Pages

Thursday 15 March 2012

शेतक-यांच्या हितासाठी घाटंजी बाजार समिती कटीबद्ध - अभिषेक ठाकरे



शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर राहिल असे आश्वासन सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिले. बाजार समिती मार्केट यार्डावर आयोजीत विवीध विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पायाभुत सुविधांची उभारणी होताच बाजार समितीला ‘ऑनलाईन’ करून शेतक-यांना जगभरातील बाजारभावाची माहिती देण्याची सुविधाही कार्यान्वयीत करण्यात येईल असे ते म्हणाले. शासनाने वारंवार कापुस उत्पादक शेतक-यांची थट्टा करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापुस पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर होते. तर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, पांढरकवडा बाजार समितीचे उपसभापती जानुसेठ जिवानी, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलतांना लोकनेते सुरेश लोणकर यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकुन टिका केली. शेतकरी आत्महत्या का होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती जिल्हा दौ-यावर असताना कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शासनाने आपली बौद्धीक दिवाळखोरीच सिद्ध केली असे ते म्हणाले. सांसदीय समितीचा अहवाल जाण्यापुर्वीच कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेणे म्हणजे दाक्षीणात्य राज्यातील भांडवलदारांचा गल्ला भरण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी क्षेत्राशी संबंधीत एवढा महत्वाचा निर्णय घेतांना देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशातील एकुण ९० टक्के कापसाचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. मात्र राज्यात केवळ १० टक्के मिल आहेत. तर ज्या केरळ राज्यात १० टक्के कापुस उत्पादन होत नाही तिथे ९० टक्के मिल आहेत. त्यामुळेच वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापुस उत्पादक शेतक-यांवर निर्यातबंदीची कु-हाड चालवली असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब पारवेकर यांनी शेतक-यांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीबद्दल निषेध नोंदविला. शेतक-यांना आपले हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सी.सी.आय.ने यावेळी कापुस खरेदी का केली नाही असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २ कोटी ८ लाख ८७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मुलभूत सुविधांमध्ये लिलाव ओटा (धान्य यार्ड) करीता ११.७० लाख, पिण्याच्या पाण्याची सुविधा १ लाख, संरक्षण भिंत २४.१५ लाख, सिमेंट रस्ते २७.६४ लाख, ईलेक्ट्रीक सुविधा ३.५३ लाख, पाण्याची टाकी १२.९७ लाख, सांडपाण्याची व्यवस्था ३.१४ लाख, तर उत्पादीत सुविधांमध्ये धान्य चाळणी यंत्र ३०.६८ लाख, घनकचरा व्यवस्थापन १५.४८ लाख, गोदाम (धान्ययार्ड) २२.७० लाख, गोदाम (कापुस यार्ड) ४५.४१ लाख, भुईकाटा (५० मेट्रीक टन) १०.४२ लाख असा निधी बाजार समितीला प्राप्त झाला आहे. ही सर्व कामे ९ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होतील असा विश्वास सभापती अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती सचिन पारवेकर यांनी केले. संचालन बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार व आभार प्रदर्शन प्रकाश डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment