Pages

Wednesday, 5 December 2012

संविधानाने दिलेले मुलभूत हक्क मिळालेच पाहिजे - माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील


भारतीय संविधानाने दिलेले जगण्याचे मुलभूत हक्क सर्वांना मिळायला पाहिजे व त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देण्याची गरज आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष न्या. बी.जी.कोळसे पाटील यांनी केले. येथिल तहसिल कार्यालयावर झालेल्या आंदोलनाच्या वेळी ते उपस्थितांना संबोधीत करीत होते. पडीक अवस्थेत असलेली जमिन कष्टक-यांना द्यायला हवी. शिवाय दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणा-यांचे सर्वेक्षण होऊन ख-या लाभार्थ्यांना विवीध योजनांचे लाभ मिळायला हवे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागेल त्याला दर माणशी महिन्यात ७ किलो धान्य योग्य दराने तात्काळ मिळावे, बेघर भुमिहीन कुटूंबाला राहण्यासाठी घर व कसण्यासाठी किमान ५ एकर जमिन द्यावी, पुर्वी जमिन देण्यात आलेल्यांना पाणी परवाना, शेतीसाठी मोफत विज द्यावी, तसेच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व विकासाची समान संधी यासाठी आवश्यक त्या वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. तहसिलदार प्रकाश राऊत यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष भावना राऊत, राजेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

......तर न्यायालयात दाद मागू
गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न व बेपत्ता असलेल्या सपना पळसकर प्रकरणी पोलीस योग्य रितीने तपास करीत नसतील तर न्यायालयातच दाद मागून या प्रकरणी सि.आय.डी.चौकशीची मागणी करू असे माजी न्यायमुर्ती बि.जी.कोळसे पाटील यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिलीप महाले यांचेशी चर्चेदरम्यान सांगितले. हे प्रकरण अत्यंत गंभिर असुन प्रत्येकाला संरक्षण व न्याय मिळाला पाहिजे. पोलीसांनी अशा प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता जबाबदारीने काम केले पाहिजे. कोणावरही अन्याय होत असल्यास त्यांच्या पाठिशी आपण सदैव उभे राहु असे त्यांनी यावेळी सांगितले.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 29 November 2012

गरिबाच्या लेकराले किंमत नसते काय?

‘सपना’च्या आईचा जळजळीत सवाल

‘कोण्या मोठ्या लोकायचं लेकरू कोनी नेलं असतं... तं सारेच्या सारे कामाले लागले असते. पन आता कोनालेच कायी घेनदेन नाई... गरिबाच्या लेकराची किंमतच नसते का? त्यायचा जीव गेला तरी दुनियेले काही फरक पडत नाही...’ चिंतातूर चेह-यावर ओघळणारे अश्रू पुसत चोरांब्याची शारदाबाई बोलत होती. तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता असलेल्या सपनाची ती आई. दिवसभर मजुरी केली तरच जेवणाची सोय होईल अशी बिकट परिस्थिती. मुलीच्या शोधासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने खायचे काय? असा प्रश्न पुढे असुनही दोन मुलांना कडेवर घेऊन सपनाचे आई वडील तिचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र सुरूवातीपासुनच पोलीस प्रशासनाच्या असंवेदनशिल व्यवहारामुळे ते हतबल झालेत. गोपाल व सौ.शारदा पळसकर हे दाम्पत्य घाटंजीलगत असलेल्या चोरांबा येथे कोलामपोडावर राहतात. त्यांना तिन अपत्य. सात वर्षांची सपना सर्वात मोठी त्यापाठोपाठ अपर्णा (३ वर्ष) व मंगल केवळ एक वर्षाचा. विजयादशमीचा तो सोन्यासारखा दिवस. या दिवशीच ‘सोन्यासारखी’ लेक बेपत्ता झाली ते पळसकर दाम्पत्याला कळलं सुद्धा नाही. कारण गावातच शारदाबाईचे माहेर. सपना कधी कधी आजीकडेच राहायची. त्यामुळे दस-याच्या दिवशी ती बेपत्ता झाल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही. सकाळी ती आजीकडेही नसल्याने तिची गावभर शोधाशोध सुरू झाली. आजुबाजूच्या जंगलातही सर्वांनी मिळून शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारणा झाली. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर २५ ऑक्टोबरला पळसकर दाम्पत्याने पोलीस स्टेशन गाठले. पण सुरूवातीला तक्रार घेण्यासच टाळाटाळ करण्यात आली. आधी तुम्ही शोध घ्या... आम्ही देखिल प्रयत्न करतो... तक्रार करू नका. असे गोड बोलुन त्यांची बोळवण करण्यात येत होती.
जेव्हा तिच्या पालकांनी तक्रारीचा आग्रह धरला तेव्हा त्यांना धाकदपट करण्यात आली. तेव्हाही ते न जुमानल्याने अखेर बेपत्ता असल्याची नोंद घेऊन पोलीसांनी कागदी सोपस्कार केले. पण तक्रारीची पोच देण्यास चक्क नकार देण्यात आला. महिनाभर जिकडेतिकडे भटकत असलेल्या पळसकर दाम्पत्याच्या कानावर जेव्हा मुरली येथिल घटना पडली तेव्हा त्वरीत त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. आपली सपना तिच तर नसेल ना या भितीने त्या मायमाऊलीच्या काळजाची काय अवस्था झाली असेल ते अकल्पनीयच. 
पोलीस मात्र ती सपना असेल असा संशय व्यक्त करून तपास करण्याच्या मानसिकतेत नसल्याने मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने पळसकर दाम्पत्याने थेट ‘एस.पी.’ साहेबांना गाठले. पण ते तर गुप्तधनासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा नव्हे, घटनास्थळी मुलगी असणे शक्यच नाही, ती तुमचीच मुलगी असेल हे कसे म्हणायचे? असे प्रतिप्रश्न करायला लागल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. साहेबांनाही आमच्यावर विश्वास बसला नाही असे निराश चेह-याने शारदाबाईने सांगितले. 
घाटंजी पोलीसांविषयी कोलामपोडावर प्रचंड संताप असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ‘ठाणेदारानं डब्बे भरून घेतले म्हनुनच त्यायचे हात बांधुन असंन’ अशा शब्दात ग्रा.पं.सदस्य यशोदा मेश्राम यांनी पोलीस तपासावर आपली नाराजी व्यक्त केली. गावात यापुर्वी अशी घटनाच घडली नसल्याचे गावकरी सांगतात. सात वर्षांची मुलगी जाणार तरी कुठे? अन ते ही या छोट्याशा गावातून? शंकेला नक्कीच वाव आहे. पण हे पोलीसांना कोण सांगणार? ते केवळ या प्रकरणात आपण सुरक्षीत राहावे यासाठी कागदी घोडे नाचविण्यातच व्यस्त आहेत तर निवडणुकीच्या वेळी मिरवणारे राजकारणी आपल्या ‘सग्या सोय-यांना’ वाचविण्याच्या प्रयत्नात हे प्रकरणच दडपण्यासाठी निघालेत. मन सुन्न करणा-या या बिकट परिस्थितीत एक चिमुकला निष्पाप जीव मात्र कुठे असेल याच प्रश्नाने संवेदनशिल माणसाच्या मनाचा ठाव घेतलाय.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 28 November 2012

आबा तुमच्या पोलीसांचा हा असा कसा तपास ?



गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाला आठवडा लोटलाय. तर चोरांब्याची ‘सपना’ तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता आहे. गुप्तधन प्रकरणातील फिर्यादी पोटतिडकीने सांगतोय की, मी एका बालकाची किंकाळी ऐकली. शिवाय परिस्थितीजन्य पुरावे देखिल हा गुप्तधनासाठीचा प्रयत्न होता हे स्पष्ट करीत आहेत. बेपत्ता मुलीच्या पालकांची जिकडे तिकडे उपाशीपोटी भटकंती सुरू आहे. सामाजीक न्याय मंत्र्यांनी तपास गांभिर्याने घ्या असे सांगितले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे. प्रसारमाध्यमे घटनेच्या  वास्तविकतेवर प्राधान्याने लक्ष वेधत आहेत. या सर्व खटाटोपात पोलीस यंत्रणा मात्र तपासाच्या नावाखाली केवळ  ‘तपासनाट्य’ करीत असल्याचे दिसत आहे. ही घटना गावातील दोन गटातील राजकारणाचा भाग आहे. तर कधी मारहाण केल्याने आपल्यावर अ‍ॅट्रोसिटी लागू नये यासाठी ग्रामस्थांनी हा प्रयत्न केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र बेपत्ता मुलगी व गुप्तधनासाठी नरबळीच्या प्रयत्नाच्या प्रकरणात पोलीस तपास ‘शुन्य’ आहे. कोणत्याही स्पष्ट निष्कर्षाप्रत पोलीस अद्याप पोहचले नाहीत. गेल्या आठ दिवसात केवळ फिर्यादी व ग्रामस्थांचे बयाण घेण्यापलिकडे पोलीस तपास गेला नाही. या दरम्यान फिर्यादी विजय चव्हाण याची किमान दहा वेळा चौकशी झाली आहे. त्याला चार ते पाच वेळा घटनास्थळी नेण्यात आले. तर घटनेतील आरोपी व संशयीतांपैकी कुणालाही घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले नाही हे विषेश. अपहरण व हत्येचा प्रयत्न असा गंभिर गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी पोलीसांना केवळ एकाच दिवसाचा ‘पीसीआर’ मिळाला तेव्हाच पोलीसांना या प्रकरणात नेमके काय करायचे आहे हे लक्षात आले. चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असतांना पाचवा आरोपी शोधण्या ऐवजी पोलीस वारंवार फिर्यादीलाच पोलीस ठाण्याच्या चकरा मारायला लावत आहेत. एवढेच काय तर पत्रकारांनाही ही बातमी तुम्हाला कोणी दिली ते आम्हाला सांगा असे म्हणण्यापर्यंत पोलीसांची मजल गेली आहे. मात्र या घटनेतील संशयीत कोण कोण आहेत याची संपुर्ण माहिती तालुक्यातील ‘शेंबड्या’ पोरांनाही आहे. मग पोलीस या प्रकरणात त्यांना का दुर्लक्षीत आहेत?  या प्रकरणाच्या सुरूवाती पासुनच तपास अधिका-यांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसत आहे. प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले, पोलीस उपनिरिक्षक राऊत यांनी या आठवडाभरात आरोपींना ‘सुरक्षीत’ ठेवण्याचेच प्रयत्न केलेत. माध्यमांनी त्यावर वेळोवेळी प्रकाशही टाकला आहे. त्यानंतर तपास हाती घेतलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन हे सुद्धा तशाच कार्यपद्धतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांची सुद्धा या प्रकरणात ‘नकारात्मक’ भुमिकाच दिसत आहे. असे असतांना नि:पक्ष तपास होईल तरी कसा? त्यामुळेच राज्याचे गृहमंत्री ना.आर.आर.पाटील तरी या गंभिर प्रकरणात जातीने लक्ष घालुन पोलीस दलाबद्दल जनतेत निर्माण झालेला अविश्वास व संताप दुर करण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. एका गंभिर प्रकरणात पोलीसांच्या या ‘उरफाट्या’ तपासाबद्दल तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 22 November 2012

गुप्तधन प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी



मुरली तांड्यावरील गुप्तधनासाठी नरबळी प्रकरणातील ३ आरोपींना आज ५ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर आरोपी राजु ताकसांडे याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या तिसNया दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीसांना आरोपींची केवळ एक दिवसाचीच पोलीस कोठडी मिळाली. ‘देशोन्नती’ च्या बातमीमध्ये वर्तविलेल्या शक्यतेप्रमाणे ही पोलीस कोठडी केवळ औपचारीकताच ठरली. या एका दिवसात पोलीसांनी आरोपींकडून कोणतीही माहिती काढल्याचे वृत्त नाही. या घटनेतील सुमारे आठ ते दहा आरोपी कोण आहेत? ती मुलगी कोण होती? चोरंबा येथिल बेपत्ता असलेली मुलगी तिच तर नाही ना? हे सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. घटनेच्या रात्रीपासुनच आरोपी विषयी सहानुभूती असलेल्या प्रभारी ठाणेदार अरूण गुरनूले यांच्याकडेच या घटनेचा तपास राहिल्याने कोणत्याही माहितीविना सर्व आरोपी अखेर न्यायालयीन कोठडीत सुरक्षीत झाले. आता यापुढे पोलीस सदर घटनेचा नेमका काय तपास करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घटनास्थळावर सर्व संशयास्पद पुरावे आढळूनही पोलीस या घटनेला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची वास्तविकता मान्य करायलाच तयार असल्याचे दिसत नाही. विस ते पंचेविस दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या त्या मुलीच्या बाबतीतही कोणताही सुगावा लागलेला नाही. दिड हजार लोकसंख्येच्या गावातून एक सात वर्षीय चिमुकली बेपत्ता होते. मात्र त्या प्रकरणातही पोलीस तपास शुन्यच आहे. घाटंजी पोलीसांचा हा ‘कारभार’ पाहता पोलीस नेमके काय करीत आहेत? असा प्रश्न विचारल्या जात आहे. त्यांचेवर वरिष्ठांचा वचक नाही का? प्रभारी ठाणेदार गुरनूले यांची कार्यपद्धती यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. आरोपींविषयी त्यांना नेहमीच असलेली ‘सहानुभूती’ संशयास्पद असते. मात्र वरिष्ठांकडून आजवर याबाबत त्यांचेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने असे प्रकार वाढत आहेत. यावेळी तर चक्क गुप्तधनासाठी नरबळीचा झालेला प्रयत्न व बेपत्ता असलेली सात वर्षीय मुलगी असा धडधडीत गंभीर प्रकार स्पष्ट असतांना पोलीसांचा तपासच संशयाच्या भोवNयात सापडला आहे. पोलीस दलातील वरिष्ठही या प्रकरणी गंभिर असल्याचे दिसत नाही याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिल्या जात आहे. कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा या प्रकरणी लक्ष घालतील अशी अनेकांना अपेक्षा होती. एवंâदरीतच या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेमार्पâत चौकशीची गरज व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 


टिपेश्वर अभयारण्यात शिजले ‘गुप्तधन’ प्रकरण ?

त्या कथित पुजेने वाढले गुढ

नवरात्राच्या काळात घाटंजी तालुक्यालगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात काही लोक विशिष्ट प्रकारची पुजा करण्यासाठी गेले होते. सलग आठ ते दहा दिवस ही पुजा चालली अशी माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत असुन त्यामुळे गुप्तधन प्रकरणाचा ‘कट’ टिपेश्वर अभयारण्यात तर शिजला नाही ना ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. या कथित पुजेमध्ये घाटंजी तालुक्यातील सुमारे दहा ते बारा लोक सहभागी झाले होते, त्यामध्ये काही व्यावसायीक व शासकीय कर्मचारी सुद्धा होते अशी माहिती आहे. वन्यप्राण्यांनी व्यापलेल्या अभयारण्यामध्ये नेमकी कोणती ‘पुजा’ झाली याबाबत सर्वत्र चर्चेला पेव फुटले आहे. या पुजेत सहभागी झालेल्यांना एक ‘गुरूजी’ मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण देत होता. या कालावधीत पुजेमध्ये सहभागी झालेले लोक केवळ फलाहार घ्यायचे. हे सर्व साहित्य त्यांना घाटंजी येथुन पाठविण्यात येत होते. त्यांनी राहण्यासाठी राहुट्या उभारल्या होत्या. अष्टमीच्या दिवशी ही कथित पुजा संपली अशी माहिती आहे. योगायोगाने दस-याच्या दिवशी म्हणजेच ‘दशमी’ला चोरांबा येथिल सपना पळसकर ही मुलगी बेपत्ता झाली. तर ‘पंचमी’च्या पुर्वरात्रीला गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेली हो टोळी ग्रामस्थांच्या हाती लागली. हा केवळ योगायोग आहे की एका गंभिर कटाचा भाग याचा पोलीसांनी शोध घेण्याची गरज आहे. ग्रामस्थ व फिर्यादी विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे सदर घटनेत दहा पेक्षा जास्त लोक सहभागी होते. पोलीसांनी अद्याप केवळ चार आरोपींना अटक केली आहे. टिपेश्वर अभयारण्यामध्ये झालेल्या त्या कथित पुजेबाबत पोलीसांनी योग्य चौकशी केली तर या प्रकरणात एक मोठा सुगावा हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अटकेत असलेले काही आरोपी नवरात्राच्या काळात कुठे होते याचे मोबाईल च्या माध्यमातून ‘लोकेशन’ घेतल्यास या चर्चेमध्ये काही सत्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल. या दरम्यान त्यांना कोण कोण भेटण्यास येत होते? ते कुठे कुठे गेले? याबाबतही पोलीसांनी तपास करण्याची गरज आहे. तसेच आरोपी व संबंधीतांच्या मोबाईल ‘कॉल डिटेल्स’ वरून या प्रकरणी पोलीसांना तपासाची दिशा मिळु शकते. मात्र पोलीस त्या मानसिकतेत असल्याचे दिसत नाहीत. गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा झालेला प्रयत्न, सुमारे विस दिवसांपासुन बेपत्ता असलेली चिमुकली व टिपेश्वरच्या अभयारण्यात झालेली कथित पुजा या तिन्ही घटनांचे एकमेकांशी साधम्र्य असल्याचे दिसत आहे. पोलीसांनी या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविल्यास यातील नेमके तथ्य बाहेर येऊ शकते असा कयास वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

अमोल राऊत