गेल्या काही महिन्यांपासुन घाटंजी तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये जेसीबीचा खुले आम वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वनविभाग त्यामध्ये आघाडीवर आहे. तालुक्यातील अनेक भागांमध्ये सध्या वनविभागातर्फे बंधा-यांचे काम सुरू असुन त्यासाठी जेसीबीचाच प्रामुख्याने वापर होत आहे. रोजगार हमी, ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ या एकाच वाक्याने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत नेमका काय प्रकार सुरू आहे हे लक्षात येते. घाटंजी व पारवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत बंधारे, वन्यजीवांसाठी पाणी साठवण तलाव, यासह विवीध कामे सध्या सुरू आहेत. ही सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या मजुरांच्या माध्यमातून करण्यात यावीत असा नियम आहे. मात्र महसुल व वनविभागाच्या अधिका-यांनी या नियमाला सपशेल हरताळ फासुन बिनदिक्कतपणे जेसीबी व तत्सम यंत्रांचा वापर करून ही कामे करण्याचा सपाटा लावला आहे.
बहुतांश ठिकाणी रात्रीच्या वेळी ही कामे केल्या जात आहेत. संबंधीत कामांवर एकही मजुर उपस्थित नसतांना मस्टरवर मात्र मजुरांची उपस्थिती असल्याचे दाखविण्यात येत असल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत होणारी अनेक कामे अनावश्यक ठिकाणी करण्यात येत असल्याच्याही तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होऊ शकत नाही तिथे बंधारे बांधण्याची किमया वनविभाग करीत आहे.
No comments:
Post a Comment