Pages

Thursday 10 January 2013

घाटंजी पंचायत समितीसाठी ‘सी.ई.ओं.’ चे आदेश कवडीमोल

भारत निर्माण गैरव्यवहार प्रकरणी अद्याप एफ.आय.आर.नाही
लाखो रूपयांच्या अफरातफरीपुढे अधिका-यांचे लोटांगण

तालुक्यातील काही ग्रामपंचायती अंतर्गत भारत निर्माण पाणी पुरवठा योजेनेमध्ये लाखो रूपयांची अफरातफर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहार करणा-यांवर तडकाफडकी फौजदारी कार्यवाही करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर चौकशी होऊन ज्या ठिकाणी अफरातफर आढळली त्या पाणी पुरवठा समित्यांच्या अध्यक्ष व सचिवांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर.नोंदविण्यात यावा असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी वारंवार पंचायत समितीला दिले आहेत. मात्र कुर्ली, अंजी (नृ.) येथिल पाणी पुरवठा समितीवर पंचायत समितीने अद्याप एफ.आय.आर. दाखल केला नाही. तसेच भांबोरा येथिल गैरव्यवहाराची चौकशीच थंडबस्त्यात आहे. उल्लेखनिय म्हणजे भांबोरा येथे भारत निर्माण योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्यांनी चौकशी केली. लाखो रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट असतांना सदर चौकशीत केवळ १६ हजार ९०० रूपये एवढीच वसुली पात्र रक्कम दाखविण्यात आली. त्यानंतर माजी पं.स.सदस्य सहदेव राठोड यांनी वरिष्ठांकडे पुन्हा तक्रारी केल्या. त्यानुसार १२ ऑक्टोबर २०११ रोजीच्या विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशावरून चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीने अद्याप काय चौकशी केली हे कोणालाच माहित नाही असे सहदेव राठोड यांनी सांगितले. तसेच लाखो रूपये गिळंकृत केलेल्यांवर केवळ गुन्हे दाखल करून लोकांना पाणी मिळणार का? त्यांचेकडून रकमेची वसुली कोण करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेमध्ये समितीच्या पदाधिका-यांनी १ लाख ५५ हजार ९१८ रूपयांचा अपहार केल्याची बाब उपअभियंता, पांढरकवडा यांनी केलेल्या तपासणीत पुढे आली आहे. या योजनेत अपहार झाल्याची तक्रार कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली होती. माजी सरपंच व पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष विलास बडगुलवार तसेच समितीच्या सदस्यांनी हा अपहार केल्याचा त्यांचा आरोप आहे. राजकीय दबावामुळे या प्रकरणाच्या चौकशीत व कार्यवाहीमध्ये प्रशासनाकडून जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्यात येत असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी ३१ ऑक्टोबरला गटविकास अधिकारी घाटंजी यांना या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 
या प्रकरणात सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे व जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत असल्यानेच एफ.आय.आर.दाखल करण्यासाठी चालढकल करण्यात येत असल्याबाबतची लेखी तक्रार सोलंकी यांनी संबंधीतांकडे केली आहे. पाणी पुरवठा समितीने एम.बी.रेकॉर्डवर सुद्धा खोडतोड केली असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment