकाम सभापती परेश कारीया, शिक्षण सभापती राम खांडरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा ठाकरे सतिश भोयर यांचेसह नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हालाखीच्या परिस्थिती असतांना राष्ट्रीय स्तरावर क्रिडा क्षेत्रात नाव कमाविणा-या ससाणी येथिल राजु मेश्राम याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. राजु हा सायकलपटू आहे. मात्र त्याचेजवळ सराव करण्यासाठी सायकल नाही. त्यामुळे ना. शिवाजीराव मोघे यांनी यावेळी राजूला आठ दिवसांच्या आत रेसिंगची सायकल देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय राजे छत्रपती सामाजीक सभागृहाच्या वॉलकंपाऊंड करीता निधी अथवा नगर परिषदेच्या माध्यमातुन लवकरच पावले उचलण्यात येतिल असे आश्वासन ना.मोघे यांनी दिले. नगर परिषदेच्या पदाधिका-यांनीही याबाबीला दुजोरा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश भोयर, संचालन दिपक महाकुलकर व आभार प्रदर्शन प्रफुल्ल अक्कलवार यांनी केले.
साभार :- देशोन्नती  

Saturday, 31 December 2011

घरकुलाच्या आशेने आलेल्या हजारो गरीबांची निराशा

ना.मोघेंच्या जनता दरबाराचा बोजवारा
कथितपणे प्रशासनाच्या चुकीमुळे घरकुलापासून वंचीत राहिलेल्या लाभाथ्र्यांसाठी सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. आता आपल्याला घरकुल मिळणार या भाबड्या आशेने सुमारे दोन हजार ग्रामस्थ आपली रोजमजुरी बुडवून येथिल सांस्कृतीक भवनात जमले होते. ना.मोघे आपल्या समस्या ऐकुन घेणार व तडकाफडकी कार्यक्रमातच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांना सुचना देणार अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र कार्यक्रम पत्रिकेतील एकही प्रमुख मान्यवर उपस्थित न राहिल्याने जनता दरबाराचा पार बोजवारा उडाला. यावेळी आलेल्या ग्रामस्थांकडून घरकुलासाठी साधे घेण्यात आले.
मात्र कोणाचीही समस्या ऐकुन घेण्यात आली नाही. अनेकांना गर्दीमुळे अर्ज देता आले नाही अशांनी ग्रामसभेत अर्ज द्यावेत अशी सुचना देण्यात आली. यापलीकडे या जनता दरबारात ठोस असे काही झाले नाही. पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी कालच पत्रपरिषद घेऊन या जनता दरबाराचा निषेध नोंदविला होता हे विशेष. खेड्यापाड्यातुन अनेक नागरिक आपली कामे सोडून आले होते. मात्र जनता दरबाराने निराशा केल्याने ग्रामस्थांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रसिद्धीसाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरून आयोजीत केलेल्या जनता दरबाराचा म.न.से.चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे व पंचायत समिती सदस्य डॉ. विजय कडू यांनी निषेध नोंदविला आहे.


झटाळा येथे शेतीच्या वादातून भावाचा खुन
शेतीच्या वादातून तालुक्यातील झटाळा येथे लहान भावाने मोठ्या भावाचा बैलगाडीच्या उभारीने मारहाण करून निर्घुण खुन केल्याची घटना काल (दि.३०) ला रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. आरोपी अशोक पुनाजी आत्राम (२८) याने त्याचा मोठा भाऊ मारोती पुनाजी आत्राम (३५) याचेशी शेतीच्या विषयावरून वाद घालुन भांडण केले. वाद विकोपाला गेल्याने त्याने बैलगाडीच्या उभारीने भावास बेदम मारहाण केली. यात मारोती याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पारवा पोलीसांनी आरोपीविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन आरोपी अद्याप फरार आहे.

साभार:- देशोन्नती

Monday, 28 November 2011

मोघेंच्या धनादेश वाटपाला मनसेचे प्रत्युत्तर

             ग्रामपंचायत स्तरावर धनादेश वाटप
स्थानिक पातळीवरील पदाधिका-यांचा हक्क डावलुन शासकीय मदतीचे धनादेश स्वहस्तेच वाटप करण्याचा अट्टाहास करणा-या सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व त्यांच्या निकटस्थ जि.प.सदस्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘म.न.से.’ स्टाईलनेच प्रत्युत्तर दिले आहे. नुकतेच बेलोरा येथे पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यासाठी पंचायत समिती अधिका-यांवर दबाव टाकण्यात आला. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी गावपातळीवरील धनादेश वाटपाचा हक्क स्थानिक सरपंचाला असला पाहिजे याकरीता ३ ग्रामपंचायती मधील घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश घेऊन वासरी, मुरली व चोरांबा येथे ग्रा.पं.सरपंचांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
महादेव सुरपाम, तुळशीराम आत्राम, किसन आत्राम, शंकर मेश्राम, दौलत सुरपाम, पुंडलीक गराटे, बेबी मंगाम, लक्ष्मण दंडाजे, श्रावण बारेकर, सुरेश आत्राम, बाजीराव सुरपाम, माणिक आत्राम, गोविंदा मेश्राम, गणेश पेंदोर या लाभार्थ्यांना सरपंचांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी वासरीच्या सरपंच प्रियंका प्रशांत धांदे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे ग्रा.पं.सदस्य भोपीदास राठोड, शंकर मादाडे तसेच विठ्ठल गोवारदिपे, प्रदिप राजुरकर, तुळशीराम निबुधे, किसन राजुरकर, भाऊराव धांदे, वासुदेव गुरनुले, प्रभाकर वानखडे, रविंद्र कोडापे, मनसेचे पंकज राठोड, प्रशांत अवचित, अनिल जाधव, जगन्नाथ चौधरी, रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
सामाजीक न्याय मंत्र्यानी आपल्या पदाची प्रतिष्ठा लक्षात घेता प्रत्येक धनादेश आपल्याच हस्ते वाटप व्हावा असा अट्टाहास न धरता स्थानिक पदाधिका-यांना त्यांचा मान मिळु द्यावा. तसेच शासकीय मदत आपल्यामुळेच आली असा बनाव निर्माण करून लोकांना संभ्रमात टाकु नये असे आवाहन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी केले आहे. पंचायत समितीच्या अधिका-यांनी राजकीय दबावातुन अशा प्रकारांना संमती दिल्यास यापुढे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती