Pages

Friday, 11 May 2012

चिमुकलीला पळविण्याच्या बेतात असलेल्या तरूणीस अटक

भरवस्तीतील घटनेने घाटंजीत खळबळ
शेकडो लोकांनी केला तरूणीचा पाठलाग



पाच वर्षांच्या चिमुकलीस पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीला नागरिकांनी शिताफिने पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. घाटंजीतील नेहरूनगर भागात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 
अश्विनी विठ्ठल गायकवाड (२३) रा.मांडवा ता.घाटंजी असे अटक करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. आज सकाळी ११ वाजेदरम्यान नेहरूनगर भागातील सुमारे पाच वर्षांची चिमुकली घरी न आढळल्याने तिच्या कुटूंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. तेवढ्यात मुलीच्या आजीला ती एका अनोळखी तरूणीजवळ दिसली. म्हातारी आपल्याकडे येत असल्याचे दिसताच सदर तरूणीने मुलीला घेऊन तिथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वृद्धेने तरूणीचा पाठलाग करून तिला गाठले. मुलगी बेपत्ता असल्याची वार्ता परिसरात वा-यासारखी पसरल्याने अनेक नागरिक घराबाहेर आले होते. त्यामुळे शेकडो लोकांच्या जमावाने त्या तरूणीस घेरले व तिच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली. यावेळी जमाव संतप्त झाला होता.  त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. घाटंजी पोलीसांनी सदर तरूणीस ताब्यात घेऊन तिला ‘मायापाखर’ सुधारगृहात रवाना केल्याची माहिती आहे. ही तरूणी गुन्हेगारी प्रवृत्तीची असुन यापुर्वीही तिला काही ठिकाणी चोरी करतांना नागरीकांनी पकडून दिल्याचे यावेळी काही नागरिकांनी सांगीतले.
पोलीसांनी या प्रकरणात कसुन चौकशी करून यामागे मुले पळविणारी टोळी तर नाही ना याबाबत तपास करावा अशी मागणी होत आहे.


कुलरचा शॉक लागुन नवविवाहितेचा मृत्यू

तालुक्यातील पांढुर्णा (बु.) येथे दिपाली नितिन देठे (२३) या नवविवाहीतेचा कुलरचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. विजेचा झटका लागल्यावर उपचारासाठी यवतमाळ येथे नेतेवेळी रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. सुमारे एक महिन्यापुर्वीच दिपाली हिचे गावातीलच नितिन देठे याचेशी लग्न झाले होते. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment