ऐन लग्नसराईत वाढलेल्या महागाईमुळे वधूपित्यांना घाम फुटला असून त्यांचे लग्नाचे अंदाजपत्रक कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लग्न पहावे करून, घर पहावे बांधून असे म्हंटले जाते. लग्न करण्यासाठी वधूपित्यांना अनेक बाबींची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहेत.
अगदी स्वत:चे घर बांधताना मिस्त्री शोधण्यापासून तर सामानाची जमवाजमव करण्यापर्यंत घरमालकास अनेक कामे पार पाडावी लागतात. घरमालकास आपले काम लांबणीवर टाकता येते. परंतु वधुपित्यास अशी सोय उपलब्ध नसते. विहित कालावधीत मुलीच्या डोक्यावर अक्षता पडून आपण केंव्हा जबाबदारीतून मुक्त होतो. हीच धाकधूक त्यांना लागलेली असते. डिसेंबर महिन्यापासून वर संशोधनाच्या तयारीत लागलेल्या वधुपित्यास महागाई आकाशाला भिडली असल्याने हे सुख घाम फोडणारे ठरत आहे. लग्नाचा प्रसंग जीवनात एकदाच येतो. ही जाणीव ठेवून चांगल्या प्रकारे कार्य पार पाडण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू असतो. सर्वांचे समाधान करण्यासाठी जेंव्हा पैशाची जुळवाजुळव करणे सुरू होते. त्यावेळी घरी तयार केलेले अंदाजपत्रक बाजारात पाऊल ठेवताच विस्कळीत होत असल्याचे दिसून येते.
मे, जून महिन्यात लग्नसराईची धामधूम असते. याच काळात बाजारात सोने, कापड, जीवनावश्यक वस्तूंच्या भावात मोठी वाढ झालेली आहे. या महागाईने गोरगरीब वधुपित्याचे चेहरे काळवंडल्याचे दिसून येत आहेत. यावेळी महागाईने कळस गाठल्याने प्रत्येकच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र वधुपित्याला महागाई असली तरी लग्नासाठी खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. याच कालावधीत शहरातील मंगल कार्यालये, वांजत्री, फोटोग्राफर, डेकोरेशनवाले, वाहनधारक व्यस्त आहेत. गोरगरीब व मध्यमवर्गीय वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य जमा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वरपक्षाकडून लादलेल्या गोष्टींची पुर्तता करण्यासाठी त्याला चप्पल झिजवावी लागत आहे. नवरदेव मुलाचा साधासुधा सुट व कपडा घेणे म्हंटले तर १० हजार रूपये लागतात. नव-या मुलाच्या आवडीनुसार तो महाग होत जातो. मुलाच्या प्रत्येक नातेवाईकांचा मानपान झाला पाहिजे अशी अपेक्षा असल्यामुळे त्याचा भुर्दंड वधुपित्यावर बसतो.
१००० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ३० ते ४० हजार मोजावे लागत आहेत. लग्नामध्ये सोन्याची खरेदी सुद्धा महत्वाची असते. वधुपिता हलाकीचे जीवन जगत असला तरी लाडक्या लेकीच्या विवाहासाठी आवश्यक तेवढ्या सोन्याची खरेदी त्याला करावीच लागते. आज १० ग्रॅम सोन्याला २९ हजार रूपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. याशिवाय घरातील सदस्यांसाठी कपडे, मंगल कार्यालय, भेटवस्तू, मंडप, भांडी घराची रंगरांगोटी यासारख्या अनेक बाबींचा ताळमेळ बसवताना वधूपित्यांच्या नाकीनऊ येत आहेत.
No comments:
Post a Comment