Pages

Sunday, 13 January 2013

गुलामगिरी सोडा, न्यायासाठी झगडा, विजय सत्याचाच आहे !

न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांचे उद्गार
घाटंजी न्यायालयाच्या ईमारतीचे थाटात उद्घाटन




घटनेने जनतेला राजा केले आहे. देशातील सर्वसामान्य जनता कर भरते म्हणुन देश चालतो. ख-या अर्थाने जनताच सर्वकाही आहे. मात्र देशातील नागरिकाला आपल्या अधिकाराची जाण नाही. गुलामगिरीच्या मानसिकतेतून अजुनही आपला देश निघाला नाही. जनतेने ही मानसिकता सोडुन आपल्या अधिकाराचा वापर करावा. न्याय मिळविण्यासाठी लढा द्यावा. कोणत्याही दिव्याच्या मागे न धावता सत्याचा मार्ग निवडावा. अखेर विजय सत्याचाच आहे. असे प्रेरणास्पद उद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.एन.गिलानी यांनी काढले. घाटंजी न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी.बारणे यांनी भुषविले. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार काऊन्सीलचे सदस्य आशिष देशमुख, दिवाणी न्यायाधिश तथा न्यायदंडाधिकारी टि.ए.संधु, घाटंजी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड विजय भुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना न्यायमुर्ती गिलानी पुढे म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात ऋण कधीच फिटत नाही. माणुस ऋणातच जन्मतो व ऋणातच पेटवल्या जातो. माणसाने ऋण जाणुनच मरावे. मातीशी कधीही बेईमान होऊ नये असे ते म्हणाले. न्यायाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी न्यायाधिश व वकीलांचा सर्वात मोठा सहभाग असतो. 
न्यायाधिशाच्या निवाड्याची खरी परिक्षा सर्वसामान्य माणुसच करतो. चहा टपरीवर अथवा तत्सम ठिकाणी सामान्य माणुस न्यायनिवाड्याबद्दल जे बोलतो तेच खरे न्यायाचे मुल्यमापन असते. असे प्रतिपादन त्यांनी केले. न्यायप्रणालीचे जसे न्याय देण्याचे कर्तव्य आहे तसेच जनतेनेही आपली जबाबदारी ओळखावी. खोट्या तक्रारी घेऊन न्यायालयाची पायरी चढू नये. ग्रामिण भागात अशा तक्रारी करणारे ‘व्हिलेज बॅरिस्टर’ निर्माण झाले आहेत. अशा तक्रारी न्यायालयात तग धरू शकत नाहीत.  ज्यांचा कधी घटनेशी अर्थाअर्थी संबंध नसतो त्यांचीही नावे सरसकट टाकण्याचा पायंडा पडत आहे. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राजकारणी हे जनतेचे सेवक आहेत. ते जनते पर्यंत यायला हवेत. मात्र सद्यस्थितीत ‘लाल दिवे’ हे फक्त नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच केवळ भेट द्यायला येतांना दिसतात. कोणत्याही लाल दिव्यांचा सत्कार कोणी करू नये कारण त्यांचे अस्तित्व हे केवळ जनतेच्या पैशावरच असते. शेतकरी आत्महत्यांबाबत बोलतांना ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती ही संपुर्णपणे शेतक-यांच्या विरूद्ध आहे. त्याला न मरण्यासाठी कारण नसते तर मरण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात. सगळीकडे निर्लज्जपणाचा कळस गाठल्या जातोय. हे सर्व बदलायला पाहिजे. जनतेने आपल्या अधिकाराप्रती जागृत राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी.बारणे आपल्या भाषणात म्हणाल्या की, न्यायालयाच्या निकालाचा परिणाम केवळ पक्षकारावरच नव्हे तर समाजावरही होतो. सर्वांनीच याची जाणिव ठेवावी. अन्याय अत्याचार झाल्यावर कोर्टाची पायरी अवश्य चढावी असे आवाहन त्यांनी केले. स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीदिनी न्यायालयाच्या ईमारतीचे उद्घाटन हा सुवर्णयोग असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्तावीक अ‍ॅड विजय भुरे, संचालन श्रीमती कांबळे तर आभार प्रदर्शन न्यायाधीश एस.टी.संधु यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सैय्यद,  अ‍ॅड संजय राऊत, अ‍ॅड मनोज राठोड, अ‍ॅड अनंत पांडे, अ‍ॅड विनय चव्हाण, अ‍ॅड नेताजी राऊत, अ‍ॅड निलेश शुक्ला, अ‍ॅड निलेश चवरडोल, अ‍ॅड प्रेम राऊत, अ‍ॅड चंद्रकांत मरगडे, अ‍ॅड अनुपमा दाते यांनी परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment