Pages

Thursday 8 December 2011

नागरीकाचा ‘संताप’ पाहुन वाढला सेना नगरसेवकाचा ‘रक्तदाब’

वर्तमान नगरसेवकांना आपल्या पाच वर्षातील उठाठेवींमुळे ही निवडणुक चांगलीच जड जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. याबाबत देशोन्नतीने ‘घाटंजीत वर्तमान नगरसेवकांसाठी दरवाजे बंद’ या मथळ्याखाली वृत्तही प्रसिद्ध केले होते. आतापर्यंत केवळ दरवाजे बंद करणारे नागरीक उघडपणे या नगरसेवकांना जाब विचारायला लागले असुन त्यातुनच काही ठिकाणी संघर्षही निर्माण झाल्याचे चित्र आहे. केवळ दडपशाहीच्या आधारावरच राजकारणात आपले अस्तित्व टिकवणारा एक नगरसेवक व त्याचे कार्यकर्ते प्रचारादरम्यानही मतदारांशी चढ्या आवाजातच बोलत असल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सुर आहे.
अडीच वर्षे नगराध्यक्षपद हातात असतांना बहुमत नसल्याचे कारण सांगुन आपली अकार्यक्षमता व मनमानी कारभारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणा-या सेनेच्या नगरसेवकावर सर्वसामान्य नागरीक प्रचंड नाराज असल्याचे दिसुन येत आहे. यापुर्वी घाटी प्रभागातील एका वार्डातुन निवडुन आलेल्या या नगरसेवकाने गत निवडणुकीत दिलेली आश्वासने पुर्ण न झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये संताप आहे. मात्र आतापर्यंत कुणीही ऐकण्यास नसल्याने निवडणुकीच्या निमित्याने प्रचारादरम्यान नागरिक या नगरसेवकाची चांगलीच ‘झडती’ घेत आहेत. कालपरवा प्रचारादरम्यान एका नागरिकाने सदर नगरसेवकाला खडसावुन जाब विचारला. ‘‘चांगली कामे तर केलीच नाहीत पण आमच्या पोरांना खोट्या गुन्ह्यात अडकविले अन आता पुन्हा आमच्याकडेच मते मागायला आलात?’’ असा सवाल त्याने करताच ‘भाऊंच्या’ कार्यकर्त्यांचे पित्त खवळले. त्यांनी त्या नागरीकाला दम दिला व नगरसेवकाला, ‘जाऊ द्या भाऊ तो शहाणाच आहे, नंतर पाहु त्याला...’ असे म्हणुन तिथुन सटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नागरिकानेही कार्यकर्त्यांच्या दमदाटीला तेवढ्याच खंबिरपणे उत्तर दिले. त्यावेळी या परिसरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घडामोडींमुळे या नगरसेवकाचा अचानक रक्तदाब वाढला व त्यांना ऑटो मध्ये बसवुन तातडीने तिथुन हलविण्यात आले. कार्यकर्त्यांनी नागरिकास केलेल्या दमदाटीची पोलीस तक्रार होईल या भितीने प्रचारात असलेल्या सर्वांनीच काढता पाय घेतला. असे या भागातील नागरीकांनी सांगितले.
त्याच प्रमाणे शासकीय विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतही या नगरसेवकाला असाच अनुभव आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नाल्यांचा होत नसलेला उपसा, रस्त्यांची दुरावस्था व अनेक अडचणींनी व्यापलेल्या भागात या नगरसेवकाने आजवर फिरकुनही पाहिले नसल्याने एक महिला त्यांचेवर चांगलीच बिथरली. आता इकडे पाय सुद्धा ठेऊ देणार नाही असे खडसावुन त्या महिलेने चक्क त्या नगरसेवकावर पायताण उगारली. महिलेचा संताप पाहुन नगरसेवकाचे कार्यकर्ते अवाक झाले. त्यानंतर सर्वच तिथुन खाली मान घालुन निघुन गेले असे सांगण्यात येत आहे. सेनेच्या नगरसेवकाला नागरिकांनी  धुडकाविल्याची खमंग चर्चा घाटंजी शहरात सुरू असुन येत्या दोन तिन दिवसात सेनेच्या या नगरसेवकाला आणखी किती ‘झडती’ द्यावी लागणार याकडे घाटंजीकरांचे लक्ष लागले आहे.
साभार:- देशोन्नती

No comments:

Post a Comment