Pages

Wednesday, 2 May 2012

पाणी टंचाई निवारणासाठी प्रशासनाने सजग राहावे - ना.शिवाजीराव मोघे






पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेता जिल्हा, तालुका प्रशासन तसेच पाणी समस्येशी थेट संबंध येणारे ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी सजग राहुन काम करावे. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावे असे आदेश राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी दिले. स्थानिक संत मारोती महाराज सांस्कृतीक भवनात आयोजीत पाणी टंचाई आढावा बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान पटेल, जि.प.सदस्य योगेश देशमुख, देवानंद पवार, पं.स.सभापती शैलेश इंगोले, उपसभापती सुवर्णा निकोडे, उपविभागीय अधिकारी एस.व्ही.खांदवे, तहसिलदार संतोष शिंदे, गटविकास अधिकारी रामचंद्र गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या गैरप्रकारासंदर्भात यवतमाळ येथे विशेष बैठक बोलविण्याचे आश्वासन मोघे यांनी तक्रारकर्त्यांना दिले. पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर प्रामुख्याने लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील विवीध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिवांनी पाणी टंचाई संदर्भात आपल्या अडचणी मंत्री महोदयांसमोर व्यक्त केल्या. पाणी टंचाईच्या तिव्रतेनुसार त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना ना.मोघे यांनी प्रशासनाला दिल्या. अनेक ग्रामसेवक पाणी टंचाई संदर्भात प्रस्ताव सादर करीत नसल्याची समस्याही यावेळी मांडण्यात आली. प्रा.डॉ.प्रदिप राऊत यांनी आढावा बैठकीत पाणी टंचाई बरोबरच तालुक्यातील फ्लोराईडयुक्त पाणी व जलपुनर्भरणाचाही अग्रक्रमाने विचार व्हावा अशी मागणी केली. घाटंजी, आर्णी व पांढरकवडा तालुक्यातील अनुक्रमे २५, ४५, ३० अशी एकुण १०० गावे फ्लोराईडच्या विळख्यात असुन या परिसरातील हजारो नागरीक फ्लोरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी आग्रही मागणी प्रा.डॉ.राऊत यांनी ना.मोघेंना दिलेल्या निवेदनातून केली.
विरूळ, मांडवा, मारेगाव येथिल पाणी समस्या यावेळी मांडण्यात आली. रत्नापुर येथे पाईपलाईन, माणूसधरी येथे विहिर अधिग्रहण, कोपरी खुर्द, कुर्ली यासह काही गावातील भारत निर्माण योजनेच्या पाण्याच्या संदर्भात तक्रारी येथिल सरपंचांनी केल्या. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी भारत निर्माण योजनेतील गैरव्यवहाराचा प्रश्न उपस्थित केला. पाणी पुरवठा समितीच्या पदाधिका-यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे कुर्ली येथिल नागरीक मुबलक पाण्यापासुन वंचित आहेत. प्रशासन मात्र या पदाधिका-यांना पाठीशी घालीत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दत्तापुर येथिल जुनी पाईपलाईन बदलविण्याची मागणी येथिल सरपंचांनी केली. मोवाडा येथे बोअरवेल, करमना येथे नळ योजना, लहान मोवाडा येथे हातपंप, पारवा येथे नळयोजनेची टाकी लिक असल्याची समस्या व विहीर अधिग्रहण, पांढुर्णा खुर्द येथे स्मशानभुमीमध्ये बोअरवेल व विहिर अधिग्रहण, सोनखास येथे टँकर द्वारे पाणी पुरवठा, २२ लाख रूपये खर्च होऊनही अपुर्ण असलेली पिंपरी येथिल भारत निर्माण योजना, यासह पंगडी, राजापेठ, पाटापांगरा, रामपुर, शिवणी, भुताई पोड, पोताई पोड, दडपापुर, साखरा खुद, सावंगी संगम, शरद, नागेझरी, भिमकुंड, सावरगाव (मंगी), तरोडा, वाढोणा (खु.) कोलाम पोड, वघारा येथिल सरपंच, उपसरपंच व सचिवांनी पाणी टंचाई संदर्भातील समस्या सांगीतल्या. कार्यक्रमाचे संचालन अरविंद झाडे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी योगेश उडाखे यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment