पारवा वनपरिक्षेत्रात प्रचंड गैरप्रकार
बंधारे खोदताना झाडांची कत्तल
महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणा-या कामांमध्ये लाकडाचा काळाबाजार करणा-या व्यापा-यांचा शिरकाव झाला आहे. रोहयोची कामे संबंधीत विभागाने मजुर लावून करावी असा नियम आहे. मात्र अधिकारी या नियमाला धाब्यावर बसवुन कंत्राटदारांना ही कामे देत असल्याचा धक्कादायक प्रकार घाटंजी तालुक्यासह ईतरही भागात बिनबोभाटपणे सुरू आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी अनेक कामे प्रामुख्याने निसर्ग संवर्धन व पर्यावरणाशी संबंधीत आहेत. मात्र ही कामे करतांना झाडांची बेसुमार कत्तल केल्या जात आहे. बंधारे, वनतळे यासह विवीध कामांमध्ये येणा-या आजुबाजूच्या वनराईला तोडण्यात येत असल्याने या कामातून नेमके कोणते निसर्ग संवर्धन साधल्या जात आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पारवा वनपरिक्षेत्रात हा प्रकार सर्रास सुरू आहे. रोहयोच्या कामातील मलिद्यासह आजुबाजूची मौल्यवान झाडे तोडण्याचा अलिखीत परवानाच मिळत असल्याने लाकडाच्या काळाबाजारातील तगडे व्यापारी आता रोहयोच्या कामातही उतरले आहेत. जिल्ह्यातील लाकडाच्या ठेकेदारीत चर्चेत असलेले लच्छु पाटील, अमीन शेख, राम बाबु, मुन्ना सेठ यांचा या कामांमध्ये सध्या चांगलाच बोलबाला आहे. प्रादेशिक पक्षांच्या स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन हे व्यापारी धडाक्यात ही कामे करीत आहेत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा केळापूर तालुक्याचा एक पदाधिकारी या कामांमध्ये आघाडीवर आहे. स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अधिका-यांशी संगनमत करून रोहयोची कामे बळकावीत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. नियमानुसार एका गावामध्ये रोहयोंतर्गत जास्तीत जास्त ६० लाखांची कामे करता येतात. मात्र राजकीय दबावतंत्र तसेच मिळणा-या कमीशनसाठी अधिकारी काही गावांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त निधीच्या कामाना मंजुरात देत आहेत. रोहयोची बरीच कामे जंगलात करण्यात येत असल्याने सागवानासारखी मौल्यवान झाडे कंत्राटदारांच्या घशात जात आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment