Pages

Monday, 14 January 2013

माहितीचा अधिकार हे लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र

न्यायमुर्ती गिलानी यांचे प्रतिपादन
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी साधला दिलखुलास संवाद

माहितीचा अधिकार हे लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र असुन या माध्यमातून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राहते. जनतेने त्याचा योग्य उपयोग करावा. या अधिकाराचा दुरूपयोग होणे ही चुकीची गोष्ट आहे. ज्यांनी आपल्या कामात कसुर केला नाही त्यांना दुरूपयोगाची चिंता नसावी असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांनी केले. येथिल शि.प्र.मं.विज्ञान व गिलानी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्रुद्दीनभाई गिलानी, नगराध्यक्ष किशोर दावडा, माजी प्राचार्य वाघ, अलिया शहेजाद यांची उपस्थिती होती. घाटंजी येथे न्यायालयाच्या उद्घाटनासाठी न्यायमुर्ती आले असता आज त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी सविस्तरपणे उत्तर देऊन विद्यार्थ्यांना विवीध विषयांवर मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना न्यायमुर्ती म्हणाले की, आजच्या काळातील साधु संत पंचतारांकीत झालेत. ज्या साई बाबांनी आयुष्यभर फाटके कपडे घालुन मानवतेची सेवा केली त्यांना पैशाचा माज चढलेले लोक सोन्याने मढविण्यासाठी निघालेत. त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? याचा विचारही समाजाने केला पाहिजे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, देशात सद्यस्थितीत सुमारे अडीच कोटी खटले प्रलंबीत आहेत. सर्वच खटल्यांच्या निकालासाठी वेळ लागत नाही. न्यायाधिशांची कमतरता व कायद्यातील क्लिष्टतेसोबतच अनेक कारणे अशी आहेत ज्यामुळे प्रक्रीयेला विलंब होतो. एका विद्यार्थीनीने मुलींच्या पोषाखाबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, कोणी काय घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र समाजात जे शोभुन दिसते ते केल्यास अधिक श्रेयस्कर ठरते. खाप पंचायती सारख्या समांतर व्यवस्थेला कोणताही आधार व अधिकार नाही. त्यांचा आदेश पाळणारे लोक आहेत म्हणुनच त्यांचे अस्तित्व आहे असे ते म्हणाले. एका विद्यार्थ्यांने मुला मुलींना संपत्तीमध्ये समान वाटा मिळावा याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे कौतूक करून हे बदलत्या विचारधारेचे उदाहरण असल्याचे म्हटले.  जनतेला आणखी मुलभूत अधिकार कोणता हवा हे जनतेनेच सुचवावे. न्यायालय समाजभावनेचा प्रकर्षाने विचार करते. न्यायक्षेत्रात विद्यार्थ्यांना करीयर करण्याचा अनेक संधी आहेत. ईतर क्षेत्रांप्रमाणेच याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न मनमोकळेपणाने न्यायमुर्तींना विचारले. त्यांनीही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रसंघ सचिव गौरव गावंडे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन श्रीमती तिरमनवार यांनी केले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment