Pages

Wednesday, 27 March 2013

घाटंजीत ‘ड्राय डे’ ला वाहतो दारूचा महापुर

छुप्या मार्गाने होते दारू विक्री
पोलीसांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष
धुलिवंदन व तत्सम दिवशी दारू विक्री बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतात. मात्र असे असले तरी घाटंजी शहर व तालुक्यात ‘ड्राय डे’ ला सुद्धा मागेल त्याला देशी विदेशी दारू उपलब्ध होते. अवैध व्यवसायाला पोषक ठरत असलेल्या घाटंजी तालुक्यातील पोलीस यंत्रणेच्या जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे हा प्रकार आजतागायत सुरू आहे. ‘ड्राय डे’ ला अवैध दारू सोबतच परवाना प्राप्त देशी व विदेशी दारूची दुकाने बाहेरून बंद तर आतून सुरू असतात. बार मध्ये काम करणारे ‘बंद’ दुकानाबाहेर उभे असतात. मद्यशौकीन हळुच त्यांचेजवळ जाऊन हातात पैसे ठेवतात. मागील दारातून जाऊन त्यांना अवघ्या दोन मिनिटात मागणीनुसार दारू पुरविण्यात येते. सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. मात्र या दारू विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे कोणीही या प्रकाराची तक्रार करण्यास धजावत नाही. तर पोलीस मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. घाटंजी शहरातील आठवडी बाजार, यवतमाळ रोड, खापरी नाका या भागातील काही बारमधुन ‘ड्राय डे’ ला छुप्या मार्गाने दारूविक्री होते हे सर्वश्रुत आहे.
धुलिवंदनाच्या सणाला दारू पिण्याचा विचित्र पायंडा गेल्या काही वर्षात पडल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्याचा हा उत्सव आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासुन याला विकृत स्वरूप येऊ लागले आहे. मद्यधुंद अवस्थेत अश्लिल हातवारे करीत धिंगाणा घालणे म्हणजेच रंगपंचमी असाच समज काही तळीरामांनी करून घेतला आहे. रंगपंचमी दारू पिऊन व मांसाहार करून एन्जॉय करण्याची एक फॅशन पडत चालली आहे. यामध्ये प्रामुख्याने युवावर्ग दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. दारूची दुकाने, बार बंद ठेवण्याचा आदेश असतानाही अनेक जण पिऊन झिंगताना दरवर्षी दिसतात.  होळी हा एकच सण नव्हे, तर प्रत्येक सणाला पिऊन धिंगाणा घातल्याशिवाय तो सण साजरा करायचाच नाही, असा निश्चय केलेले तळीराम दिवसेंदिवस वाढत आहेत. दारूच्या धुंदीत जिवघेण्या वेगात दुचाकी चालविणे, सायलेंसर काढुन ध्वनी प्रदुषण करणे, रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत नाचणे, मारामारी व भांडणाने रंगोत्सवाचा बेरंग होत असताना पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक आहे. एखादा गंभिर प्रकार घडल्यावरच त्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंध घालणे सोयीस्कर ठरणार नाही का याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. 
साभार :- देशोन्नती 

सौ.श्वेता योगेश पारवेकर यांचे आकस्मिक निधन

 पारवा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख पारवेकर यांच्या पत्नी श्‍वेता यांचे आज सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्या ३२ वर्षांच्या होत्या. फ़िट (मिरगी) आल्याने त्या जमिनीवर कोसळल्या व त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.  
त्यांच्या मागे पती, मुलगा यश व मोठा आप्त परिवार आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत आमदार नीलेश देशमुख पारवेकर यांच्या त्या भावसून होत्या. अवघ्या दोन महिन्यापुर्वी २७ जानेवारीला आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले होते. या  दु:खातून पारवेकर परीवार सावरत नाही तोच सौ.श्वेता यांच्या आकस्मिक निधनाने कुटूंबाला दुसरा धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी व रंगपंचमीच्या पुर्वसंध्येला घडलेल्या या दु:खद घटनेने संपुर्ण घाटंजी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Tuesday, 26 March 2013

रोहयो प्रकरणी गुन्हे दाखल न केल्यास खटला न्यायालयात

अयनुद्दीन सोलंकी यांचा ईशारा
ना.मोघेंचा दबाव असल्याचा आरोप
तालुक्यातील पारवा वनपरिक्षेत्रातील माणुसधरी रोहयो अपहार प्रकरणात संबंधीतांवर गुन्हे दाखल न केल्यास न्यायालयात फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे अयनुद्दीन सोलंकी यांनी सांगितले. याप्रकरणी पारवा पोलीस स्टेशनसह वरिष्ठांकडे पुराव्यानिशी तक्रार केली असतांनाही पोलीसांनी अद्याप एफ.आय.आर.दाखल केला नाही. सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांच्या दबावाखाली पोलीस कार्यवाही करण्यास दिरंगाई करीत आहेत. आलेल्या तक्रारीवर आधी गुन्हा नोंद करून त्यानंतर तपास करण्यात यावा असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २ जानेवारी २०१२ रोजी दिला आहे. त्यामुळे तक्रारीवर तब्बल अडीच महिन्यापर्यंत गुन्हा नोंद न करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचे सोलंकी यांनी म्हटले आहे. पारवा वनपरिक्षेत्रांतर्गत माणुसधरी येथे रोहयो अंतर्गत कामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ज्या मजुरांनी रोहयोची कामे केली नाही त्यांच्या नावाने मोहदा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून रक्कम विड्रॉल करण्यात आली आहे. या मजुरांनी कोणतीही कामे केली नसल्याचे बयाण पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद व ईतर ठिकाणी नोंदविले आहे. या अपहारात मोहद्याचे पोस्ट मास्तर काळे, उपवनसंरक्षक डी.बी.श्रीखंडे, ए.पी.गि-हेपुंजे, वनपरिक्षेत्र अधिकारी (रोहयो) ए.ए.शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) लक्ष्मण गाडे, तहसिलदार संतोष शिंदे, कंत्राटदार नितिन कांबळे, मंगेश ताटकंडवार, किसन जाधव ईतर दोषी अधिकारी कर्मचारी, मिराबाई कनाके यांचेसह ईतरांनी संगनमत करून शासनाच्या रकमेचा अपहार केल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. 
पोस्टातून रक्कम विड्रॉल करतांना साक्षीदार म्हणुन सोलंकी यांची खोटी सही करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हस्ताक्षर तज्ञामार्फ़त त्याची तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या भ्रष्टाचारात बडे अधिकारी व राजकीय नेत्यांचे काही निकटस्थ असल्याने गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. त्यामुळे तातडीने गुन्हे दाखल करण्यात न आल्यास फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे सोलंकी यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन करीत आहेत.
साभार :- देशोन्नती 

एस.टी.- मेटॅडोअरच्या धडकेत १५ जखमी: ३ गंभिर


एस.टी.ने मेटॅडोअरला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले. घाटंजी पांढरकवडा मार्गावर नुक्ती गावाजवळ हा अपघात झाला. बसचालक रामु चौरे याचेसह विठोबा दौलत डंभारे व अरूण सदाशिव सहारे गंभिर जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी यवतमाळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अरूण रंदई (मांडवा), अनिता निखाडे (राजुर), श्रावण कांबळे, लक्ष्मी श्रावण कांबळे, साई श्रावण कांबळे, सुमित श्रावण कांबळे रा.हिंगणघाट, दिपक खंदारे, रेश्मा दिपक खंदारे, करण दिपक खंदारे, सुरज दिपक खंदारे, मुस्कान दिपक खंदारे रा.कुटकी (हिंगणघाट), पुजा भुपेंद्र लोहकरे हे प्रवाशी जखमी झाले. पांढरकवडा आगाराची एस.टी.बस क्रं.एम.एच.४० ८३०० पांढरकवड्याहून घाटंजीकडे येत होती. विरूद्ध दिशेने येत असलेल्या मेटॅडोअर क्र.एम.एच.३७ जी.३०१ ला या एस.टी.ची जबर धडक बसली.
साभार :- देशोन्नती 

घाटंजीच्या आठवडी बाजारात असुविधांचा कळस


तालुक्यातील अनेक खेड्यांसाठी घाटंजी ही मुख्य बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. मात्र व्यावसायीक व ग्राहक यांच्यासाठी कोणत्याही सुविधा स्थानिक नगर परिषदेने आजवर पुरविल्याचे उदाहरण नाही. अनेक खेड्यापाड्यांमध्येही आता आठवडी बाजारात व्यावसायीकांसाठी ओटे बांधलेले आहेत. मात्र घाटंजी न.प.ने आजवर ओटे बांधण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. घाटंजीच्या बाजारात भाजीपाला, धान्य, मसाले, फळे, कापड, फरसाण यासह अनेक किरकोळ व्यावसायीक आपली दुकाने थाटतात. केवळ मुरूम व दगड टाकुन त्यांना जागा आखणी करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र दुकानांच्या अवतीभवती दगड धोंडे, कचरा पडून राहत असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो.
आझाद मैदान परिसरात भरत असलेल्या या आठवडी बाजारात सर्वत्र प्रचंड घाण असल्याने वातावरणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना नाकावर रूमाल ठेवुनच कसाबसा बाजार करावा लागतो. बाहेरगावाहुन येणारे व्यावसायीक व ग्राहकांच्या सोयीसाठी पाणी, सार्वजनिक शौचालय, मुत्रीघर यापैकी कोणतीही सोय आठवडी बाजार परिसरात नाही.
व्यावसायीकांना कोणतीही सुविधा न देणारी नगर परिषद त्यांचेकडून दर आठवड्याला कर मात्र न चुकता वसुल करते. व्यवसायानुसार १० रू, २० रू, ५० रू असा कर दैनिक वसुलीचे वंâत्राटदार वसुल करतात. मात्र त्या तुलनेत दुकानापर्यंत ग्राहक विनाअडथळा येऊ शकेल एवढी व्यवस्थाही न.प.ने आजवर केली नाही. पावसाळ्यात तर बाजारात एवढी घाण पसरलेली असते की, पाय कुठे ठेवावा असा प्रश्न पडतो. पाऊस आला की व्यावसायीकांची तारांबळ उडते. अनेकदा तर मोठे आर्थिक नुकसानही होते.
आजवरच्या कोणत्याही न.प.सत्ताधा-यांनी आठवडी बाजाराकडे लक्ष दिले नाही. व्यवसाय करण्यासाठी सिमेंटचे ओटे, शेड, स्वच्छ परिसर, बाजारात फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा, रस्ते, पाणी,स्वच्छतागृह या सुविधा टप्प्या टप्प्याने निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र सध्यातरी तेवढी ईच्छाशक्ती न.प.चे सत्ताधारी, विरोधक व प्रशासन यापैकी कोणामध्येही असल्याचे दिसत नाही हेच घाटंजी शहराचे दुर्दैव आहे.
साभार :- देशोन्नती