Pages

Tuesday, 22 May 2012

उलट्या फिरणा-या ‘काट्यांमुळे’ घाटंजीत घड्याळीची ‘वेळ’ खराब


काही महिन्यांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घाटंजी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दयनीय पराभव झाला होता. जिल्हा परिषद तर सोडाच पण पंचायत समितीची एक जागाही रा.कॉ.ला पदरात पाडता आली नाही. तालुक्यातील दोन दिग्गज नेते एकत्र असतांना राष्ट्रवादीचा असा पराभव कदाचित विरोधकांनाही अपेक्षीत नव्हता. विजय व पराभव एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. मात्र पराभवानंतर त्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचा प्रघात राजकीय पक्षांमध्ये असतो. मात्र घाटंजी तालुक्यात तसे झालेले दिसत नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध आपली उमेदवारी दाखल करणारे व पक्षासोबत असल्याचे दाखवुन छुप्या पद्धतीने विरोधकाला सहकार्य करणारे तथाकथित पक्षनिष्ठ अजुनही राष्ट्रवादी मध्ये आहेत. त्यांच्यावर पक्षविरोधी कुरापती केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही झाल्याचे ऐकीवात नाही. तालुक्यात झालेल्या मानहानीजनक पराभवाची जबाबदारी स्विकारून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश डंभारे यांनी राजीनामा देण्याची औपचारीकता पुर्ण केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या तालुकाध्यक्षांच्या निवडीत त्यांच्यावरच ती जबाबदारी पुन्हा एकदा सोपविण्यात आली. तालुक्यातील एक मोठा गट कॉंग्रेसमधुन राष्ट्रवादी मध्ये आला असला तरी तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाला माणसांची उणिव भासत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. पक्षबांधणीसाठी सक्षम नेतृत्वाकडे जबाबदारी असणे गरजेचे असते. स्वतंत्र निर्णयक्षमता असल्याशिवाय कोणीही त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. प्रकाश डंभारे हे माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अत्यंत जवळचे आहेत. ‘मालक’ म्हणतील तीच पुर्व दिशा असा त्यांचा ठाम विश्वास आहे. एकंदरीतच ते स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. वाड्यावरून येणारा आदेशच शिरोधार्य मानुन ते काम करतील. त्यामुळे त्यांचा स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांवर वचक राहणे शक्यच नाही. राष्ट्रवादीतील नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी देण्या ऐवजी जे आहेत त्यांच्या पलीकडे न जाण्याच्या कार्यपद्धतीमुळे सध्या तालुक्यात राष्ट्रवादीवर खराब वेळ आली आहे.
नगर परिषद निवडणुकीत माजी खासदार पुत्राने दोन प्रभागात सेनेशी सलगी करून रा.कॉ. उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. न.प.उपाध्यक्ष पद भोगलेल्या नगरसेवकानेही उमेदवारी मिळाली नाही म्हणुन पक्षविरोधी प्रचार केला. परिणामस्वरूप स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले असते तर नगर परिषदेवर आज राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राहीली असती. त्यावेळी सुद्धा पक्षासोबत दगा करणा-यांना अभय मिळाले.
पक्षात नव्याने आलेल्या सुरेश लोणकरांना पक्षाने शिवणी जि.प.गटात उमेदवारी दिली होती. त्यामुळे या जागेसाठी पुर्वीपासुन ईच्छुक असलेले राष्ट्रवादीचे दोन उमेदवार स्वाभाविकपणे दुखावल्या गेले. दोघांनीही उमेदवारी दाखल केली. त्यापैकी एकाने आपले बंड कायम ठेवले तर दुस-याने कथितपणे पक्षादेश शिरोधार्य मानुन माघार घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना तन मन धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रचार कार्याच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या ग्रामदैवतासमोर दिलेला शब्द मात्र त्यांनी पाळला नाही. पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करणे तर सोडाच पण त्यांचा पाडाव करण्यासाठी तन, मन, धनाने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे संपुर्ण तालुक्याने अनुभवले. एवढ़ेच नव्हे तर निवडणुकीच्या एक दिवस आधी त्यांच्याच शिक्षण संस्थेच्या ईमारतीत विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत गुप्त बैठकी घेऊन पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी रणनीतीही आखली. या सर्व कुरापतींमुळे राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांचा दारूण पराभव झाला. जे झाले ते झाले. मात्र या सर्व अनुभवातून पक्षाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाला चालविण्याची जबाबदारी असलेले हे काटे असेच उलटे फिरत राहिले तर भविष्यामध्ये या पक्षाला तालुक्यात स्थान राहील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment