काही किलोमिटर रस्त्याच्या बांधकामाला लाखो रूपये खर्च येतो. अनेक रस्ते तर कोटींच्या घरातही जातात. रस्ता झाला आता दळणवळण सुलभ होणार ही जनतेची भाबडी अपेक्षा अवघ्या काही काळासाठीच राहते. कारण एवढा अवाढ्यव खर्च करून बांधलेला रस्ता केवळ काही महिनेच सुस्थितीत राहतो. काही काळातच रस्त्याचे तिनतेरा वाजतात. घाटंजी तालुक्यातही सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. प्रचंड निधी खर्च झालाय. मात्र अपेक्षीत असे परिणाम मात्र कुठेच दिसत नाहीय. तालुक्यात सुमारे ३५० किलोमिटर रस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुमारे १२० किलोमिटर रस्त्यांचे डांबरिकरण झाले आहे. असे असले तरी डांबरिकरण झालेल्या बहुतांश रस्त्यांना खड्ड्यांनी व्यापले आहे. हे खड्डे बुजवितांना तयार झालेल्या उचवट्यांनी रस्ते अधिकच खडतर झाले आहे. काही रस्त्यांची तर एवढ्या वेळा डागडूजी झाली आहे की, तेवढ्या निधीत दुसरा रस्ताच तयार झाला असता.
रस्त्यांचे बांधकाम करतांना जे तांत्रिक निकष पाळायचे असतात त्याचे पालन होत नाही. निकृष्ट साहित्य, माती मिश्रित गिट्टी, वाळू, डांबरा ऐवजी विशिष्ट ऑईलचा वापर केल्या जातो. त्यामुळे रस्ते लवकरच उखडतात. तांत्रिक निकषांबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याचा फायदा कंत्राटदार व अभियंते घेतात. उल्लेखनिय म्हणजे गुणनियंत्रण विभागाने मुल्यमापन करून प्रमाणीत केलेले रस्तेही अवघ्या काही काळातच आपले खरे रूप दाखवतात. सिमेंट रस्त्यांच्या बाबतीतही हिच परिस्थिती आहे. शिरोली ते घोटी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. वाहनधारकांना या रस्त्याने जाताना प्रचंड कसरत करावी लागते. अशीच परिस्थिती तालुक्यातील ईतर अनेक रस्त्यांची अहे. माणुसधरी ते केळापुर तांडा, मुरली ते मुरली बंदर घाटंजी ते बेलोरा, दत्तापुर, अंजी या शहरालगत असणा-या गावांकडे जाणारे रस्तेही खडतर झाले आहेत.
जुलै महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामध्ये अनेक रस्ते, नदि नाल्यावरील रपटे वाहुन गेले.
या रस्त्यांच्या बांधकामासाठी सुमारे अडीच कोटी रूपये निधीची आवश्यकता होती. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्या ठिकाणी डागडूजी करून तात्पुरती व्यवस्था केली आहे. तालुक्यात काही ठिकाणच्या रपट्यांची अवस्था एवढ़ी बिकट आहे की, त्यामध्ये वापरण्यात आलेले लोखंडी गज उभे झाले आहेत. मात्र त्याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अशा रपट्यांवर अपघात झाल्यास त्याचे गांभिर्य किती असेल याची कल्पनाही करवत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील रस्ते तर अत्यंत तकलादू आहेत. सिमेंट रस्त्यांवर अवघ्या एका वर्षाच्या आधीच खड्डे पडतात. एकंदरीतच घाटंजी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असुन त्यामुळे किरकोळ अपघातांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रीया जनतेमधुन व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment