Pages

Sunday 29 April 2012

आता तिथे पाण्यासाठी सुद्धा ‘तंटा’ होत नाही......!

बक्षिसाच्या रकमेतून पाणी पुरवठा
सायतखर्डा गावाचा स्तुत्य उपक्रम

सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्यासाठी होणारे भांडणतंटे ग्रामिण भागात नित्याचेच. प्रसंगी किरकोळ वादाचे रूपांतर गंभिर भांडणातही झाल्याची उदाहरणे नेहमीच निदर्शनास येतात. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. फार क्वचित गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे ग्रामिण भागात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. शासन प्रशासनाच्या उपाययोजना बहुतांशी कागदोपत्रीच असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र सायतखर्डा गावाने शासनातर्फे  मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून ही समस्या सोडविली आहे. सायतखर्डा गावाला यावर्षी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत ३ लाख रूपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. ही बक्षिसाची रक्कम व्यर्थ गोष्टींवर खर्च करण्या ऐवजी त्या माध्यमातून गावाची तहान भागविली जावी अशी कल्पना तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गजानन लेनगुरे यांनी मांडली. याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केल्यावर सर्वांनाच ही कल्पना आवडली. सायतखर्डा गावाची लोकसंख्या जास्त आहे. येथे असलेली पाणी पुरवठा योजना अपुर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे गावात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तंटामुक्त ग्राम समिती, पाणी पुरवठा समिती व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रीत येऊन बैठक घेतली. तंटामुक्तीच्या बक्षिसातून पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे ठरविले. गावात असलेल्या जलकुंभात सुमारे ६ किलोमीटर अंतरावरून पाणी येत होते. त्यामुळे २४ तासातही हा जलकुंभ भरत नव्हता. त्यामुळे जलकुंभात येणारे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडण्यात आले. त्या विहिरीवर सबमर्सिबल मोटर पंप बसवून विहिरीतून पाणी पाईपलाईनद्वारे जलकुंभात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. आता हा जलकुंभ दिवसातून दोन वेळा भरत आहे. या जलकुंभाची क्षमता ५० हजार लिटरची आहे. या सामुहीक प्रयत्नामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाण्यासाठी वेगळ्या शासकीय निधीची वाट न पाहता तंटामुक्तीच्या बक्षिसाच्या रकमेतून एक लाख रूपये खर्च करून पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून सायतखर्डा गावाने एक अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे. तंटामुक्त गाव समितीचे युवा अध्यक्ष गजानन लेनगुरे यांनी या बाबत पुढाकार घेतला ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. गावात पाण्यासाठी अथवा ईतर कोणत्याही कारणासाठी किरकोळ तंटेही होऊ नयेत म्हणूनच प्रथम प्राधान्याने पाण्याची समस्या मार्गी लावल्याचे लेनगुरे यांनी देशोन्नतीशी बोलतांना सांगीतले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment