मिश्कील शुभेच्छा फलकांची घाटंजीत चर्चा
अरेच्चा आता हा कोण नविन नेता तयार झाला ? हा तर गावभर सर्वांना शिव्या देत फिरणारा केशटो. याच्याही नावाचे होर्डींग ? ही तर कमालच झाली. आजकाल मोठ्या फलकावर फोटो व नाव आले की तो नेता होऊन जातो. ज्याच्या मागे चार कार्यकर्ते नाहीत त्या नेत्याच्या वाढदिवशी मोठमोठे शुभेच्छा फलक लागतात. मग बिचारे केशटोभाऊ का प्रसिद्ध होऊ नये? त्यांच्याही नावाचे होर्डींग्स का लागू नये? अशा मिश्कील खुसखुशीत चर्चांनी आज घाटंजीकरांची सकाळ सुरू झाली. याला कारण ठरले मानसिक संतुलन बिघडल्याने शहरात शिव्या देत फिरणा-या केशटो नामक ईसमाच्या नावाने सगळीकडे लावण्यात आलेल्या नविन वर्षाच्या शुभेच्छा फलकांचे. घाटंजीतील पोलीस स्टेशन चौक, सिनेमा टॉकीज चौक, शिवाजी चौक तसेच ईतर भागातही हे फलक लावण्यात आल्याने रस्त्यावरून ये-जा करणारा प्रत्येकजण त्याकडे कुतूहलाने पाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. एक वेडसर महिला तर पोलीस स्टेशन चौकात हे फलक न्याहाळत बराच वेळ उभी होती. आपल्या सोबत फिरणारा केशटो आज ईथे कसा याचे तिला मोठे नवल वाटले. गेल्या दोन तिन वर्षांपासून घाटंजी शहरात कोणत्याही निमित्याने होर्डींग्स लावण्याचे फॅडच झाले आहे. एका माजी नगरसेवकाचा तर अशा होर्डींग्सबाजीत हातखंडा आहे. त्याचा स्वत:चा वाढदिवस असो वा त्याच्या सर्वोच्च नेत्याचा, शहरात सर्वत्र फलक लावण्यात येतात. काही वर्षापुर्वी तर त्याने रस्त्याच्या मधोमध पथदिव्याच्या खांबावर लावलेल्या होर्डींग्सवर रोषणाई करण्यासाठी बेकायदेशीरपणे चक्क पथदिव्यांच्या कनेक्शन मधुनच विज पुरवठा घेतला होता. सद्यस्थितीत काही राजकीय पक्षांकडे कार्यकर्त्यांची कमतरता असल्यामुळे हवसे गवसेही फलकावर झळकतात. अशांना केशटोभाऊंच्या शुभेच्छांमुळे आता थोडा विचार करावा लागणार आहे. अशी विबंडनात्मक फलके लावण्याचा पहिला प्रयोग औरंगाबाद शहरात झाला. त्यानंतर यवतमाळकरांनी उपरोधीकपणे टॉमीच्या वाढदिवसाला असे शुभेच्छा फलक लावले होते. त्यावेळी माध्यमांनी याची प्रकर्षाने दखल घेतली होती. आता घाटंजीकरांनी आपल्या विनोदबुद्धीतून एक वेगळा संदेश जगापुढे ठेवला आहे. मोठमोठ्या होर्डींग्समुळे शहराच्या होणा-या विद्रुपीकरणाला यामुळे आळा बसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. काहीही असले तरी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या घाटंजीकरांना चर्चेसाठी एक खमंग विषय मिळाला हे निश्चित.