Pages

Thursday 17 May 2012

घाटंजी तालुक्यातील जुगार व मटका अड्ड्यांवर विशेष पथकाच्या धाडी

२० जणांना अटक; ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
घाटंजी, पारवा ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
येथिल पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन मटका अड्ड्यांवर विशेष पोलीस पथकाने धाड मारून तब्बल १२ आरोपींना अटक केली. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक रूपाली दरेकर व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सारंग नवलकर  यांच्या पथकाने काल रात्री ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीमध्ये १६ हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी मोहन बापुराव शिवणकर (४०), विश्वनाथ विष्णुजी रामटेके (६२), मारूती रोडबाजी पारधी (३६), रमेश काशीराम ठाकरे (५५), प्रशांत लक्ष्मण धोटे (५०), सुदाम शंकर वाडे (५०), विनायक माधव प्रसन्नकर, प्रताप प्रभाकर डंभारे (३५), राम किसन पेटेवार (२६), राजु विलास गावंडे (२०), सुधाकर शामराव कांबळे (३२), राहुल वसंत लढे (३५) यांना अटक करण्यात आली. तर मटका अड्डा चालविणारा सतिष यल्लरवार हा फरार आहे.
यापुर्वी दि.१४ ला पारवा येथे जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने धाड मारून ४७ हजार रूपयांच्या मुद्देमालासह ८ जणांना ताब्यात घेतले. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक दत्ता नलावडे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा शेख आसिफ शेख चांद (२१) याचेसह शेख असलम शेख रेहमान (१९), उत्तम बापुराव तायडे (६२), राजु गंगाधर धवने (२८), मन्सुर अली अकबर अली लालानी (५८), आकाश रामराव मोहिते (२०), सुनिल डोमाजी शेंडे (३५) यांना अटक करण्यात आली. या दोन्ही कार्यवाहीमध्ये स.पो.नि.सारंग नवलकर, जमादार नरेंद्र मानकर, कैलास देवकर, विशाल भगत, सचिन आडे, भोजराज करपते, नितिन वास्टर, प्रमोद इंगोले, विवेक पेठे, प्रमोद मडावी,मयुरी मांगुळकर यांनी सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पोलीस पथकाने घाटंजी तालुक्यात राबविलेल्या धाडसत्रामुळे घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद करण्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाला कवडीचीही विंâमत न देता घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर व पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार वंजारे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना जणु संरक्षणच दिले आहे. पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये खुले आमपणे अवैध दारू विकल्या जाते. वाहतुकीची बेशिस्त तर अंगावर काटा आणणारी आहे. घाटंजी शहरात मुख्य बाजारपेठेच्या परिसरात खुलेआमपणे मटका अड्डे चालविल्या जातात. उल्लेखनिय म्हणजे नेहमी महाराष्ट्र बँक परिसरातील मटका अड्ड्यांवरच धाड पडते. मात्र कन्या शाळेच्या मागे, संत मारोती महाराज मंदीर परिसर, मटन मार्केट यासह विवीध भागात असलेल्या मटका अड्ड्यांवर कधी कार्यवाही होतांना दिसत नाही. महाराष्ट्र बँकेच्या परिसरात महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय आहे. बँक व या कार्यालयात महिलांची नेहमीच ये जा असते. मात्र मटका लावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या परिसरात भटकत असल्याने महिलावर्गाची प्रचंड कुचंबना होते. तर कन्या शाळेच्या मागील भागातही मटकाबहाद्दरांची वदळ राहत असल्याने प्रसंगी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात चालणारे काही प्रमुख मटका व जुगार अड्डे राजकारणी व्यक्ती चालवित असल्याने पोलीस विभागाची त्याकडे मेहेरनजर असते असा नागरिकांचा आरोप आहे.
विशेष पथकाच्या कार्यवाही नंतर एक दोन दिवस हे व्यवसाय बंद राहतील व त्यानंतर पुन्हा जैसे थे स्थिती होईल. त्यामुळे अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलीसांच्या मुसक्या आवळण्याची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment