Pages

Saturday, 5 May 2012

बैलबाजार मैदानातील कच-यांच्या ढिगा-यांना आग

गुरूदेव वार्ड थोडक्यात बचावला 
बाजार समितीचा दुर्लक्षीतपणा


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ज्या मैदानात बैलबाजार भरविण्यात येतो तिथे असलेल्या कचरा व खताच्या ढिगा-यांना आज दुपारी आग लागली. दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा असल्याने मैदानात ठिकठिकाणी साठवुन असलेल्या ढिगांनी पेट घेतला. झपाट्याने पसरत चाललेली आग बाजुलाच असलेल्या गुरूदेव वार्डातही पसरण्याची भिती निर्माण झाल्याने येथिल नागरीकांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. नगर परिषदेचा टँकर बोलविण्यात आला. वार्डातील नागरीकांनी वेळीच धावपळ केल्याने आग लवकर आटोक्यात आली. अन्यथा दुपारी असलेल्या सुसाट वा-यामुळे लोकवस्तीपासुन अवघ्या २० ते २५ फुट अंतरावर असलेल्या या कच-याच्या जळत्या ढिगा-यांनी संपुर्ण गुरूदेव वार्डालाच आगीच्या भक्ष्यस्थानी घेतले असते. कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने हे कच-याचे ढिगारे न उचलल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा येथिल संतप्त नागरीकांनी दिला आहे. घाटी (घाटंजी) भागातील गुरूदेव वार्डाच्या बाजुला बाजार समितीच्यावतीने बैलबाजार भरविण्यात येतो. यादरम्यान येथे जमा होणा-या शेण, कचरा व वैरणीच्या खताचा लिलाव केल्या जातो. हे जमा झालेले खत व कचरा संबंधीत कंत्राटदाराने मैदानातून न्यावयास पाहिजे होता. मात्र त्याच्या अक्षम्य दुर्लक्षीतपणामुळे आजुबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला आहे. बैलबाजारानंतर बाजार समितीने साफसफाई न केल्याने सर्वत्र वैरणाचा कचरा पसरला आहे. एका ठिणगीनेही या भागात भिषण आग पसरण्याची भिती आहे. दोन दिवसांपुर्वी येथिल दोन कच-याच्या ढिगा-यांनी पेट घेतला होता. त्यावेळी एक मुलगा जळता जळता सुदैवाने वाचला.
आज दुपारीही दोन ढिगा-यांना आग लागली. वारा सुसाट असल्याने विस्तव सर्वत्र उडाला. त्यामुळे सुमारे आठ ते दहा ठिकाणी आग लागली. या मैदानात असलेल्या बाजार समितीच्या शेड मध्ये गवताच्या पेंढ्या ठेवुन आहेत. वारा विरूद्ध बाजुने असता तर प्रचंड नुकसान झाले असते. या आगीबाबत माहिती देण्यासाठी काही नागरीकांनी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही असे नागरिकांनी सांगीतले. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले होते. आग विझविण्यासाठी विनोद मोहिजे, मंगल मोहिजे, अभय मोहिजे, विठ्ठल ससाणे, अंकुश ठाकरे यांचेसह अनेकांनी प्रयत्न केले. येथे भरविण्यात येत असलेल्या बैलबाजाराचा परिसरातील नागरीकांना नेहमीच त्रास होतो. त्यामुळे बैलबाजाराचे ठिकाण बदलावे किंवा संरक्षक भिंत बांधावी अशी येथिल नागरिकांची मागणी आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment