Pages

Tuesday 29 January 2013

भ्रष्टाचारामुळे तहान भागवणा-या योजनांवर फिरले पाणी



ग्रामीण भागाची तहान भागविण्यासाठी राबविण्यात आलेल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे ‘लिकेज’ झाल्याने पाणी टंचाईची भिषणता घाटंजी तालुक्यात वाढली आहे. भारत निर्माण व जिवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेत पाणी पुरवठा समित्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे केवळ पदाधिका-यांचेच हात ओले झाले. ग्रामस्थांच्या नशिबी मात्र पाण्याचा थेंबही आला नाही. वासरी, कुर्ली, अंजी (नृ), भांबोरा यासह अनेक गावांमध्ये या योजनेच्या निधीत आर्थिक अफरातफर झाली आहे.
कुर्ली, अंजी (नृ.) येथिल पाणी पुरवठा समितीवर पंचायत समितीने अद्याप एफ.आय.आर. दाखल केला नाही. तसेच भांबोरा येथिल गैरव्यवहाराची चौकशीच थंडबस्त्यात आहे. उल्लेखनिय म्हणजे भांबोरा येथे भारत निर्माण योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांनी चौकशी केली. लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असतांना सदर चौकशीत केवळ १६ हजार ९०० रूपये एवढीच वसुली पात्र रक्कम दाखविण्यात आली. तब्बल २० ते २५ लाख रूपये खर्च होऊनही भांबोरा येथिल पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत अनेक वर्षांपासुन पाण्याचा थेंबही पोहचला नाही. 
अंजी (नृ.) येथे पाणी पुरवठा करण्यासाठी भारत निर्माण योजनेंतर्गत २० लाख ६७ हजार रूपये निधी मंजुर करण्यात आला होता. मात्र पाणी पुरवठा समितीने या निधी मध्ये अफरातफर केली असा आरोप आहे. कामात झालेल्या अनियमिततेप्रकरणी एफ.आय.आर.दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी १८ नोव्हेंबरला दिले होते.  याप्रकरणीही पंचायत समितीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. वासरी येथेही भारत निर्माण योजनेत गैरप्रकार झाला होता. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यानी याची तक्रार केल्यावर संबंधीतांवर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हाही प्रशासनाने टाळाटाळ केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अफरातफरीची रक्कम मात्र अद्यापही वसुल करण्यात आली नाही. 
अशा एक ना अनेक प्रकरणांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे पाणी टंचाई अधिकच भिषण झाली आहे. तालुक्यातील अनेक नदी-नाले आटले असून विहिरींची पातळीदेखील खोल गेली आहे. ३०० फूट खोदूनही पाणी लागत नाही म्हणून अनेक ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याच्या कार्याला खीळ बसली आहे. घाटंजी तालुक्यातील फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येने जिल्हा आरोग्य यंत्रणासुद्धा हादरून गेली आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे ठिसूळ होऊन आदिवासी भागात राहणाNया  जनतेच्या आरोग्याची भीषण समस्यादेखील निर्माण झाली आहे. अशा फ्लोराईडयुक्त जलस्रोत असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केल्या जातो. गावात जेव्हा पाण्याचा टँकर येतो, तेव्हा पाण्यासाठी गावकNयांची रेटारेटी होते. 
तालुक्यातील पारवा, कुर्ली, शिवणी, पार्डी (नस्करी), भांबोरा, सायफळ, गोविंदपूर, बिल्लायता, फनारवाडी (पोड), नामापूर (तांडा), घोटी, चिखलवर्धा यासह अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे
घाटंजी शहरातील अनेक भागांमध्ये सुद्धा उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड टंचाई असते. नगर परिषदेची पाणी पुरवठा व्यवस्था अत्यंत कामचलाऊ असुन दोन वेळचे पाणी बिल देऊन न.प.दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करते. घाटी परिसरात तर नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागुन काढावी लागते. दरवर्षी उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणी टंचाई आढावा बैठक होते. मात्र तेथे झालेल्या चर्चेतून अपेक्षीत असे फलित कधी होताना दिसत नाही.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment